फोटो काढणं, आठवणी जपणं कोणाला आवडत नाही. त्यातही सेल्फी असेल तर आनंद द्विगुणित व्हावा. सेल्फी ही वाद घालण्याची गोष्ट आहे का, ती तर समरसून अनुभवण्याची गोष्ट. ‘परावलंबित्व झटकून डॉक्युमेंटेशनसाठी सेल्फीचा अनोखा उपयोग होऊ लागलाय. कोणाचा सेल्फी? उत्सुकता वाढली ना.. वाचा सविस्तर!’
राजकारणी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं- स्टार्च केलेला पांढरा कुडता, साधारण त्याच रंगाची पँट किंवा धोतर. त्यावर वजनदार व्यक्तिमत्त्वाला साजेसं जॅकेट. डोळ्याला गॉगल. माथी एखादा उग्र रंगाचा टिळा. हाताच्या दहापैकी किमान सात बोटांत अंगठय़ा. गळ्यात पिवळ्याजर्द सोन्याचं दावं किंवा वाघनख. सोबतीला काखेत नोटपॅड आणि फायली पकडलेला चटपटीत स्वीय सहाय्यक. आबा, बाबा, अण्णा यासदृश टोपणनावाने सतत साहेबांना नमस्कार करणाऱ्या मंडळींचा जथ्था. साहेबांसोबत फोटोत चमकायला मिळेल म्हणून समतल लोंबणारे चमकोवीर आणि कडक इस्त्रीची सफारी परिधान केलेले आणि यंत्रवत चेहरा केलेली सेक्युरिटीची माणसं. समजा मॅडम असतील तर साडी, डोईवरला पदर, ठाशीव कुंकू वगैरे. तुमचं वर्णन चूक नाही, पण बॅकवर्ड विचारांचं आहे. थोडी सवड काढा, लोकसभा-राज्यसभा चॅनेल बघा, नसेल तर सह्य़ाद्री वाहिनीवर विधिमंडळाचं कामकाज पाहा. आपण प्रजा एवढी टेक्नोसॅव्ही झालोय, नेते मागे राहणार होय.

पंकजाताईंचं उदाहरण घ्या. चिक्कीसारख्या दाताला त्रासदायक गोष्टी वाटय़ाला येऊनही त्या थेट बोलतात. विचारात आणि मांडणीत चिक्कीसारखा लगदा नाही. मीटिंगा, अधिवेशनं, चिंतन, बैठका, परिषदा, उद्घाटनं, लाँचिंग, सत्कार सोहळे या सगळ्या व्यापातून त्या हाय फंडू स्मार्टफोन वापरतात. राजकारण्यांकडे असणारे फोन त्यांचे स्वीय सहाय्यकच उचलतात आणि साहेब किंवा मॅडमना फोन द्यायचा की नाही हे तेच ठरवतात असं ऐकलं आम्ही. पंकजाताईंचं तसं नाही. अहो, किटकॅट ते सँडविच अशा नावाच्या अँड्रॉइड सिस्टम अपडेट होणारा फोन वापरतात पंकजाताई. ४५ डिग्री तापमानात ज्याची बॅटरी डाऊन होणार नाही असा फोन बाळगतात. बॅटरी दिवसभरही पुरत नाही म्हणून वर्षांला तीन हँडसेट बदलणारे तुम्ही काय समजणार पंकजाताईंचं टेक्नोसॅव्हीत्व. एरव्ही साहेब किंवा मॅडमच्या दौऱ्यात स्वीय सहाय्यक तसंच बाकी कर्मचाऱ्यांना फोटोग्राफरला हुडकून फोटो काढ सांगावं लागतं. पंकजाताईंना परावलंबित्व आवडतच नाही. दुष्काळग्रस्त लातुरात झुळुझुळु पाण्याचं ओअ‍ॅसिस पाहिल्यावर त्यांनी लोकांना कामाला नाही लावलं. चटकन स्मार्टफोनमधला फ्रँट कॅमेरा ऑन केला आणि तो अनुभव सेल्फांकित केला. झटकन विचार, चटकन कृती- याला म्हणतात आधुनिक कार्यकर्ता ऊर्फ लोकसेवक. कार्यकर्ता म्हणजे सतरंज्या उचलणाऱ्या वगैरे मागास कल्पना ठेवा तुमच्याकडेच.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘गर्व से कहो’ पक्षाने ताईंवर टीका केली. त्या पक्षाचे साहेब गडकिल्यांची एरियल फोटोग्राफी करतात. कसं आहे एवढय़ा उंचीवरून फक्त घारीला स्पष्ट दिसतं, माणसांना नाही. त्यामुळे फोटोग्राफी करूनही बहुतांशी गडकिल्यांची अवस्था ‘उद्ध्वस्त धर्मशाळे’सारखी आहे तशीच. बाकी विरोधी पक्षांनी ताईंवर टीका केली दुष्काळात सेल्फी सुचतो म्हणून. ‘एवढा कोरडाठाक दुष्काळ पडलाय, तिथे आमच्या डिपार्टमेंटने पाणी आणलं, आणि त्या रणरणत्या उन्हात मी पाहणी केली’ हा ताईंचा युक्तिवाद. या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलं ताईंनी सेल्फीद्वारे. अप्रायजलच्या महिन्यात एवढं करावंच लागतं की सगळ्यांना. राजकीय पक्ष कॉर्पोरेट झालेत म्हणतात ते उगाच नाही.

परवाची गोष्ट- कचेरीत जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो आम्ही. समोरच्या प्लॅटफॉर्मवर तीन युवतींनी ओठांचा चंबू करून क्षणार्धात सेल्फी काढला. प्लॅटफॉर्मवरचे समस्त काका, काकू हे चंबूकरण अचंबित होऊन पाहत होते. पण संकोच सोडून धाडंस केलं त्यांनी. बंद स्टुडिओत पावडरची पुटं चढवल्यानंतरही फोटोग्राफरने ‘से चीज’ म्हटल्यावर अवसान गळणाऱ्या तुम्हाला काय कळणार हे पब्लिक अ‍ॅडव्हेंचर. नुकतंच जन्मलेलं बाळ आणि त्याच्या आईला बॅकग्राऊंडमध्ये घेऊन बाबा सेल्फी काढतात. जिथून फक्त बोबडी वळते अशा गडाच्या टोकावरून मंडळी सेल्फी टिपतात. स्मशानभूमीत मागे एक प्रवास कायमसाठी संपत असताना मन घट्ट करून सेल्फी काढतात लोक. खोल नदीच्या पात्रात, विषारी सापाबरोबर-म्हणाल तिथे सेल्फीचं धाडस करतात.

एरव्ही कॅमेरा समोरचं टिपतो. पण सेल्फीचा थोडा प्रॉब्लेम आहे. तो स्वप्रतिमा दाखवतो आरपार. आनंद, दु:ख, लोभ, महत्त्वाकांक्षा, कंटाळा जे काही असेल ते प्रेझेंट करतो. दुष्काळात पाणी पाहून सेल्फीमधले ताईंच्या चेहऱ्यावरचे कृतज्ञ भाव पाहून ‘राम’राज्याचा फील तुम्हाला यायला हवा होता. फोटो काढून देणारी मित्रमंडळी गमावणारे सेल्फीच्या नादी लागतात असा तुमचा उफराटा विचार. असेल हिंमत तर होऊन जाऊ दे एक आरपार सेल्फी. आणि हो-सेल्फी काढून देता का जरा असं म्हणू नका. तुमचं तुम्हीच ‘मॅनेज’ करा.

Story img Loader