काही ऑकेजन असेल किंवा सण समारंभ असेल तर आपण हटके दिसावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपले राष्ट्रीय सण – स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना आदी कुठल्याही कार्यक्रमाला जाताना तोच तो पांढरा कुर्ता घालण्याऐवजी त्यामध्येही थोडा युनिकनेस आणता येईल. या दिवशी शुभ्र खादीचे कपडे घालण्याची परंपरा आपण पूर्वापार जपत आलो आहोत. आपल्या तिरंग्याच्या रंगांचा युक्तीने वापर करून त्या लुकमध्ये काही व्हरायटी आणता येईल.

सकाळी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर कुर्ती मस्ट. त्याबरोबर लेगिंग्ज, धोती, सलवार, जेगिंग्ज याचं कॉम्बो करून एक हटके लुक मिळवू शकता. व्हाइट कलरमध्ये शॉर्ट कुर्ती आणि त्याबरोबर ग्रीन किंवा ऑरेंज पतीयाला किंवा धोती आणि त्यावर कॉटन किंवा शिफॉनमधील बॉटमला शोभून दिसणारी ओढणी. हा लुक खूप क्लासी दिसेल. त्यावर झुमके किंवा फक्त मोती. एक सुंदर लुक मिळेल. कॉटन व्हाइट कुर्तीऐवजी खादीची कुर्ती ट्राय करू शकता. हल्ली खादी मटेरियलमध्ये अनेक प्रकारच्या कुर्तीज उपलब्ध आहेत त्या तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर सध्या एकदम ट्रेंडमध्ये असलेली अँकल लेन्थ कुर्ती तुम्ही वापरू शकता. त्यातसुद्धा अनेक व्हेरिएशन्स करता येतील. व्हाइट लाँग लेन्थची कुर्ती आणि त्याखाली व्हाइट लेगिंग्ज. यावर उठाव आणणारी नेव्ही ब्लू ओढणी हे कॉम्बो खूप सुंदर दिसेल. नेव्ही ब्लूऐवजी ग्रीन किंवा ऑरेंज ओढणीसुद्धा आपण वापर शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ड्रेस आणि सलवारदेखील प्लेन असेल तर ओढणी प्लेन नको. प्रिंटेड हवी. जर बांधणी, डिझायनर किंवा लटकन, मिरर वर्क केलेलं असेल तर मग तुमचा हटके आणि प्युअर इंडियन लुक एकदम उठून दिसेल. या सगळ्या लुकबरोबर सध्या इन असलेली ‘पिकू’ फेम गोल टिकली वापरू शकता. थोडय़ा मोठय़ा आकाराची नेव्ही ब्लू, ग्रीन इत्यादी डार्क शेडमधील टिकल्याही ट्राय करू शकता. त्याचबरोबर फुल व्हाइट अटायरवर काही ट्रेंडी नेकपीसेस सुद्धा वापरू शकता. असा एखादा हेवी नेकपीस सगळ्या लुकची शोभा वाढवेल.
नॉर्मल डे आऊटसाठी बाहेर जाणार असाल तर तिरंगी कलर वापरून छान कॅज्युअल लुक तुम्ही मिळवू शकता. ऑरेंज, ग्रीन, ब्लू अन् व्हाइट या रंगाचं एक खूप छान कॉम्बो बनतं. परंतु या सगळ्या रंगांना आपण केअरफुली कॅरी केलं पाहिजे. नाही तर रंगीबेरंगी जास्त झालं तर रंगाचा बेरंग होतो. त्याच बरोबर या कलर्समधील कोणत्या शेड्स आपण वापराव्यात हेसुद्धा लक्षपूर्वक पाहावे.
व्हाइट टीशर्ट, शर्ट किंवा टॉप आणि त्याच्या बरोबरीने उरलेल्या तीन कलर्समधील बॉटम असं कॉम्बो करू शकता. त्याबरोबर एखादा कुल स्कार्फ घेतलात तर खूप चांगला लुक मिळेल. खरं तर व्हाइट बॉटम्ससुद्धा वापरू शकता. त्यामध्ये ट्रेंडी पलाझो, स्कर्ट्स शॉर्ट्स असं काहीही तुम्ही वापारू शकता. फक्त पावसाचे दिवस लक्षात घेऊन व्हाइट बॉटम्स स्वातंत्र्यदिनाला टाळणंच योग्य. इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज असतील तर याचा विचार करता येईल.
सध्या जॅकेट्ससुद्धा एकदम इन आहेत. त्याच्याही खूप छान वापर करता येईल. एखाद्या प्लेन व्हाइट अटायर वर ग्रीन, ब्लू, ऑरेंजमधील सुंदर वर्क केलेलं जॅकेट खूप सुंदर दिसेल. त्याच बरोबर वनपीस ड्रेसेससुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यावरही जॅकेट्स वापरू शकता.
ध्वजाचे तीन रंग आणि अशोकचक्राचा निळा रंग यांचा खुबीने वापर केलात तर खूप छान स्टाइलिंग होईल. रंगसंगती आणि छटा यांना केअरफुली हाताळलंत तर एक परफेक्ट लुक तुम्ही मिळवू शकाल.
प्राची परांजपे –
viva.loksatta@gmail.com