हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

व्हॅलेटाइन्स डे हा मुळात भारतीय संस्कृतीचा भाग नसला तरी तरुणाईच्या संस्कृतीचा मात्र अगदी महत्त्वाचा घटक बनला आहे. ‘प्रियकर’ आणि ‘प्रेयसी’ अशा आपल्या नवीन अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा दिवस! लाल फुलं, लाल फुगे, लाल कपडे, महागडी चॉकलेटं.. अशा सगळ्याच गोष्टी १४ फेब्रुवारीला एकत्र मेळ घालतात आणि जगभरातले तरुण हा दिवस साजरा करतात.
मात्र विविध प्रकारची जीवनशैली, विचारसरणी आणि पाश्र्वभूमी असलेल्या तरुणांची हा दिवस साजरा करण्याबद्दलची मतं भिन्न आहेत असं त्यांच्याशी संवाद साधल्यावर जाणवतं.
मुंबईसारख्या मोठय़ा आणि काहीशा इंग्रजाळलेल्या शहरातल्या तरुण मुलीचं मत हे मराठमोळ्या पुण्यातल्या तरुणीच्या मतापेक्षा वेगळं आहे का? वयोपरत्वे लग्न ठरलेलं असताना आणि लग्न झाल्यावर या दिवसाचं महत्त्व कमी-जास्त होतं का? छोटेखानी शहरात किंवा खेडय़ात वाढलेल्यांना हा दिवस अधिक खास वाटतो का? अशा अनेक शंकांचा उलगडा त्यांच्या मतांमध्ये दडलेला आहे.
‘व्हॅलेटाइन्स डे हवा का?’ असा प्रश्न आणि त्याचं कारण विचारलं असता ही वेगवेगळी मतं समोर आली.

तन्वी डिंगणकर
सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई</strong>
केवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण शिकलेले, सुजाण नागरिक आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करण्यापेक्षा प्रत्येकच दिवशी प्रेम साजरं का करू नये! ती खास व्यक्ती आपल्याबरोबर आहे या अनुभवाचं महत्त्व या दिवसापेक्षा कितीतरी जास्त आहे.

उत्कर्षां रानडे
पुणे (विद्यार्थिनी)
मी आधी अमेरिकेत आणि आता पुण्यात शिकतेय. या दिवसाचा उदो उदो करावासा मला तरी वाटत नाही. माझ्या मते, या दिवसाची काहीच आवश्यकता नाही. प्रेम व्यक्त करायचाच असेल तर ते कुठल्याही दिवशी करावं. या दिवसाचा गाजावाजा करणं मला पटत नाही.

मिथिलेश मयेकर
बदलापूर (विद्यार्थी)
मला वाटतं या दिवसाला महत्त्व द्यायला हवं. न लाजता, न डगमगता माझ्या मनातलं जर तिला सांगायचं असेल तर एक तरी असा महत्त्वाचा दिवस असायला काय हरकत आहे? माझ्या दृष्टीने हा दिवस गरजेचा आहे.

शिवानी बोरगावकर
मुंबई (इंजिनीअर)
आयुष्य हे धकाधकीचं असतं. अशा वेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी या एका दिवसाची वाट बघणं किंवा त्याला अमाप महत्त्व देणं याची गरज नाही. आपल्या धावपळीच्या आयुष्यात मनातला एक लहानसा आवाज ऐकून प्रेम व्यक्त करून टाकावं! तोच दिवस विशेष ठरेल. मग वेगळ्या ‘व्ही-डे’ची गरजच काय?

नीता कुलकर्णी
मुंबई (डॉक्टर)
प्रेम आणि लग्न हे अतूट समीकरण आहे. लग्न झाल्यानंतर प्रेमाची व्याख्या एकेकी बदलते. मात्र पुन्हा जुन्या दिवसांसारखं मनमोकळेप्रमाणे प्रेम व्यक्त करायला आणि साजरं करायला असा एखादा दिवस हवाच. या दिवसाची बरोबरी करू शकेल, असा एकही सण, भारतीय संस्कृतीत नाही याची मात्र खंत वाटते.

राहुल कुलकर्णी
केरुर – कर्नाटक
हिमतीने प्रेम व्यक्त करायला एखादा खास दिवस गरजेचा आहे. भेटकार्ड, भेटवस्तू आणि इतर वायफळ खर्च या चक्रात न अडकता, या दिवसाच्या मूळ उद्देशाकडे बघता, तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं.

Story img Loader