पर्यावरण संवर्धनासाठी अनेक टाकाऊ गोष्टींचा टिकाऊ वापर करण्यासाठी रिसायकलिंगचा आधार घेतला जातो. भंगारात जमा होणाऱ्या प्लास्टिक, कागद अशा कचऱ्याबरोबरच काचेच्या बाटल्यांचं विघटन कसं होत असेल? असा प्रश्न उदित सिंघल या तरुणाला पडला. त्याला फक्त पर्यावरण संवर्धनासाठीच्या चळवळींमध्ये सहभाग घ्यायचा नव्हता. त्याला स्वत:ला काहीतरी यावर ठोस काम करायचं होतं आणि ते त्याने करून दाखवलं…

आपल्या भारतीय मानसिकतेनुसार आपल्याला कोणत्याही गोष्टीची उपयुक्तता संपली की तिचा उपयोग भंगार म्हणून करण्याची सवयच असते. मग तो भंगारवाला त्याचं पुढे काय करत असेल तो भाग वेगळा! अशीच एक भंगारवाल्याकडे हमखास जाणारी गोष्ट म्हणजे काचेची बाटली. एकतर त्यांचा वापर दिवाळीत रॉकेट उडवायला होतो किंवा भंगारात देऊन रुपया मिळवायला. मात्र भंगारवाले त्याचं काय बरं करत असतील? काही ठिकाणी ते रिसायकलिंगला दिलं जातं. मग एक वेळ अशी आली की भंगारवाल्यांनी काचेच्या वस्तू घेणं बंद केलं. त्याला ट्रान्सपोर्ट खर्च जास्त, डिमांड कमी, भंगारवाल्यांनाही त्यातून मिळणारा पैसा कमी आणि मुख्य म्हणजे काळजीपूर्वक हाताळण्याची गरज! मग लोकांनी अशा वस्तूंपासून इतर शोभिवंत वस्तू बनवायला सुरुवात केली, मात्र बहुतेक वेळी काचेच्या बाटल्यांना केराची टोपलीच दाखवली जायला लागली. मग ते कुठल्या तरी डंपिंग ग्राउंडमध्ये जायला लागलं. काचेचं विघटन कित्येक हजारो वर्षं होत नाही. अशा वेळी तो कचरा फक्त ढीग बनत जातो. अशा काचेच्या डोंगरांचं काय करायचं?

हेही वाचा : चोगडा तारा…!

नेमका हाच प्रश्न सोळाव्या वर्षी उदित सिंघलला पडला. त्याने त्यावर विचार सुरू केला. अशा काचेच्या बाटल्यांचं विघटन करणारं मशीन त्याने बनवायचा प्रयत्न केला. बराच काळ यश न मिळूनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. जवळपास दोन वर्षांनंतर त्याचं ‘ग्लास टू सँड’ हे प्रोजेक्ट आकाराला आलं. या दिसायला छोट्याशा मशीनने काचेच्या बाटल्या खायला सुरुवात केली. काचेच्या बाटल्यांचा चुरा करून त्यांच्यापासून वाळू बनवायला सुरुवात केली. त्या मशीनमध्ये काचेची बाटली टाकली की काही मिनिटांत ती भुगा होऊन बाहेर येते. या वाळूचा उपयोग म्हणजे ती मोठ्या प्रमाणात असेल तर भराव म्हणून वापरता येऊ शकते. बाटल्यांच्या रंगाची वाळू मिळत असल्यामुळे शोपीस बनवायलासुद्धा तिचा वापर होऊ शकतो.

उदितच्या या मशीनला पहिलं प्रोत्साहन दिलं ते न्यूझीलंडने! त्याच्या प्रोजेक्टला भारतातल्या न्यूझीलंड हाय कमिशनरने स्पेशल ग्रँट मिळण्याच्या योग्य ठरवलं आणि त्याच्या प्रोजेक्टला आर्थिक हातभार लागला. मात्र न्यूझीलंडवरून या मशीनसाठी लागणारे पार्ट्स इम्पोर्ट करणं हे त्याला अवघड वाटू लागलं. उदितच्या दृष्टीने ते पर्यावरणपूरकही नव्हतं. इतक्या लांबून पार्ट्स इम्पोर्ट करण्यात मोठ्या प्रमाणावर कार्बन फूटप्रिंट वाढत होते. त्याच्या प्रयत्नांना लवकरच यश आलं आणि भारतातच ते पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीकडून त्याने पार्ट्स घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता ‘ग्लास- टू- सँड’ ही पूर्णपणे कार्बन निगेटिव्ह कंपनी बनली आहे.

उदितच्या ‘ग्लास- टू- सँड’ या कंपनीने आतापर्यंत दिल्लीमध्ये चारशेहून अधिक वॉलेंटियर्स जोडले आहेत. अठरा इन्स्टिट्युशन्स त्यांना सपोर्ट करत आहेत. त्यांच्या पार्टनरशिपमध्ये आतापर्यंत ‘ग्लास- टू- सँड’ने तेहतीस हजार तीनशेहून अधिक बाटल्यांना वाळूमध्ये कन्व्हर्ट केलं आहे. ‘जेफ बेजोस हा माझा आयकॉन आहे. लोकांची गरजही त्याने ओळखली आणि त्यातून कमर्शियल मार्केटही उभं केलं. पर्यावरणाविषयी ओरडणाऱ्या नुसत्या गर्दीतल्या एका चेहऱ्यासारखं मला व्हायचं नाही आहे. मला स्वत:हून त्यासाठी काम करायचं आहे’, असं उदित म्हणतो.

हेही वाचा : लोकसंस्कृतीचा जागर!

जगभरात यू. एन.पासून अनेक संस्थांनी त्याच्या कामाची नोंद घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सस्टेनेबिलिटी चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा उदित सिंघल जगभरात पर्यावरण, त्यावरचे उपाय अशा अनेक विषयांवर कॉन्फरन्स, कॉन्क्लेव्ह, फोरम्समध्ये कीनोट स्पीकर म्हणून बोलत असतो. त्याच्या या इनिशिएटिव्हचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाऊन त्यातून पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागेल. शिवाय, त्याच्या म्हणण्याप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण व्हायला हवं म्हणून केवळ मोर्चे काढणाऱ्या गर्दीतला एक चेहरा बनून राहण्यापेक्षा स्वत: प्रत्यक्ष संशोधनातून कार्य उभारण्याची त्याची जिद्द इतरांनाही नवं काही करण्याची प्रेरणा निश्चित देईल.

viva@expressindia.com