किल्लेही उंच, दमछाक करणारे, गिर्यारोहकांचा कस पाहणारे, नवशिक्यांची छाती दडपवणारे असतात. सुमारे ४०० किल्ल्यांच्या अस्तित्वामुळे महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचं स्थान मिळालं आहे, त्यामुळे इथे दुर्गभ्रमंतीला विशेष महत्त्व आहे.

गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन करताना ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले पाहताना त्याची प्रचीती घेता येते. किल्ल्यांची भटकंती करत असताना प्रत्येक किल्ला त्याच्या वैशिष्टय़ांमुळे प्रेमात पाडतो. काही किल्ल्यांवरील प्राचीन अवशेष, काहींची थरारक चढाई, काही भोवतीचं घनदाट जंगल, तर काही किल्ल्यांशेजारचे गगनाला भिडलेले नानाविध आकाराचे सुळके, अशा एक ना अनेक कारणांमुळे त्या त्या गडाची भटकंती आपल्या स्मृतिपटलावर कायमची कोरली जाते. महाराष्ट्रात कोकणातील सिंधुदुर्गपासून विदर्भातील गाविलगडपर्यंत, खानदेश सीमेवरील साल्हेरपासून पन्हाळगडपर्यंत आणि नळदुर्गपासून देवगिरीपर्यंत हे दुर्गरूपी शीलेदार आजही दिमाखाने उभे आहेत. सुमारे ४०० किल्ल्यांच्या अस्तित्वामुळे महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचं स्थान मिळालं आहे.

What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
tiger
नागपूर: पर्यटनाचा पहिलाच दिवस अन् वाघ…
Rain everywhere including Mahabaleshwar Man Khatav in Satara
साताऱ्यात महाबळेश्वर, माण, खटावसह सर्वदूर पाऊस
Bhandara, Skeleton woman, Dandegaon Jungle area,
भंडारा : दांडेगाव जंगल शिवारात अज्ञात महिलेचा सांगाडा; विविध तर्क वितर्कांना उधाण
nar madi waterfall in the historical Naladurg Bhuikot Fort is start
ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु
CM eknath Shinde, seat allocation,
जागावाटपावर उशिरा रात्रीपर्यंत खल, समन्वयाने चर्चा सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
sindhudurg heavy rainfall marathi news,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपले, करूळ व भुईबावडा घाटात दरड कोसळली

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल, वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल आणि नैसर्गिक किंवा बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षणही होईल, अशा ठिकाणीच किल्ले बांधलेले दिसून येतात. म्हणजेच इतिहासात स्वत:चं साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळ प्रसंगी राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या अशा ठिकाणांना किल्ला असं म्हणतात. प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत.

प्रथमं गिरीदुर्गंच, वनदुर्गं द्वितीयकम्

तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्

पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं

सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम्

हेही वाचा >>> सफरनामा: किलबिलाट भटकंती

लाला लक्ष्मीधराने ‘देवज्ञविलास’ या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. गिरीदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून तयार केलेला किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, स्थान्मिश्रकं म्हणजे मिश्रपद्धतीचा किल्ला, संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट असेल तर तो ग्रामदुर्ग, एखादा नुसता कोट किंवा गढी म्हणजे कोष्ट दुर्ग होय.

किल्ला पाहण्याच्या अनेक पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर जाणाऱ्यांमध्ये दोन दिवसांत तीन ते चार किल्ले धावत बघणारे दुर्गभटके असतात. तर काही हौशी ट्रेकर, पिकनिकसाठी येणारे असतात. या सर्वांचा प्रामाणिक उद्देश किल्ला पाहणं हा गृहीत धरला तरी या सर्वांना खरंच नुसता किल्ला पाहायचा असतो असं नाही. इतिहास समजून घेत व भूगोल अनुभवत किल्ल्यांची भटकंती करायला हवी, असं मत पुण्याचा दुर्ग अभ्यासक तथा पर्यटक स्वप्निल खोत मांडतो. ‘किल्ल्याची भौगोलिक रचना समजण्यासाठी गूगल मॅपचा उपयोग करावा. किल्ला कुठल्या डोंगररांगेत आहे, त्याच्या आजूबाजूला कोणते किल्ले, शहरं, बंदरं, बाजारपेठा, घाटमार्ग आहेत ते समजून घ्यावं. किल्ल्याचं भौगोलिक स्थान जेवढं महत्त्वाचं तेवढाच त्याचा इतिहास महत्त्वाचा असतो. किल्ला कुठल्या राजवटीत बांधला, किल्ल्यावर आणि परिसरात झालेली युद्धं, महत्त्वाच्या घटना किल्ल्यावर जाण्यापूर्वीच वाचलेल्या असल्या तर किल्ला समजायला त्याचा चांगला उपयोग होतो. आज गूगल मॅप आणि किल्ल्याचा इतिहास यांची सांगड घातली तर अभ्यासू पर्यटकाला अनेक गोष्टी नव्याने कळतात’ असं स्वप्निल सांगतो.

