आटपाट नगरीचं रम्य चित्र आपल्यापुढे अनेक जण उभं करतात. मात्र या कोशातून बाहेर आलं की दु:खनामक जळजळीत वास्तवाची जाणीव होते. सुख कसं मिळावं, सुखात कसं रहावं याचे शेकडो फंडे उपलब्ध आहेत. मात्र दु:खाला कसं सामोरं जावं याबाबत ठोस शिकवण मिळतच नाही. दु:खातून सावरण्याची शिकवण स्वत:च्या कृतीद्वारे देणाऱ्या दोन जिद्दी स्त्रियांची ही कहाणी..
ही बातमी आहे गेल्या वर्षीची. जम्मू-काश्मीर राज्यातल्या कूपवाडा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल चमूचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ३८ वर्षांच्या संतोष यांच्या मागे होती त्यांची पत्नी, दोन मुलं आणि कुटुंब. ‘अमन की आशा’ आणि ‘मैत्रीचे सेतू’ असे उपक्रम राबवले जातात. मात्र अनागोंदी आणि अराजकतेचे प्रतीक असलेल्या पलीकडल्या टापूतून आपल्याप्रति विखारच बाहेर येतो. याच विखारातून आपल्या सैनिकांना लक्ष्य केलं जातं. आपल्यासमोर येतात फक्त बातम्या- एक शहीद झाल्याची आणि दुसरी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कारांची. बातमी वाचून किंवा बघून क्षणभर आपलं रक्त उसळतं. मात्र दुसऱ्याच क्षणी आपण असाहाय्य असल्याचं लक्षात येतं. गेलेल्या वीराप्रति आपण हळहळ व्यक्त करतो आणि कामाला लागतो. त्या कुटुंबीयांचं, मुलांचं पुढे काय होतं हे आपल्यापर्यंत पोहचत नाही किंवा आपणही ते जाणून घेण्याच्या प्रयत्नात कमी पडतो. साताराजवळच्या पोगारवाडीचे संतोष आपल्यासाठी लढताना गेले. ‘भारतीय लष्कर संतोष यांच्यासाठी सर्वस्व होतं. ते त्यांचं पहिलं प्रेम होतं. त्या प्रेमाने त्यांना नेलं. मात्र त्या प्रेमाचा वारसा जपण्यासाठी मला भारतीय लष्करात दाखल व्हायचे आहे’, हे शब्द होते स्वाती यांचे- संतोष यांच्या पत्नी. माझी दोन्ही मुलंही लष्करात जातील असंही त्यांनी सांगितलं. ज्या घरातला माणूस लष्करात असतो ती घरंही ‘तय्यार’ असतात, त्याचा हा प्रत्यय.
एमएसडब्ल्यू अर्थात मास्टर्स इन सोशल वर्कची डिग्री आणि केंद्रीय विद्यालयात शिक्षिका असलेल्या स्वाती दु:खद घटनेनंतर महिन्याभरात पुण्याला आल्या. ‘सव्र्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ परीक्षेच्या तयारीला लागल्या. अभ्यासासाठी क्लासही लावला. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या मुलांची कुटुंबीयांनी काळजी घेतली. मात्र त्यानंतर मुलगी कार्तिकी डेहराडूनच्या तर मुलगा स्वराज्य पांचगणीच्या बोर्डिग स्कूलमध्ये आहे. दु:ख होतंच, मुलांची काळजी होती, घराकडेही लक्ष द्यायचं होतं. पण कर्तेपण सांभाळत स्वाती यांनी परीक्षेचे पाच खडतर टप्पे पार केले. स्वाती यांचा निर्धार, लष्करी अधिकाऱ्यांनी स्वाती यांच्या कामगिरीबाबतचा दिलेला संदर्भ हे लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी परीक्षेसाठी असणारी वयाची अट शिथिल केली. सोमवारी मेडिकल टेस्टचा टप्पाही स्वाती यांनी यशस्वीपणे ओलांडला. आता त्या प्रशिक्षणासाठी चेन्नईला रवाना होतील. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढच्याच वर्षी स्वाती लष्करात ऑफिसर म्हणून रुजू होऊ शकतात. नवरा गेल्यानंतर स्त्रीच्या नशिबी उपेक्षेचं जिणं येतं. उपेक्षा, सहानुभूती यांच्या पल्याड जात स्वाती यांनी केलेला विचार आणि कृती त्यांच्या विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना पाठिंबा देणारे घरचेही तितकेच मोलाचे. ‘दहशतवाद्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केली जाते. तेही आपल्यासारखीच माणसं असतात. त्यांना शिक्षित करून त्यांच्यासाठी काही काम करण्याची इच्छा आहे’, हा उद्देश बाळगणाऱ्या स्वाती विचारांना प्रत्यक्षात आणू शकतील.
दुसरी कहाणी आहे वैष्णवी महाजनची. २०१४ मध्ये पोलीस भरतीदरम्यान तिचा भाऊ साईप्रसाद कोसळला आणि गेला. साईप्रसादला पोलीसच व्हायचं होतं. तेच त्याचं स्वप्न होतं. भावाचं स्वप्न आपण पूर्ण करायचं असं वैष्णवीने ठरवलं. तिने बी.कॉम. पूर्ण केलेलं आणि सी.ए.च्या परीक्षेसाठी तयारी सुरू केलेली. वडील रिक्षाचालक. कमावणारे ते एकटेच. चाळीतल्या घरी आई आणि दोन बहिणी. पोलीस भरतीसाठी प्रचंड शारीरिक क्षमता लागते. शारीरिक श्रमाची कोणतीही पाश्र्वभूमी नसतानाही वैष्णवी कामाला लागली. धावण्याचा अथक सराव केला. विविध मैदानी खेळ शिकली. शारीरिक क्षमतेच्या मुद्दय़ावर मागे पडायला नको म्हणून सगळे प्रयत्न केले. हे प्रयत्न फळाला आले आणि वैष्णवी आता कॉन्स्टेबल म्हणून रुजू होणार आहे.
दु:ख प्रत्येकाच्या वाटय़ाला येतंच. पण आपल्याकडे दु:खाचंही भांडवल केलं जातं. आपण कसे समदु:खी किंवा तुझ्या दु:खापेक्षा माझं दु:ख मोठं आहे अशी वर्णनं रंगतात. क्षुल्लक वाटाव्या अशा दु:खासाठी मंडळी जीव देतात, त्यांना नैराश्य येतं. एकुणातच दु:ख म्हणजे विस्कटून जाणं, कोलमडणं अशी शिकवण बिंबवली जाते. या दोघांनी आभाळाएवढं दु:ख झेललं. पण दु:खामुळे कुढावं, खंगत जावं, लोकांनी करुणा भाकावी असं या दोघींनाही वाटलं नाही. माणूस गेल्याची सल भरून न येणारी आहे. पण तेच कवटाळून बसण्याऐवजी त्या माणसाचं स्वप्न साकारू असा विचार त्या दोघींनी केला. अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीऐवजी त्यांनी अथक परिश्रमातून स्वबळावर नोकरी कमावली. दु:खाचा डोंगर कोसळलेलं आपलं घर सावरलं.
व्हच्र्युली जगात वाट्टेल ते व्हायरल होतं. व्हायरल होणारा कण्टेण्ड सत्यासत्यतेच्या गाळणीतही प्रत्येक वेळी गाळला जात नाही. दिसेल ते फॉरवर्ड करायच्या आजच्या जमान्यात या दोघींच्या गोष्टी फॉरवर्ड झाल्या. पण त्या नेहमीच्या फॉरवर्ड्सपेक्षा नक्कीच वेगळ्या होत्या. व्हायरलतेच्या रूढ निकषांवर या दोघींची कहाणी मागेच आहे. परंतु काही वेळा आकडय़ांपेक्षा विचार महत्त्वाचा असतो. मोहम्मद अलींना ‘ज्येष्ठ फुटबॉलपटू’ म्हणून भावपूर्ण आदरांजली वाहणाऱ्या बाळबोध आणि मंदोत्तम व्यक्ती व्हायरल झाल्या आहेत. परंतु दु:ख कसं पेलावं हे स्वत:द्वारे सिद्ध करणाऱ्या या दोन रणरागिणींना सलाम करणे आपले कर्तव्य!
– पराग फाटक