तरुण वर्गाची प्रजासत्ताक दिनाची ओढ लक्षात घेता, बाजारातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रजासत्ताक दिनाविषयीचा आदर आणि प्रेम पाहता त्यासाठी तयार होऊन उत्साहाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढताना दिसते. या सगळ्याचा प्रभाव फॅशनवर न पडता तरच नवल…

यंदा देशभरात ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभाग घेण्याबरोबरच आपण परिधान केलेले कपडे, बॅग यातूनही या दिवसाचे महत्त्व प्रतिबिंबित होईल, यावर अनेक जण विशेषत: युवा पिढी अधिक भर देताना दिसते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा आदर करत त्याचे प्रतीक म्हणून तिरंगी कपड्यांची फॅशन फॉलो करणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो.

हेही वाचा : संशोधनातील वाघ

या दिवशी सफेद कुर्ती आणि सफेद पायजमा किंवा लेगिन्स घालून त्यावर तीन रंग असलेली ओढणी घेतली जाते. अगदी सहज आणि सोपा असणारा हा पेहराव मुली, ऑफिसला जाणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर घालतात. पंजाबी ड्रेस हा प्रकार दिवसभर वापरायला सोपा असल्याने या दिवशी सफेद पंजाबी ड्रेस आणि तिरंगी दुपट्टा या प्रकाराला अधिक प्राधान्य मिळते. त्यावर केशरी, सफेद आणि मग हिरवा अशी रंगसंगती करून हातात बांगड्या घातल्या जातात. आता तर मार्केटमध्ये अशा तीन रंगांच्या बांगड्यांचा सेटही विकत मिळू लागला आहे.

याशिवाय, गळ्यातील नेकलेसमध्येही या तीन रंगातील नेकलेसला अधिक मागणी असते. प्रामुख्याने सफेद ड्रेसवर असे तिरंगी नेकलेस मुली वापरतात. हे नेकलेस पुन्हा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या ड्रेसवर स्टाइल करता येऊ शकत असल्याने ते खरेदी करण्याचे प्रमाणही मोठे आहे. घरच्या घरी कानातलेसुद्धा बनवले जातात. केशरी, सफेद, हिरव्या रंगाचे मणी किंवा धागा वापरून सुरेख कानातले बनवले जातात. नेल आर्टचाही वापर करून तिरंगी रंगात सुरेख नखे रंगवली जातात. काही मुली नखांवर ध्वजाचे नेलआर्टसुद्धा करतात.

हेही वाचा : कॉफी आणि बरंच काही…

उच्च पदावर असलेल्या, राजकीय क्षेत्रात असलेल्या महिला जाणीवपूर्वक या दिवशी तिरंगी रंगाची साडी नेसतात. सलग तीन रंग असलेल्या किंवा सफेद साडीला अशा बॉर्डर असलेल्या साड्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. अॅमेझॉन, मिशोसारख्या ई-कॉमर्स साईटवर सुद्धा अगदी योग्य भावात अशा साड्या मिळतात. अशा साड्या नेसून महिला ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित राहतात. एकंदरीत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व ओळखून त्यापद्धतीची फॅशन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.
viva@expressindia.com

Story img Loader