सातत्याने दुर्ग भ्रमंतीत रमणारा ठाण्याचा गिरीश जोशी सांगतो, ‘किल्ल्यांची भटकंती करत असताना सगळ्यात जास्त अडचण असते ती म्हणजे जोडीदाराची. भर उन्हात वा थंडीच्या वाऱ्यात स्वत:चा जीव दमवायला तयार होणारे, थोडे-वेडे जोडीदार भेटायला नशीबच लागतं. कारण घरच्यांचा विरोध पत्करून, आपला वेळ आणि पैसे खर्च करून किल्ले हिंडायचे तर किल्ल्यांविषयी मनापासून प्रेम असावं लागतं’. दुर्ग भ्रमंतीचं वेड असल्याशिवाय हा थरार अनुभवण्यासाठी उत्साहाने पुढे येणारे कमीच असतात असं तो विशेष नमूद करतो. ‘अशा या किल्ल्यांची भटकंती करत असताना जर किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर किल्ल्याच्या लगत असलेल्या गावातील एखाद्या हुशार वाटाडय़ाला बरोबर घेऊन जावं. तो प्रशिक्षित गाईड नसला तरी किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळण्यात त्याचं आयुष्य गेलं असल्याने त्याला किल्ल्यावर जायच्या वाटा, तेथील सर्व ठिकाणं याची खडान् खडा माहिती असते. त्यामुळे न चुकता कमी श्रमात संपूर्ण किल्ला पाहून होतो. अशा प्रकारे वाटाड्यांबरोबर संवाद साधत फिरताना आपल्याला आजवर नोंद न झालेल्या अनेक जागाही पाहायला मिळतात, हे नक्की लक्षत ठेवा’ असंही गिरीश आवर्जून सांगतो.

किल्ल्यावर भटकंती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयीचं मार्गदर्शन स्वप्निलने केलं. किल्ल्यांवर भटकंती करताना सोबत किमान दोन लिटर पाणी बाळगावं. पूर्ण बाह्या असलेला टी-शर्ट घालावा. फुल पॅन्ट आणि चांगले ग्रीप असलेले बूट घालावेत. प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी. तसंच प्रकर्षाने डिओचा वापर व स्पीकरवर मोठ्याने गाणी लावणं टाळावं. त्याचबरोबर बहुतांश गडांच्या बाबतीत गावकऱ्यांच्या काही मान्यता असतात त्याचा आदर ठेवावा. गडावर नावं लिहू नयेत. पाण्याच्या टाक्यांचा वापर आंघोळी करता करू नये. बुरुज किंवा तटबंदीवर उभं राहणं टाळावं, जेणेकरून अपघात ओढवून घेतला जाणार नाही, अशी माहिती त्याने दिली.

आपण आता गड किल्ले आणि इतर ऐतिहासिक वास्तू फक्त जपू शकतो, त्या अजून मजबूत बनवू शकतो. तसे प्रयत्न, खूप साऱ्या स्थानिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था करत आहेत. आपण त्याचा भाग होऊ शकतो आणि आपल्या शक्तीनुसार मदत करू शकतो. अशा ऐतिहासिक जागांवर अनुचित प्रकार न होऊ देता, त्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि पर्यटन विकास होत राहिला पाहिजे. खुल्या मनानं ही भ्रमंती केली तर किल्ल्यांवरच्या वाटा खूप काही समजावून सांगत असतात, हे लक्षात येतं. तुमच्या आयुष्याशी ऋतुचक्रांचे मेळ घालतात. अवघडल्या क्षणी पाऊल कुठं ठेवावं याची जाणीव करून देतात. आता असे भव्य किल्ले निर्माण करणं आपल्याला शक्य होणार नाही. किमान त्याची जपणूक करत, लोकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता निर्माण करणं आणि आपलाच इतिहास अधिक जवळून जाणून घेणं यासारखं आनंदानुभव नाही. viva@expressindia.com