प्राथमिक शाळेत शिकत असताना वर्गात पहिला आल्यावर भेट म्हणून त्याला ‘वनस्पती आणि प्राणी’ हे पुस्तक मिळाले. छोटा चिंतन हे पुस्तक वाचण्यात रमला आणि इथूनच त्याला जीवशास्त्र आणि नैसर्गिक विज्ञान या विषयात रस निर्माण झाला. हळूहळू वनस्पती आणि निसर्गाशी त्याचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. बालपणी निसर्गात रमणारा वसईचा चिंतन भट्ट आज ‘वनस्पतीशास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंतन हा मूळचा वसईचा. त्यामुळे समुद्रकिनारे, कांदळवन क्षेत्र, वसईचा किल्ला किंवा तुंगारेश्वर अभयारण्य असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या परिसरातच तो लहानाचा मोठा झाला. आजूबाजूला नुसता निसर्ग असून उपयोग नाही, चिंतनला स्वत: निसर्गाची आवड असल्याने तो सातत्याने भटकंती करत राहिला. यामुळेच त्याच्या मनात निसर्गाबद्दल विशेष ओढ निर्माण झाली आणि म्हणूनच चिंतनने पुढे जाऊन ‘बीएस्सी’ या विषयातूनच शिक्षण घ्यायचे ठरवले. मुंबईतील डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून त्याने बीएस्सीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात शिकत असताना आपल्याला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे दोन्ही विषय शिकवणाऱ्या अनेक उत्कृष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले, असे चिंतन सांगतो.

वनस्पतीशास्त्रात चिंतनला सगळ्यात जास्त रस होता. बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना चिंतनला महाविद्यालयीन स्तरावर सुवर्णपदकदेखील मिळाले आहे. बीएस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चिंतनने मुंबईच्या वृक्ष गणना प्रकल्पासाठी सीईईडी इंडिया, मुंबई येथे वृक्ष गणनाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिथे काही काळ काम केल्यानंतर या क्षेत्रात आणखी काही वेगळे करायचे असेल तर त्यासाठी पदव्युत्तर पदवी मिळवण्याची आवश्यकता आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे पुढचे पाऊल म्हणून त्याने सेंट झेवियर्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र याच विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या अभ्यासक्रमा दरम्यान महाविद्यालयाकडून वनस्पती वर्गीकरणाचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे वनस्पती वर्गीकरण विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असल्याचे चिंतन सांगतो. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षात विरारमधील महाराष्ट्र वन विभागाच्या प्रकल्पात डॉ. राजदेव सिंग यांना चिंतनने मदत केली. त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करत असतानाच त्यांच्याकडून चिंतनला फील्ड वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञाचे काम काय असते याचे प्रशिक्षणदेखील मिळाले. ‘ज्या वातावरणात मी वाढलो त्याचा आणि पदव्युत्तर पदवी दरम्यान मिळालेल्या प्रशिक्षणाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यामुळे वनस्पती वर्गीकरणाबाबत माझी आवड आणखी वाढली’ असे चिंतनने सांगितले.

पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर चिंतनने अलिबाग येथील तीनवीरा धरणाजवळील वनस्पती उद्यानाचे मूल्यांकन करण्यासाठी सीईआरई इंडियामध्ये इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच गुजरातमधील गांधीनगर येथे जीईईआर फाउंडेशनबरोबर काम करण्यास त्याने सुरुवात केली. तिथे त्याने कोस्टल प्लांट एन्युमरेशनवर काम केले. याबाबत ‘पिक्टोरियल गल्फ ऑफ कच्छ’, गुजरातच्या ‘कोस्टल फ्लोरा टू पिक्टोरियल गाइड’ या पुस्तकांसाठी त्याने मार्गदर्शनदेखील केले आहे. चिंतनने डायटॉम्सवरदेखील काम केले आहे. डायटॉम्स हे एकपेशीय सूक्ष्म शैवाल आहेत, जे सिलिकापासून बनलेले असतात. त्यांना अनेकदा ‘टाइनी लिव्हिंग ग्लास हाऊसेस’ असे संबोधले जाते. डायटॉम्सवर आणखी काय करता येईल या विचारात असलेल्या चिंतनने आघारकर संशोधन संस्थेच्या प्रकल्पात सहभाग घेतला आणि तिथे त्याने काम सुरू केले. या प्रकल्पात त्याने गोड्या पाण्यातील डायटॉम्सचे वर्गीकरण आणि पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केला. डायटॉम्सच्या एका नवीन प्रजातीचा शोध घेण्यासाठी त्याने अनेक नमुन्यांची निरीक्षणेदेखील घेतली. याचबरोबर चिंतन आणि त्यांच्या टीमने मेघालयातील मावसमई गुहांमधून एक नवीन प्रजाती शोधली आहे. ही प्रजाती ज्या गुहेत सापडली होती, त्या गुहेवरूनच त्याचे नाव ठेवण्यात आले. या दरम्यान पुणे येथील एआरआयमध्येही डायटॉम्सवर काम करण्याची संधी मिळाली होती. तिथे काम करण्याचा अनुभवही रोमहर्षक होता, असे चिंतनने सांगितले.

हेही वाचा

‘निसर्गातील सर्वच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे’ असे सतत म्हणणाऱ्या चिंतनला सूक्ष्म शैवाल असो किंवा फुलझाडं असोत त्यांचादेखील बारकाईने अभ्यास करायचा आहे. चिंतनचे फुलपाखरांशी संबंधित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अलीकडेच गुजरात कच्छ प्रदेशातून आलेल्या फुलझाडांच्या नवीन प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. या नवीन प्रजातींचे वर्णन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याची नोंद घेता आली हेदेखील खूप महत्त्वाचे आहे, असेही त्याने सांगितले. सध्या चिंतन स्वतंत्रपणे संशोधक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. तसेच तो पुण्यातील पर्यावरण सल्लागार संस्थेच्या ‘द बेस’ येथेही प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहतो आहे.

जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करणे हा संवर्धनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. वनस्पतींचा अधिवास जतन केल्याने त्यांच्याशी संबंधित प्रजातीदेखील वाचतील. अनेक प्रजाती या वनस्पतींवर अवलंबून असतात आणि एका किंवा दुसऱ्या प्रकारे त्याच्याशी जोडल्या जातात. निरोगी परिसंस्था आणि पर्यावरण जैवविविधतेला आधार देते. प्रभावी संशोधन, विज्ञान संवाद, निसर्ग शिक्षण आणि जागरूकता यांचे संयोजन समाजामध्ये निसर्ग आणि पर्यावरणशास्त्राविषयीची समज निर्माण करण्यास उपयुक्त ठरते. ‘मी निसर्गाची खरी संपत्ती जतन करायला हवी यावर ठाम विश्वास ठेवतो’ असे सांगणारा चिंतन तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण या विश्वात हिरे आणि सोन्यापेक्षा झाडेच अधिक दुर्मीळ आहेत आणि हेच चिरंतन सत्य आहे असे ठामपणे सांगतो.

viva@expressindia.com