मुक्ता बर्वे.. एक सक्षम अभिनेत्री म्हणून सर्वानाच तिची ओळख. पण ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’मधून उलगडत गेली एक विचारी आणि स्वत:चं स्वातंत्र्य विवेकीपणाने उपभोगणारी व्यक्ती!
आज कुठलंही क्षेत्र घ्या. सर्वानाच पुढे जाण्याची घाई. लवकारात लवकर अत्युच्च पद आणि पैसा मिळविण्यासाठी सगळ्यांचीच साठमारी. मग पुढे जाताना आपल्याच तत्त्व, विचारांची यथेच्छ पायमल्ली! आणि हे सर्व करावंच लागतं, अशी आपल्याच वर्तणुकीचं समर्थन करणारी मंडळी संख्येने अधिक. मात्र याच तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मुक्ता बिनधास्त सांगते, ‘‘मला जे आवडतं, जे करावंसं वाटतं, मनाला पटतं तेच मी करते.’’
आजच्या पिढीच्या गरजाही खूप. त्या पूर्ण करताना, पैसे कमावताना पुरती दमछाक होते. ‘पैसा’ हाच सर्व गोष्टींवर उपाय, अशी अनेकांनी स्वत:ची घातलेली समजूत. पण याच तरुण पिढीतली मुक्ता ठणकावून सांगते, ‘‘मी जेवढं कमावते तेवढय़ाच माझ्या गरजा मर्यादित ठेवते. मी माझ्या गरजांना माझ्या पैशांपेक्षा मेाठं होऊ देत नाही.’’
प्रसिद्धी आणि पुढे जाण्याचे शॉर्टकट आजच्या अनेक तरुण-तरुणींना अगदी पाठ, किंबहुना तेच अंगवळणी पडलेलं. आपल्या मुलांनी जगात नंबर वन व्हायलाच हवं, असं मनाशी पक्कं ठरवलेल्या पालकांकडूनही या पिढीला सतत पुढे जाण्याचंच बाळकडू पाजलं जातं. परंतु याही भवतालात कठोर मेहनत, अभ्यास आणि स्वत:वर विश्वास असणारी मुक्ता अधिक भावली. अर्थात याचं सर्व श्रेय ती देते तिच्या पालकांना. आपल्या जडण-घडणीत पालकांचं महत्त्व, अस्तित्व अधिक अधोरेखित करणारी मुक्ता..
दुसऱ्याला समजून न घेता आपल्याच धुंदीत पुढे जाणाऱ्या बहुसंख्यांमध्ये मुक्तासारखी माणसं जपणारी, आजूबाजूच्या माणसांना समजून घेणारी, त्यांचं आपल्या भोवती असणं महत्त्वाचं मानणाऱ्या मुक्ताबद्दल कुतूहलही वाटलं. आपण जे काम करतोय, वागतोय, त्याचा स्वत:च तिऱ्हाईत म्हणून आत्मविश्लेषण करणाऱ्या मुक्ताचं विशेष कौतुकही वाटलं.
आपण विविधांगी सक्षम भूमिका बजावत असतानाही, रूढार्थाने फारशा महत्त्वाच्या नसलेल्या भूमिका करणाऱ्या कलाकारांचं काम, त्यांची मेहनत यांनाही सलाम ठोकणारी मुक्ता.. स्वत:चं स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला, विचारांचा आदर करणारी अजच्या पिढीचं आगळंवेगळं प्रतिनिधित्व करणारी मुक्ता.. मनमुक्ता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा