स्पोर्ट्समन आणि त्यांचे फॅन अर्थात चाहते हे समीकरणच भन्नाट असतं. आपल्या लाडक्या माणसाची प्रत्येक गोष्ट ते डिव्होटेडली फॉलो करतात. जगविख्यात लिओनेल मेस्सीचे चाहते जगभर पसरले आहेत. असाच एक इटुकला चाहता. या चाहत्याच्या वेडाची आणि मेस्सीमहतेची ही गोल कहाणी.
नाव- मुर्तझा अहमदी, वय- ५. देश- अफगाणिस्तान. आईवडिलांच्या सान्निध्यात घरात बागडण्याचं अल्लड वय. या व्हायरली व्हच्र्युअल जगात कोण प्रसिद्ध पावेल काही सांगता येत नाही. व्हायरल स्वरूपाच्या तापाने आजारी पडू शकतो अशा वयाचा हा चिमुरडा जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा केंद्रबिंदू झाला आहे.
अफगाणिस्तानात फुटबॉल संस्कृती नाममात्र. काबूल शहरातल्या फुटबॉल मैदानाचा उपयोग तालिबानी शिरच्छेद करण्यासाठी करतात. गोळ्या, बंदुका, शस्त्रं, रक्तपात, अपहरण, ओलीस, मारहाण अशा भयप्रद जगात अहमदी कुटुंबही कोंडय़ाचा मांडा करून जीव जगवतं. घराबाहेरच्या जगात काहीही घडू शकतं, त्यामुळे मुर्तझाला टीव्ही बघण्याची सवय जडली. मोजक्या टीव्ही चॅनेलांपैकी एकावर त्याला मेस्सी दिसला. भुरभुरणारे ब्राऊन रंगाचे केस, लोभसवाणं हास्य, हरणासारखे काटक आणि तुफान वेगाने पळणारे पाय आणि सातत्याने गोल करण्याची माइंड ब्लोइंग पॉवर. या सगळ्याची मुर्तझाला भुरळ न पडती तरच नवल. मेस्सीचा पांढऱ्या रंगावर आकाशी स्ट्रिप्स असलेला अर्जेटिनाचा कुल जर्सी तर त्याला प्रचंडच आवडला. मेस्सीची गोल करण्याची आणि त्यानंतरच्या सेलिब्रेशनची स्टाइल त्याने फॉलो केली. घरासमोरच्या जागेत हा प्रतिमेस्सी हुंदडायला लागला. पाच वर्षांच्या मुलाला काय कळतंय फुटबॉल? मैदानात एवढय़ा कल्लोळात गोल करणारा मेस्सी आहे हे आम्हालाही धड कळत नाही, असे प्रश्न जिज्ञासूंना पडू शकतात; पण दुसरीतला नचिकेत ‘कटय़ार’मधलं ‘सुरत पियाँ’ सुरातालात तोंडपाठ म्हणू शकतो, तर पाच वर्षांचा मुर्तझा मेस्सीमय होऊ शकतोच ना!
आवडीचं रूपांतर मागणीत होतं. मुर्तझाने मेस्सीसारखा जर्सी पाहिजे, असा हट्ट धरला. रोजीरोटीचीच भ्रांत असल्यामुळे वडिलांनी जर्सीचं जमणार नाही म्हणून सांगितलं. स्वारी हिरमुसल्यामुळे मोठा भाऊ हुमायूनने शक्कल लढवली. ब्रँडेड जर्सीच्या धर्तीवर त्याने पांढऱ्या-निळ्या प्लॅस्टिक पिशव्यांपासून जर्सी तयार केली. स्वारी खूश झाली. मेकशिफ्ट जर्सी घालून मुर्तझा खेळत असल्याचे फोटो हुमायूनने सोशल मीडियावर टाकले. गोल चेहऱ्याचा गुटगुटीत आणि प्लॅस्टिकची जर्सी घातलेला मुर्तझा इन्स्टंट हिट झाला. हे फोटो थेट मेस्सीपर्यंत पोहोचले. मेस्सीची या गोंडस चाहत्याशी बार्सिलोनात भेट व्हावी यासाठी अफगाणिस्तानातील स्पेनच्या वकिलातीने प्रयत्न सुरू केले. जेमतेम तग धरून असलेल्या अफगाणिस्तान फुटबॉल फेडरेशनची त्यांनी मदत घेतली. मुर्तझा आणि कुटुंबीयांना विशेष बाब म्हणून व्हिसा देण्याची तयारी झाली. मात्र परदेशात मेस्सीची भेट घेणं मुर्तझाच्या कुटुंबीयांना परवडणारं नसल्याचं स्पष्ट झालं. मग हे फोटो फोटोशॉप असल्याच्या वावडय़ा उठल्या. इराकमधल्या कुर्द भागातला हा फोटो असल्याचं सांगण्यात आलं; पण दूर ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुर्तझाच्या काकांनी आपला भाऊ अरिफशी बोलून हे फोटो मुर्तझाचेच आहेत ना याची शहानिशा केली. तो मुर्तझाच आहे हे पक्कं झाल्यावर त्यांनी बीबीसी वाहिनीशी संपर्क केला. त्यांनी हे अपडेट मेस्सीपर्यंत पोहोचवले. मेस्सी युनिसेफच्या लहान मुलांसाठीच्या विशेष योजनेचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. त्याची टीम कामाला लागली. अफगाणिस्तानतल्या पूर्व गझनी प्रांतातल्या जाघोरी जिल्हय़ात प्लॅस्टिक जर्सी घालणारा मुर्तझा राहतो याची पडताळणी करण्यात आली. युनिसेफच्या चमूला घेऊन मेस्सीची टीम जाघोरीत पोहोचली. मेस्सीचा ऑटोग्राफ आणि संदेश असलेली ब्रँडेड जर्सी मुर्तझाला देण्यात आली. स्वारीने लगेच ती घालून मिरवायला सुरुवात केली. आठवणीने हुमायूनलाही जर्सी दिली गेली. खुद्द मेस्सी मुर्तझाला भेटेल अशी ग्वाही त्याच्या टीमने कुटुंबीयांना दिली आहे. मेस्सी माणूस म्हणूनही मोठा आहे हे सिद्ध झालं. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचं ‘खेळ मनं जोडतात’ ही थिअरी, कारण फुटबॉलचा चेंडू गोल, पृथ्वी गोल- दुनियाही ‘गोल’!