गेल्या काही भागांत आपण कडधान्य, तृणधान्यापासून होणारे वेगळे पदार्थ पाहिले. आता डाळींची पाळी. या भाबात तुरीपासून बनणाऱ्या काही वेगळ्या रेसिपीज देत आहे.
तुरीची लागवड मुख्यत्वे भारतात होते. परदेशात युरोप, आफ्रिका व अमेरिकेमध्ये त्याचा प्रचार फारसा झाल्याचे दिसून येत नाही. तुरीला बारीक, काळी व चिकट जमिनीची आवश्यकता असते. पावसाच्या सुरुवातीस पावसाळी पीक म्हणून तुरीची पेरणी केली जाते. तुरीचे पीक मुख्यत्वे गुजरातमध्ये व दक्षिण भारतात विपुल प्रमाणात होते. तुरीचे रोप दोन प्रकारचे असते; एक दरवर्षी होणारे व दुसरे दोन-तीन वर्षे टिकणारे. दरवर्षी होणारे रोप दोन-अडीच हात उंच वाढत असते. दोन-तीन वर्षे टिकणारे रोप पाच-सहा हात उंच वाढते व त्याचे रोप प्रतिवर्ष होणाऱ्या रोपापेक्षा थोडे जाड असते.
बडोदा जिल्ह्य़ातील दशरथ, छाणी व वासद या गावातील जमीन तुरीसाठी इतकी अनुकूल आहे की, तेथे एका बियाण्यामधून साठ-सत्तर मण तुरीचे उत्पन्न निघते. तुरीमध्ये लाल व पांढरी अशा दोन जाती होतात. वासदची तुरीची डाळ खूप प्रसिद्ध आहे. सुरतची डाळही उत्तम प्रतीची समजली जाते. सर्व प्रकारच्या कडधान्यामध्ये तूर अग्रभागी आहे. गुजरातमध्ये तुरीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने डाळ (आमटी) बिघडली की त्याचा दिवस बिघडला अशी म्हण रूढ झाली आहे. तुरीच्या डाळीचे पुरणसुद्धा केले जाते.
त्या डाळीच्या पाण्याची कढीही बनते. तुरीचे दाणे वाफवून जास्त तेलात फोडणी करून स्वादिष्ट उसळ बनविली जाते. वांग्याच्या भाजीत तुरीचे हिरवे दाणे घालूनही विशिष्ट भाजी बनवता येते. डाळ भिजत घालून बनविलेला डाळ-कांदा चांगला लागतो. तुरीच्या डाळीत आमसुले किंवा चिंच व गरम मसाला घालून बनविलेली आमटीही चविष्ट लागते. चला तर आपण पाहूयात तुरीच्या डाळीपासून तयार होणारे विविध पदार्थ-
हैदराबादी मुद्दा भाजी
काही रेसिपीजची नावे काही विशिष्ट शहरांचे प्रतिनिधित्व करतात. जसे, कोल्हापुरी चिकन, काश्मिरी पुलाव, पींडी छोले, कंधारी नान, काकोरी कबाब. तशीच ही हैदराबादी मुद्दा भाजी. अतिशय साधी पण एक छान प्रकार.
साहित्य : शिजवलेल्या तुरीचं घट्ट वरण २ वाटय़ा, चण्याच्या डाळीचं पीठ २ चमचे, बारीक चिरलेला पालक १ वाटी, लसूण २ नग
हिरवी मिरची, मोहरी, कोथिंबीर, हिंग, चिंच, गूळ, मीठ चवीनुसार
कृती : प्रथम तुरीच्या डाळीचे वरण व पालक बारीक चिरलेला एकत्र करून घोटून त्यात चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालावे व चण्याच्या डाळीचे पीठ थोडे थोडे करून वरून पेरावे. सर्व जिन्नस एकत्र झाल्यावर वरून फोडणी घालून सव्र्ह करा. फोडणीसाठी तेल वापरून त्यात मोहरी तडतडल्यावर लसूण, मिरची हिंग घालून थोडे लाल तिखट घालून ही फोडणी भाजीवर घाला.
टीप : ही भाजी शिळ्या पोळीबरोबर छान लागते.
पनीर दालचा
साहित्य : थोडं कमी शिजलेलं तुरीच्या डाळीचे वरण १ वाटी, बारीक कापलेल्या पनीरचे तुकडे अर्धी वाटी, जिरे १ चमचा, लसूण, हिरवी मिरची १ चमचा, हळद चिमूटभर, लोणी आणि क्रीम
कृती : पातेल्यात तेल घालून ते तापल्यावर त्यात जिरे फोडणीला टाकावे. लसूण, हिरवी मिरची व जिरे घातल्यावर पनीरचे तुकडे परतवून नंतर चवीनुसार मीठ, हळद व नंतर वरण टाकावे. फ्रेश क्रीम, कोिथबीर घालून सव्र्ह करणे.
तुरीच्या डाळीची भजी
साहित्य : तुरीची डाळ २ वाटय़ा, मीठ चवीनुसार, मिरची ४- ५, कोथिंबीर, चिरलेला कांदा १ नग, खवलेले खोबरे पाव वाटी
कृती : तुरीची डाळ भिजत घालून त्यानंतर ती भरभरीत वाटावी व त्यात मीठ, मिरची, कोथिंबीर, चिरलेला कांदा व खवलेले खोबरे घालून चपटे गोळे करून तळून घ्यावे. चटणीसोबत सव्र्ह करावे.
लवट
ज्याप्रमाणे या पदार्थाचे नाव वेगळे वाटते, त्याचप्रमाणे याची कृतीही वैशिष्टय़पूर्ण आहे. साधारण ही भाजी थंडीच्या दिवसात बनविली जाते. कारण यात तुरीच्या ताज्या शेंगांचे दाणे वापरतात.
साहित्य : ताज्या तुरीच्या दाण्याचे वाटण १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, तेल ४ चमचे, धने जिरे पावडर २ चमचे, आलं लसूण पेस्ट २ चमचे, भाजून कुटलेली खसखस २ चमचे, मोहरी, हिंग
कृती : एका पातेल्यात तेल घेऊन मोहरी फुटल्यावर त्यात हिंग, १ चमचा आलं-लसणाची पेस्ट घालून परतल्यावर बारीक चिरलेला एक वाटी कांदा घालावा. कांदा छान लालसर झाल्यावर त्यात धने-जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ, भाजून कुटलेली खसखस घालून परतावे. त्यानंतर दोन ग्लास पाणी घालावे व मिश्रण उकळावे. चवीनुसार मीठ घालावे. तुरीच्या वाटलेल्या दाण्यांमध्ये १ चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिसळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून ते वरील उकळत्या मसाल्याच्या पाण्यात घालून मंद आचेवर साधारण ८ ते १० मिनिटे शिजवावेत. त्यानंतर कोिथबीर घालून पोळीबरोबर खायला द्यावे.