|| अनीश दिघे
परवा डिपार्टमेंटला सायकल चालवत जात होतो. भोवतालच्या निसर्गाकडे बघताना मन थोडंसं भूतकाळात झेपावलं. दहावी-बारावीपासूनच परदेशातल्या शिक्षणाविषयी कुतूहल वाटायचं. बारावीत आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो, मात्र त्यात यश आलं नाही. सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश मिळाला. पुढे बायोटेक्नॉलॉजी या विषयाची गोडी लागल्याने त्यातल्या पदव्युत्तर शिक्षणाचा शोध घेऊ लागलो. दुर्दैवाने भारतात या विषयाचे अभ्यासक्रम म्हणावे इतके लक्षणीय नाहीत. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांला जाणवलं की, परदेशात या विषयाचे चांगले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भारत आणि परदेशातील पर्यायांचा पूर्ण अभ्यास करून मग निर्णय घ्यायला घरच्यांनी सांगितलं होतं. त्या दृष्टीने माहिती काढली. काही विद्यापीठांमध्ये अर्ज केले. त्यापैकी शिकागोच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस’मध्ये ‘मास्टर्स ऑफ सायन्स इन केमिकल इंजिनीअरिंग’ या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. प्रवेशप्रक्रिया अगदी सुरळीत झाली.
इथे येऊन तीन वर्ष झाली आहेत. सध्या मी ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन केमिकल इंजिनीअरिंग’ करतो आहे. ते २०२१पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा इथल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या फेसबुक ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. त्यापैकी काहींशी रूम शेअरिंगबद्दल बोलणं झालं होतं. इथे आल्यावर एका लांबच्या नातेवाईकांकडे राहिलो होतो. त्यांनी अगत्याने माझं स्वागत केलं. ते त्या रूमवर मला सोडायला आले तेव्हा प्रत्यक्षातलं चित्र फारच वेगळं होतं. आम्हाला धक्काच बसला. फ्लॅटची अवस्था फारच वाईट होती. त्या मुलांची जीवनशैली चांगली नव्हती, पण दुसरा काही पर्याय नसल्याने मी आणि मुंबईहून आलेला एक असे आम्ही तिथंच नाइलाजाने राहिलो. भाडय़ाने मिळणाऱ्या सायकल घेऊन घराचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या २-३ दिवसांत कमीतकमी ४० ते ५० घरमालकांना फोन केले होते. अखेरीस एक घर मिळालं. तेव्हा एक प्रश्न सुटला असं वाटलं..
सेमिस्टर सुरू झाल्यावर केमिस्ट्री विभागाच्या नियमानुसार ट्रान्सपोर्ट फिनोमेना, थर्मोडायनॅमिक्स आणि मॅथेमेटिकल मेथड्स हे तीन विषय घ्यावे लागणार होते. ते विषय खूप अवघड होते. मला संशोधनात खूप रस होता, मात्र संशोधन करणं हे तितकंसं सोपं काम नाही. मग विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाविषयी जाणून घेतलं. सर्वाधिक संशोधन भावलं ते डॉ. मिनेश सिंग यांचं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या महिन्याभरात माझ्या संशोधनाला सुरुवात झाली. दरम्यान आमच्या घरमालकिणीच्या त्रासाला सुरुवात झाली. वर्षभराच्या लीजमध्ये तिने इतका त्रास दिला की, इथे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या वकिलाची मदत आम्हाला घ्यावी लागली. वकिलांनी आमच्या केसचा अभ्यास करून तिला एक ईमेल पाठवल्यांनतर तिचा त्रास पुष्कळ कमी झाला. या सगळ्या घडामोडींमुळे पहिलं सेमिस्टर भयानक अवघड गेलं.
