तत्त्व म्हणून स्वीकारलेली गोष्ट अनेकदा आपल्याला भासमान सत्यात ठेवते. तिथे आपण अधांतरी असतो. पाय जमिनीवर हवे असतील, तर आपल्याला सो कॉल्ड तत्त्वांमधली सत्यासत्यता आपणच शांतपणे पडताळून पाहिली पाहिजे.
ओके.. जवळच्या माणसाला दुखवायला नको म्हणून अर्धसत्याचा/ ‘नरो वा कुंजरो वा’चा आधार घेणं, म्हणजे त्यासाठी खोटं बोलणं ही फार खासगी किंवा नात्याच्या काळजीनं केलेली निवड आहे. पण मागच्या लेखानंतर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचून मी खो खो हसायलाच लागले. स्वत:च्या तापट स्वभावासाठी ‘खरे बोलणे’ ह्य़ा तत्त्वाची पळवाट शोधणं- हे बरं आहे राव! खरं बोलण्यासाठी प्राथमिक तारतम्य सांभाळायलाच हवं ना. आपण सत्य बोलण्याचा अंगीकार केलाय म्हणून स्थळकाळाचं भान सोडून आपलं मत बडबडून येणे असा नव्हे. शिवाय स्वत:च्या तत्त्वाचा, त्याबद्दलच्या अहंकाराचा- दुसऱ्याला कॉम्प्लेक्स देणे असाही नव्हे. ‘खरेश’ असण्याचे झेंडे फडकवण्यासाठी, फक्त बेंबीच्या देठापासून ओरडून आल्यामुळे समाधान वाटत असेल. तर आपल्याला कशाचा तरी न्यूनगंड येत चालला आहे हे वेळीच ओळखलेलं बरं.
मध्ये मी एका लग्नाला गेले होते. अक्षता पडल्यावर नवपरिणित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली. माझ्यापुढचे जे गृहस्थ होते, त्यांनी नंबर आल्यावर कमालच केली. ह्य़ॅ ह्य़ॅ हसत ते हस्तांदोलनासाठी गेले. नमस्कारासाठी वाकलेल्या त्या दोघांच्या पाठीवर षड्डू ठोकल्यासारखे आवाज काढत वधूला सांगायला लागले- ‘‘मी काही टीव्ही बघत नाही. आपल्याला त्या भंगार सीरिअल आवडतच नाहीत. सगळा आचरटपणा आहे. पाचपाचशे भाग झाले तरी लांबड लावतात, संपवत नाहीत. फालतूपणा सगळा!’’ वधू नुकतीच टीव्हीवर झळकायला लागली होती. गोड चेहऱ्याची लाघवी मुलगी- म्हणून तिचं नाव चर्चेत होतं. स्वत:च्या लग्नात मुलाकडच्या अनोळखी काकांची ही मुक्ताफळं ऐकून तिचा गोड चेहरा कसानुसा झाला. कावरीबावरी होत ती मान डोलवायला लागली. भेटायला येणाऱ्यांची रांग खोळंबली. नंतर फोटोला उभं राहून- ‘‘मी उगाचच तोंडावर कौतुक करत नाही. कायम स्पष्ट बोलतो. अच्छा.’’ म्हणत ते गेले.
हे असं खरं बोलणं खरं नाही, खरखरीत वाटतं. चरा उमटवल्यासारखं. कॉलेजमध्ये असताना काही मित्र ‘श्यामची आई’ सिनेमाची थट्टा करत होते- ‘‘श्यामचे वडील येडेच होते. भाजीमध्ये मीठ नव्हतं तर मागायचं ना. बावळटासारखे अळणी भाजी काय खात बसले? ह्य़ामुळे श्यामवर खोटं बोलण्याचे संस्कारच होणार ना!’’ ह्य़ा टारगट हास्यविनोदांमध्ये आम्ही ज्युनिअर कॉलेजची मुलं जरा चपापलो होतो. आपापल्या आईची आठवण झाली. काही कमी-जास्त झालं तर आपण म्हणतो, सांगतो. पण त्यात आदळआपट नसते. रोज न कंटाळता आपल्याला आवडणारा स्वैपाक रांधून घालणाऱ्या आईसाठी आपल्या मनात ओलावा असतो. मला काही माणसं माहिती आहेत- जी पदार्थ मनासारखा झाला नसेल तर अक्षरश: थयथयाट करतात. असं खरं बोलणं उचित वाटतं का? घरी खरं बोलायचं आणि कामावर गेल्यानंतर लाच घ्यायची किंवा टॅक्स बुडवायचा. हा दुटप्पीपणाच नाही का.
पण काही माणसांना स्वत:ला सुचलेलं म्हणून टाकल्याशिवाय चैनच पडत नाही. आपण समोरच्याच्या लक्षात राहिलं पाहिजे असा कांगावखोर प्रयत्न असतो काहीजणांचा. त्यामुळे जास्तीत जास्त खळबळजनक आणि दाहक विधानं केली जातात- इफेक्टसाठी. त्याउलट काहीजणं दिसल्याक्षणी शुगरकोटेड कीर्तन सुरू करतात. ह्य़ा गोड कौतुकात चप्पल, स्वभाव, बॅग, घर, केस, कपडे. आगगाडीसारख्या सुटलेल्या मुद्दय़ांना अंतच नसतो. ती अतिरसाळ खोटी स्तुती ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी वाटते. आपण काहीतरी बोललंच पाहिजे- अशी काही सक्ती आहे का?
प्राणायामामध्ये श्वास घेणे (पूरक) आणि श्वास सोडणे (रेचक) ह्य़ा दोन्हींच्या मध्ये एक शून्य स्थिती असते. त्याला कुंभक म्हणतात. ही पायरी न घेता केलेला प्राणायाम अपूर्ण ठरतो. श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर पुन्हा घेण्यापूर्वी किंचित थांबण्यात मोठी शक्ती असते. पूर्ण भरल्यावर आणि संपूर्ण रिक्त झाल्यावर क्षणकाळ थांबणं आपल्याला खूप काही शिकवून जातं. श्वासाबरोबर शब्दात आणि जगण्यात आपण ते शिकलो तर किती बरं होईल.
सो कुल : खरं’ खरीत
तत्त्व म्हणून स्वीकारलेली गोष्ट अनेकदा आपल्याला भासमान सत्यात ठेवते. तिथे आपण अधांतरी असतो. पाय जमिनीवर हवे असतील, तर आपल्याला सो कॉल्ड तत्त्वांमधली सत्यासत्यता आपणच शांतपणे पडताळून पाहिली पाहिजे.
First published on: 05-07-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: True speaking abrasive