मी १९ वर्षांची आहे. माझी उंची ५.४ फूट असून वजन ४८ किलो आहे. माझा रंग सावळा आहे. मी जीन्समध्येच कंफर्टेबल असते, पण नेमके कुठले टॉप्स घालावेत, कुठले मला शोभून दिसतील, कुठल्या रंगाचे टॉप्स, ड्रेसेस मी जास्त वापरले पाहिजेत ते सांगा.
रश्मिता

प्रिय रश्मिता,
तुझ्या वर्णनावरून तू थोडी बारीक आहेस असं वाटतं. त्यामुळे तू कुठल्याही प्रकारचे कपडे छान कॅरी करू शकशील यात शंका नाही. जीन्स हे खरंच खूप व्हर्सटाइल आणि खूप सोयीचं आऊटफिट आहे. व्हर्सटाइल यासाठी म्हटलं की, जीन्समध्ये तुम्ही तुम्हाला हवा तसा लूक आणू शकता. म्हणजे जीन्स कॅज्युअल, हल्ली फॉर्मलही, सुंदर, स्मार्ट, कूल, गोड अशी सगळी रूपं तुम्हाला देऊ शकते. सोयीची यासाठी की, तुम्ही त्यावर कुठल्याही प्रकारचा टॉप घालून तुम्हाला हवा तो लूक आणू शकता. कॉलेजमध्ये घालण्यासाठी जीन्स आणि टी-शर्टसारखा कंफर्टेबल आणि कूल पर्याय दुसरा नाही. प्रिंटेड गोल गळ्याचे टी-शर्ट स्मार्ट आणि कॅज्युअल लूक देतात. ते कॉलेजच्या मुलींना अगदी शोभून दिसतात. फक्त खूप भडक रंग- म्हणजे लाल, केशरी, पिवळा हे वापरू नकोस. बाकी सगळे रंग तुला शोभून दिसतील, कारण तू तशी बारीक आहेस.
टॉपमधल्या वेगवेगळ्या स्टाइल्स तू ट्राय करू शकतेस. काउल नेक, हॉल्टर नेक, स्पगेटी, जॅकेट स्टाइल असे टॉप फॅशनेबल म्हणून वापरू शकतेस. या समर फॅशन सीझनमध्ये जॉर्जेट टॉप्स खूप फॅशनमध्ये आले आहेत. फक्त त्यासाठी थोडे फ्रेश कलर निवड. झगमगीत रंग (नियॉन कलर)सुद्धा ट्राय करायला हरकत नाही. बोल्ड प्रिंट, लेस आणि बीड्स लावून सजवलेले टॉप्स मार्केटमध्ये चलतीत आहेत. फक्त नियॉन ग्रीन वापरू नको. तो खूप भडक वाटेल. बाकी सगळे रंग आणि वर उल्लेखिलेल्या सगळ्या स्टाइल्स तुला शोभून दिसू शकतील अशा आहेत.
तुला थोडा फॉर्मल लूक हवा असेल तर कॉलरचा टॉप, स्मार्ट- कॅज्युअल शर्ट (कॉलर असलेला) वापरू शकतेस. मुलींच्या कॅज्युअल शर्टमुळे थोडासा फॉर्मल तरीही स्मार्ट लूक येतो. फक्त या लूकसाठी शर्टचे रंग फॉर्मल कलर वापरले पाहिजेस. म्हणजेच पांढरा, काळा, ऑफ व्हाइट, पीच, नेव्ही ब्लू, इंग्लिश ग्रीन, ग्रे असे रंग फॉर्मल वाटतात. जीन्सवर घातलेला शॉर्ट कुडता काही आजकाल फार फॅशनमध्ये नाही, पण तू कुडत्यामध्ये थोडे मॉडर्न बदल करून.. म्हणजे नेकलाइन, कट, डिझाईन वेगळं करून घेऊन तेही कॉम्बिनेशन वापरू शकतेस.
महत्त्वाची एकच गोष्ट. तू जे घालशील त्यात कंफर्टेबल असली पाहिजेस, तरच आत्मविश्वास येईल आणि तो असला की, तू काहीही, कोणतेही कपडे कॅरी करू शकतेस. चीअर्स!!

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com