पुढे माझी संशोधन मार्गदर्शकांशी (रिसर्च अॅडव्हायझर) हळूहळू ओळख झाली. त्यांनी कायमच मला धीर आणि पाठिंबा दिला. त्यांच्या सतत प्रोत्साहन देण्यामुळे आणि कामाच्या धडाक्यामुळे एरवी ज्या संशोधनाला २-३ वर्ष लागतात, तेवढं संशोधन आमच्या ग्रूपने वर्षभरात केलं. इथे ‘अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च सोसायटी’तर्फे विविध परिषदांचं आयोजन वर्षभर केलं जातं. त्यातली एक परिषद मोठी आणि मानाची समजली जाते. त्यात आम्ही संशोधनाच्या पहिल्या वर्षीच तिथे प्रेझेंटेशन (सादरीकरण) दिलं होतं. मी पहिल्या वर्षांत एकूण तीन प्रेझेंटेशन्स केली होती. आमच्या विभागात दर आठवडय़ाला आमच्या क्षेत्रातील दिग्गजांचं प्रेझेंटेशन असतं. त्यांच्याशी थेट संवाद साधता येतो. त्यामुळे या क्षेत्राविषयी अधिकाधिक माहिती कळत गेली.
इथल्या प्राध्यापकांना अभ्यासक्रम ठरवण्याचं, परीक्षा पद्धतीचं, गुणांकनाचं आणि शिकवण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये वेगळेपणा असू शकतो. बहुतेकदा त्यांच्या अभ्यासविषयांनुसार तो तो अभ्यासक्रम आखला जातो. अभ्यासक्रमाचं नाव टिपिकल असलं तरी विविध क्षेत्रांविषयी आम्ही शिकत जातो. वेगवेगळे विभाग आणि विविध संस्थांच्या सहकार्याने संशोधन केलं जातं. त्यात प्राध्यापक जिथे शिकले त्या विद्यापीठांतले विभाग, अमेरिकेतील नॅशनल लॅब आदी संस्था असतात. प्राध्यापकांना त्यांचा ठसा उमटवायला मिळणं ही खूप महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. इथल्या ज्ञानग्रहणाची क्षमता, मेहनतीची तयारी ही भारतीय विद्यार्थ्यांमध्येही आहे. त्यासाठी फक्त आपल्याकडची शिक्षणव्यवस्था आणि शैक्षणिक वातावरण बदलायला हवं.
कॅम्पसमधील बुकशॉपमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांसह यूआयसीच्या जॅकेट, जर्किन वगैरेंवर सवलत मिळते. अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी काही संस्था इव्हेंट्स आयोजित करतात. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठीच्या ‘इंडियन ग्रॅज्युएट स्टुडण्ट असोसिएशन’तर्फे गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी विविध इव्हेंट्स आयोजले जातात. नवीन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जातो. ‘ग्रॅज्युएट स्टुडण्ट काउन्सिल’च्या मोठय़ा इव्हेंट्समध्ये विविध शाखांचे विद्यार्थी आवर्जून सहभागी होतात. इथल्या जिममध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. योग, बॉलीवूड डान्स, मिक्स मार्शल आर्ट्सचे क्लास होतात. दर फॉलच्या सुरुवातीला इन्ट्रा कॅम्पस स्पोर्ट्सचं आयोजन केलं जातं. सगळ्या खेळांच्या स्पर्धा असतात. शिवाय आवडता खेळ खेळणाऱ्यांचा एक क्लब असतो. मी भारतात असताना लॉन टेनिस खेळायचो आणि शिकवायचोही. इथल्या क्लबमध्ये आठवडय़ातून दोन वेळा खेळतो.
