ऑगस्ट महिना हल्ली लक्षात राहतो मैत्री दिनाच्या सेलिब्रेशनमुळे. मुंबईच्या काही तरुणींनी या वर्षी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम करायचा ठरवला -युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेला ट्रेक. या ट्रेकच्या आयोजनापासून सेलिब्रेशनपर्यंतचे अनुभव अपूर्वा कारुळकर हिने ‘व्हिवा’बरोबर शेअर केले आहेत.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. आमच्यासारखी तरुण मंडळी या दिवशी आपल्या मित्र-मत्रिणींच्या घोळक्यात रमून आणि दंगा, मौज-मस्ती करून हा दिवस साजरा करतात. परंतु आम्हा काही मत्रिणींना या वेळी एक भन्नाट कल्पना सुचली. पुरुषांची मक्तेदारी असलेला ट्रेकिंग हा उपक्रम आपण मुलींनीच का अरेंज करू नये, असा विचार पुढे आला. आणि त्यातूनच २ ऑगस्टला किल्ले कर्नाळा इथे ‘लेडीज स्पेशल’ ट्रेक आयोजित करण्याचे ठरले. ही कल्पना आमच्या पाल्र्याच्या ‘जनसेवा समिती’ या संस्थेने अगदी लगेच उचलून धरली.
ट्रेकिंगचं शुल्क, खासगी वाहनाचे आरक्षण, प्रचार या सर्व गोष्टी आल्याच. पटापट आम्ही कामाची विभागणी केली आणि प्रचार सुरू केला. सर्व सदस्यांना या ट्रेकची वेगळी भेट म्हणून ‘पिंक कॅप’ देण्याचे ठरले. पाहता पाहता ३० जणींवर हौशी ट्रेकर्स आम्हाला येऊन मिळाल्या. लेडीज स्पेशल ट्रेक आमच्यासाठी खरंच स्पेशल होता. कर्नाळ्याला ट्रेकिंगला येणाऱ्या या सर्व मुली आणि महिला वेगवेगळ्या वयोगटातील होत्या. वय वर्षे १४ ची ‘श्रेया’ ते ५५ वष्रे वयाच्या ‘गोगटेकाकू’ सगळ्या कर्नाळा किल्ला सर करायला सिद्ध झाल्या होत्या. कर्नाळा किल्ला हाडाच्या ट्रेकर्ससाठी तसा ‘इझी’ श्रेणीतला. परंतु अनेक जणी आयुष्यात प्रथमच ट्रेकिंगसाठी बाहेर पडत होत्या. त्यामुळे त्यांना व्यवस्थित किल्ल्यावर नेणे आणि परत सुखरूप घेऊन येणे, ही आमच्यावर एक मोठी जबाबदारी होती. सकाळची वेळ आणि गर्दरानाची सावली त्यामुळे सुरुवातीची चढाई मजेत झाली. मग मात्र तीव्र चढावाने सगळ्यांचीच दमछाक झाली. परंतु सर्वाना धीर देत, एकमेकांना साहाय्य करीत आम्ही एकदाचा माथा गाठला. ट्रेकिंग हेच तर शिकवते. किती वेळात आलात यापेक्षा कसे आलात हे महत्त्वाचे!
कर्णाईदेवीचे दर्शन घेऊन उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात आम्ही प्रवेश केला आणि शिवाजी महाराजांच्या नावाची गर्जना केली. आम्हा सख्यांच्या त्या एकत्रित शिवगर्जनेने कर्नाळ्याचा किल्लाही त्या वेळी मोहरला असेल. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही गडदर्शनाला सुरुवात केली. गडाचे भौगोलिक स्थान, त्याचे शिवकाळातील ऐतिहासिक महत्त्व, नंतरच्या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आलेला संबंध असा सारा इतिहास आम्ही त्यांना सांगितला. आमच्यासारखे इतर अनेक ग्रुप्सही त्या वेळी किल्ल्यावर होते. किल्ल्याची अशी डोळस भटकंती घडवून आणण्याचा आमचा हा प्रयत्न इतर ग्रुप्सचा उत्सुकतेचा आणि आदराचा विषय ठरत होता. त्या वेळी उपस्थित काही परदेशी पर्यटकांसाठी आमची ही ‘लेडीज स्पेशल’ ट्रेकची कल्पना कुतूहलाचा विषय ठरली.
या थोडक्या काळातच आमच्या सर्व मत्रिणी ‘टीम वर्क’चे महत्त्व समजून चुकल्या होत्या. ही भटकंती आम्हाला खूप काही देऊन गेली. लीडरशीप, टीम वर्क ,टीम बििल्डग, टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग हे सारे तुम्ही एकदा या डोंगरात शिरलात की आपोआप आत्मसात करू लागता.  ‘फ्रेण्डशिप डे’ आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला. अनेकांशी आमचे मत्र त्यातून जुळले! ३० नव्या सख्या मिळाल्या आणि निसर्गाशी, इतिहासाशीही मैत्र जुळलं.
मुंबई – viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा