रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
भात खाल्ल्यामुळे माणसाच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असा गैरसमज आहे, पण यातील महत्त्वाची बाब कुणीच लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण होतो. भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते हे मात्र नक्की खरे, यामुळे माणसाच्या आतील उत्साह वाढीस लागतो. भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही, कारण आपण नुसता भात कधीच खात नाही. भाताबरोबर, भाजी, वरण, दही, दूध, आमटी असे पदार्थ घेत असतो. त्यामुळे आपल्याला कोणताही अपाय होत नाही.
कोकणात प्रमुख अन्न भात व मासे आहे. कोकणी माणूस आपल्याला नेहमीच उत्साहात दिसतो. त्याचं कारणही जवळपास हेच आहे. कारण तो दररोज भात खात असतो. जेवण पोटभर आणि समाधानकारक झाले, तर त्याचे मन प्रसन्न राहते. भात किंवा इतर पदार्थ शिजविण्याची आपली महाराष्ट्रीय पद्घत चांगली असून आपण ती कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे आपणास अधिक आनंद मिळतो.
स्विटकॉर्न चीज राइस
साहित्य : तयार भात २ वाटा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, मिक्स हर्ब्स अर्धा चमचा, टोमॅटो प्युरी २ वाटी, मीठ, साखर, तिखट चवीनुसार, चीज अर्धा वाटी, लोणी २ चमचे, स्वीट कॉर्न अर्धा वाटी
कृती : फ्राय पॅनमध्ये लोणी घालून लसूण परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी, स्वीट कॉर्न, मिक्स हर्ब्स, तिखट, मीठ, साखर घालून परतावे. नंतर तयार शिजवलेला भात व चीज टाकून एक वाफ येऊ द्यावी. कोथिंबीर टाकून गरम गरम सव्र्ह करावे.
चिंचेची कढी/सार
चिंचेची कढी ही मला महाराष्ट्राच्या विदर्भ या भागात आढळली. चटकदार असे याचे वर्णन करावे लागेल. आंबट गोडाचं प्रमाण थोडं कमी केलं तर सूप म्हणून सव्र्ह करू शकतो आणि परंपरेनुसार याला गोळा भात या भाताच्या प्रकाराबरोबर सव्र्ह करतात (हा भाताचा प्रकार आपण पुढे पाहणार आहोत.).
साहित्य : चिंचेचा कोळ अर्धा वाटी, गूळ, मीठ, तिखट चवीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची ५-६, कढीपत्ता, कोथिंबीर पाव वाटी, मेथीदाणा अर्धा चमचा, हळद पाव चमचा, हिंग छोटा अर्धा चमचा, चण्याच्या डाळीचे पीठ १ चमचा
कृती : १ चमचा तेल पातेल्यात तापल्यावर त्यावर मोहरी, जिरे, मेथी घालून फोडणी करावी. ही फोडणी तडतडल्यावर मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घालून हिंग, हळद व तिखट घालणे. नंतर त्यात चिंचेचा कोळ घालणे व त्यात चवीनुसार गूळ, मीठ घालून ५ ते ६ वाटय़ा पाणी घालणे. चण्याच्या पीठाने घट्ट करणे व गरमागरमच सव्र्ह करणे. याला गोळे भाताबरोबर सांडग्याच्या जोडीने वाढतात.
भरडा भात
साहित्य : शिजवलेला भात २ वाटय़ा, जाडसर वाटलेला चण्याच्या डाळीचा भरडा १ वाटी, जिरे पावडर १ चमचा, मीठ चवीनुसार
तिखट चवीनुसार, हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, मोहरी १ चमचा, कढीपत्ता, तेल.
कृती : प्रथम थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, धने-जिरे पावडर, हळद, तिखट इ. घालून डाळीचा भरडा घालून खरपूस भाजा. त्या नंतर यात मीठ जरुरीपुरते गरम पाणी घालून वाफ येऊ द्या. शिजवल्यावर हा भरडा भाताबरोबर कालवून खायच्या वेळी असा हा कालवलेला भात. त्यावर हिंगाचे पाणी वरून मोहरी-लसणाची फोडणी घालून कढीबरोबर मसाल्याच्या मिरचीबरोबर खायला द्या.
चीझी राइस
हा भाताचा प्रकार आपल्या इथला नाही, पण अतिशय वेगळ्या चवीचा आणि मला आवडलेल्या भात प्रकारापैकी आहे.
साहित्य : टोमॅटो प्युरी १ वाटी, चीज अर्धा वाटी, लोणी ३ चमचे, मिक्स हर्ब्स अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार, बारीक चिरलेला लसूण २ चमचे, लांब बासमती तांदूळ २ वाटया, जाडसर कुटलेले जिरे अर्धा चमचा
कृती : प्रथम पातेल्यात लोणी घेऊन त्यात बारीक केलेले लसणाचे तुकडे परतल्यावर टोमॅटो प्युरी हर्ब्स, मीठ, साखर, काळे मिरे टाकून धुतलेले तांदूळ व आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भात शिजवावा. भात शिजत आला की त्यात चीज किसून मिसळावे. ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. गरमागरमच सव्र्ह करावे.
टीप : हा भात गरमच चांगला लागतो. चीज वापरल्यामुळे थंड झाल्यावर छान लागणार नाही.
मिक्स हर्ब्स उपलब्ध नसल्यास ते न टाकताही बनवू शकतो.
नारळ दुधातला भात
हा भाताचा प्रकार प्रचलित असलेल्या भात प्रकारापेक्षा थोडा वेगळा करण्याची पद्घत, पण निराळी. थोडा वेगळा भात खाण्याची ज्यांना आवड आहे. त्यांनी नक्की करून पाहावा असा हा प्रकार.
साहित्य : नारळाचे घट्ट दूध १ वाटी, लांब तांदूळ १ वाटी, लिंबाचा रस २ चमचे, मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली पाव वाटी, हिरवी मिरची ५-६, तेल ४ चमचे
कृती : प्रथम तांदूळ धुऊन तेलात तळून घ्या. तपकिरी रंगावर. दुसऱ्या भांडयात एक वाटी पाणी तापत ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, टाकून उकळल्यावर त्यात तळलेले तांदूळ घाला व मिश्रणातले पाणी आटत आले की, घट्ट नारळाचे दूध घाला. एकत्र करून झाकण ठेवा. गरम गरमच खायला द्या.
टीप : पदार्थ सव्र्ह करताना ओल्या नारळाचे काप कापून घाला.
कॅबेज रोल्स राइस
अतिशय वेगळा असा हा भाताचा प्रकार नावापासून वेगळेपण करायला तसा सोपा, पण गरम गरमच खावा हा माझा सल्ला.
साहित्य : पानकोबीची पाने ८ ते १०, खवा १ वाटी, काजू, किसमिस ३ चमचे, आलं, लसूण पेस्ट १-१ चमचा, हिरवी मिरची बारीक चिरलेली २ चमचे, कोथिंबीर २ ते ३ चमचे, मीठ चवीनुसार, लिंबू चवीनुसार, साखर चवीनुसार, काळीमिरी १ चमचा, लवंग अर्धा चमचा, विलायची १ चमचा, तेल पाव वाटी, तूप किंवा लोणी २ चमचे, तांदूळ ३ वाटय़ा
कृती : रोल्स करता : खवा, आलं, लसूण मिरची, १ लिंबाचा रस, काजू, किसमिस, मीठ, साखर घालून याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण पानकोबीच्या पानात घालून पानाचे रोल्स करून त्याला टूथपीक लावून ठेवा. मैदा व कॉर्नस्टार्च एकत्र करून चवीनुसार मीठ घाला. भज्याच्या पीठासारखी भिजवून त्यात ते रोल्स बुडवून तळून घ्या.
भातासाठी : ३ वाटी तांदूळ, ३ वाटय़ा पाणी घेऊन त्यात दही, कोथिंबीर, तूप किंवा लोणी घालून चवीनुसार मीठ, साखर, लवंग, वेलची इत्यादी टाकून पाणी उकळावे. पाणी उकळल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून भात शिजवावा. भात शिजत आल्यावर तयार केलेले कॅबेज रोल्समध्ये पेरावे. एक वाफ आल्यावर रोल्सबरोबर सव्र्ह करावा.
मधुमेही खिचडी
हा खिचडीचा प्रकार मधुमेह झालेल्या लोकांकरिता किंवा जास्त वजन असलेल्यांसाठी उपयुक्त. या खिचडीचे दोन महिने सतत सेवन केल्यास नक्कीच वजनात फरक पडतो.
साहित्य : लाल तांदूळ पॉलिश नसलेले ५०० ग्रॅम, गहू ५०० ग्रॅम, बाजरी ५०० ग्रॅम, पांढरे तीळ ४ चमचे, मेथीदाणे अर्धा चमचा,
ओवा २० ग्रॅम, भाजलेले जिरे १ चमचा, दही १ चमचा, साखर १ वाटी, मीठ चवीनुसार, कोथिंबीर
कृती : सर्व प्रथम बाजरी व गहू दोन तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. नंतर तांदूळ, गहू, बाजरी, तीळ, ओवा एकत्र करून त्यातील दोन वाटय़ा धान्य वेगळे काढून धुऊन ३ वाटी पाण्यात शिजवा. हे शिजायला थोडा वेळ लागतो. नंतर या शिजवलेल्या खिचडीमध्ये भाजलेले जिरे, दही, मीठ, साखर, कोथिंबीर घालून एकत्र करून खायला द्या. वरून चालत असल्यास १ चमचा शुद्घ तूप जर घातले तर छान लागेल.
गोळा भात
हा वैदर्भीय प्रकार. याला चिंचेच्या साराबरोबर देतात. याच्याच जोडीचा भरडा भात, वडा भात हे प्रकार आपण पुढे बघणार आहोत.
साहित्य : चिन्नोर तांदूळ २ वाटय़ा, बेसन १ वाटी, धनेजिरे पावडर २ चमचे, तिखट चवीनुसार, हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, मोहरी १ चमचा, कढीपत्ता, तेल.
कृती गोळ्यांसाठी : प्रथम बेसनात हळद, तिखट, चवीनुसार मीठ, धने, जिरे पावडर घालून एकत्र मिसळून घ्या. तेलाचे भरपूर मोहन घालून गोळा होईल इतपत भिजवा. हाताच्या मुठीच्या आकाराचे गोळे बनवा. आपण नेहमीप्रमाणे जसा भात शिजवतो तसा शिजवा. शिजवायला त्यात थोडी हळद, मीठ घाला. भात अर्धवट शिजत आला की त्यात वरील तयार केलेले गोळे घालून मंद आचेवर शिजवा. वरून मोहरी जिरे-कढीपत्ता, हिंगाची फोडणी घाला व चिंचेच्या कढीबरोबर खायला द्या.
टीप : भात वाढताना गोळ्यांबरोबर वाढा व वरून फोडणी घाला. जास्त चविष्ट लागते.