रसिका शिंदे
प्रेमी युगुलांसाठी १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’ हा फार महत्त्वाचा असतो. मुळात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच कॉलेजमध्ये ओळीने विविध डेज साजरे केले जात असल्याने आनंदी आनंद चोहीकडे असंच वातावरण असतं. या आनंद सोहळय़ाची एका अर्थी सुखद किंवा काहींच्या बाबतीत ब्रेकअप सांगता करणारा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. या खास दिवसासाठी आपला लुक कसा असेल? कोणते कपडे घालावेत इथपासून ते प्रत्यक्ष सेलिब्रेशनपर्यंतची तयारी आणि त्यासाठीचं नियोजन कसं करायचं हा विचारांचा भुंगा आपल्याला सतावत असतो. या विचारांचा ताण कमी करत खास व्हॅलेंटाइन लुकसाठीच्या या काही सोप्या टिप्स..
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कॉलेजमधील तरुण-तरुणी आपल्या प्रियकर वा प्रेयसीकडे मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर कुणी गेली अनेक र्वष एकमेकांची लाभलेली साथ सेलिब्रेट करतात. तसं पाहायला गेलं तर वर्षांचे ३६५ दिवसही आपण प्रेमाचा उत्सव साजरा करू शकतोच; परंतु फेब्रुवारी महिना हा गुलाबी थंडीचा असल्याने एक वेगळीच प्रेमाची धुंदी हवेत असते. आणि अशा वातावरणात येणारा हा प्रेमाचा दिवस साजरा करण्याचा आनंदही खास. त्यामुळे या दिवशी आपल्या जोडीदाराला इम्प्रेस करण्याची एकही संधी दवडण्याची प्रेमी युगुलांची तयारी नसते. त्याची सुरुवात ही तुमचा स्वत:चा लुक कसा असावा, इथपासून केली जाते. व्हॅलेंटाइन डे बाहेर सेलिब्रेट करण्यापासून ते अगदी घरात बसून रॉमकॉम एन्जॉय करण्यासाठीही तुम्ही तुमचा खास लुक असा सहज डिझाईन करू शकता..
वनपीस आणि मिसमॅच दागिने..
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी सर्वसाधारणपणे तरुणींची पसंती ही लाल रंगाच्या वनपीसला असते. त्यामुळे या लाल रंगाच्या वनपीससोबत तुम्ही मिसमॅच रंगाचे कानातले घालून तुमचा लुक आणखीनच स्टायलिश करू शकता. अर्थात, वनपीसचे रंग, प्रिंट, स्टाइल अशा सगळय़ा बाबतीत वैविध्य असलेले डझनावारी पर्याय मार्केटमध्ये परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, रेड सर्कल ड्रेस, बो बॅक मिनी ड्रेस, वन शोल्डर शिफॉन मिडी ड्रेस, फ्लोरल लॉन्ग स्लिव्ह ड्रेस, लेयर मॅक्सी ड्रेस, वेल्वेटचे वनपीस असे विविध प्रकारचे लाल रंगाचे वनपीस तुम्ही परिधान करू शकता. वेल्वेटचे ड्रेसेस वा वनपीस सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. या वनपीसवर हिरव्या, मस्टर्ड, ऑकर यलो अशा विविध रंगांचे छोटे कानातले किंवा खडय़ांचा नाजूक नेकपीस, खडय़ांचेच नाजूक कानातले आणि हातात ब्रेसलेट असा हटके लुक तुम्ही करू शकता. अर्थात, लाल रंग नको असं वाटत असेल तर त्याऐवजी पेस्टल वा ब्राइट रंगातील सुंदर वनपीसही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
स्कर्टची हटके फॅशन
याव्यतिरिक्त पुन्हा एकदा स्कर्टची फॅशन तरुणींमध्ये प्रसिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी खास लुक असावा असे वाटत असेल तर यात ए-लाइन, फ्लेयर्ड, प्लीटेड स्कर्ट, पेन्सिल स्कर्ट, सॅटिन स्कर्ट अशा वेगवेगळय़ा पॅटर्नचे स्कर्ट तुम्ही परिधान करू शकता. या स्कर्टच्या पॅटर्ननुसार त्यावर क्रॉप टॉप किंवा हाय नेकचे टॉप, टी टॉप आणि त्यावर सुंदर स्कार्फदेखील तुम्ही पेअर करू शकता.
कम्फर्टेबल जम्पसूट
कोणताही समारंभ असो किंवा खास दिवस असो.. अलीकडे तरुणी कपडय़ांमध्ये कम्फर्ट शोधताना दिसतात. आणि तो कम्फर्ट जीन्स, टी-शर्टनंतर जम्पसूटमध्ये अधिक येतो असे कित्येकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्ही ‘व्हॅलेंटाइन डे’ला जम्पसूटमध्ये ऑफ शोल्डर, प्रिंट पॅटर्न, चोकर नेक, बॉयलर सूट, रॉम्पर, स्किनी जम्पसूट, वाइड लेग, प्लेसूट असे विविध प्रकारचे लाल रंगाचे किंवा मल्टी कलर जम्पसूट तुम्ही परिधान करून लुकमध्ये वेगळेपणा साधू शकता. जम्पसूटमध्येही वेल्वेट जम्पसूट सध्या लोकप्रिय असून वाइन कलर वाइड लेग जम्पसूट ट्रेण्डी आहे. शिवाय, आपलं व्यक्तिमत्त्व एकाच वेळी दमदार आणि आकर्षक दिसावं असं वाटल्यास पॅन्टसूटचाही पर्याय उपलब्ध आहे. यातही नेहमीच्या ग्रे, बीज, ब्लॅक या रंगांना फाटा देत पिंक वेल्वेट वाइड लेग पॅन्ट हाही उत्तम पर्याय आहे. हाय राइज फिट पॅन्टवर त्याच रंगाचा शर्ट आणि जॅकेटही पेअर करता येईल.
पारंपरिक वेश आणि व्हॅलेंटाइन डे
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा विचार करताना सर्वसाधारणपणे वेस्टर्न पॅटर्नच्या ड्रेसवर अधिक भर दिला जातो. मात्र भारतीय स्त्रीचं सौंदर्य पारंपरिक पेहरावातही तितकंच खुलून दिसतं. त्यामुळे पारंपरिक ड्रेसमध्येही व्हॅलेंटाइन डे साजरा करता येईल. लाल रंगाचा चुडीदार ड्रेस, अनारकली ड्रेस, चिकनकारी कुर्ता किंवा लाल रंगाची शिफॉन अथवा सिल्कची साडी परिधान करून तुम्ही तुमचा व्हॅलेंटाइन लुक अधिकच खुलवू शकता.