शिकागो शहरातील ‘मिलेनिअम पार्क’मध्ये ‘द बीन’ हे प्रसिद्ध शिल्प आहे. त्याशेजारी मिलेनिअम पार्क ऑडिटोरिअम आहे. समरमध्ये विविध प्रकारच्या कॉन्सर्ट तिथे असतात. त्यातल्या बऱ्याच कॉन्सर्ट मोफत असतात. ‘लोलापलोझा’ हा अमेरिकेतील एक मोठा फेस्टिव्हल इथे होतो. मिलेनिअम पार्कसमोरच्या शिकागो सिंफनी ऑर्के स्ट्रामध्ये विविध देशांतील दिग्गज कलाकार सादरीकरण करतात. मला अनुष्का शंकर यांची कॉन्सर्ट ऐकायची संधी मिळाली होती. शिकागो शहरात जगभरातील विविध प्रकारच्या क्युझिनचे प्रकार उपलब्ध होतात. इथली जीवनशैली तुलनेने महाग आहे. मी बरेचदा शक्य तेवढा स्वयंपाक घरीच करतो. कुठेही राहत असलो तरी स्वयंपाक आला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी दहावीतच स्वयंपाक शिकलो होतो. मला मोदक, बासुंदी, खीर, शिरा अशा पक्वान्नांसह सगळा स्वयंपाक करता येतो. काही वेळा नाइट आउटच्या निमित्ताने आम्ही मित्रमंडळी एकत्र भेटतो. मग गप्पा मारताना एकत्र स्वयंपाक करून तो खातो आणि मागचं आवरतोही. गेल्या तीन वर्षांत मी बरीच घरं बदलली. सध्या स्टायपेंड मिळत असल्याने एका स्टुडिओमध्ये राहतो आहे. आता एकटा राहत असल्याने कधीतरी कंटाळा येतो. तर कधी शांतता हवीशी वाटते. भारतात तबला शिकायचो. चार परीक्षा झाल्या आहेत तबल्याच्या. पुढे शिकायची इच्छाही होती. इथे आल्यावर तबला विकत घेतला. त्याचा स्वर खालावल्यावर त्याची ओढ काढायला न जमल्याने तबला वाजवता येत नाही. मी चार वर्ष गरवारेमध्ये ढोलपथकात असल्यामुळे जून-जुलै उजाडल्यावर ढोलाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. छंद जोपासायला वेळ मिळत नाही, कारण संशोधनावर लक्ष केंद्रित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जिमला शक्य तेवढा जातो, मात्र व्यायाम आणि काम या दोन्ही गोष्टींमुळे फारच दगदग व्हायला लागली. मग ठरावीक दिवशी जिमला जायचं ठरवलं. इथे बाइक अर्थात सायकल कल्चर खूप आहे. रस्त्याला सायकल लेन असतेच. लेक मिशिगनच्या काठावरच्या ट्रेलला ‘लेक फ्रण्ट ट्रेल’ म्हणतात. हा ट्रेल एका बाजूने सायकल चालवत पूर्ण करायला चार तास लागतात. या मार्गाने डिपार्टमेंटला जाणं अलीकडेच सुरू केलं आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत सायकलिंग करताना मजा येते.
माझ्या संशोधनाचा विषय फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील स्फटिकरण प्रक्रियेतील विविध स्तर गणिती मार्गाने अभ्यासणे हा आहे. शिवाय आमचे चार प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत. एक पूर्ण होत आला असून दोन संपत आले आहेत तर चौथा प्रोजेक्ट सुरू व्हायचा आहे. वेगवेगळ्या परिषदांचा प्रवास आणि राहण्याच्या खर्चासाठी विद्यापीठाच्या ‘ग्रॅज्युएट स्टुण्डण्ट काउन्सिल’तर्फे अॅवॉर्ड दिली जातात. ही ट्रॅव्हल अॅवॉर्ड मला दोन वेळा मिळाली आहेत. सेमिनार्समधील वक्त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जातात. सुरुवातीच्या काळात एक प्राध्यापक मला ओळखत नव्हते. पुढे आमची ओळख झाली, कारण मी त्यांना चांगले प्रश्न विचारले होते. नंतर बऱ्याचदा आम्ही विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’च्या एक प्राध्यापक आल्या होत्या. त्या बरीच वर्ष संशोधन करतात. संशोधनाच्या दृष्टिकोनाबद्दलच्या माझ्या प्रश्नाचं त्यांना कौतुक वाटलं होतं. पीएचडी मिळाल्यानंतर पोस्ट डॉक करायचा विचार आहे. शक्यतो भारतात परतल्यावर किंवा इथे प्राध्यापकच व्हायचं आहे. पुढेमागे संशोधनासाठी लॅब सुरू करायची आहे. बघा, सायकलवरून मुक्कामी पोहोचलोदेखील. चला, कामाला लागूयात!
कानमंत्र
- भविष्यात येऊ शकणाऱ्या अडीअडचणींचा गांभीर्याने विचार करून ठेवा.
- करिअरचा आलेख अधिकाधिक उंचावण्याच्या दृष्टीने व्यावसायिक स्तरावरच्या नेटवर्किंगची व्याप्ती वाढती ठेवा.
शब्दांकन : राधिका कुं टे
viva@expressindia.com