मीरा बोरवणकर यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी अक्षरश: शेकडो जण पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही जमले होते. या गर्दीतील बहुतेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी होते. मीरा मॅडमना ऐकल्यानंतर सगळ्यांची भावना एकच होती- गर्दीत वाट पाहिल्याचे सार्थक झाल्याची! व्हिवा लाउंजच्या या संवादातून खूपच प्रेरणा मिळाल्याचे, नवी उमेद मिळाल्याचे अनेकींनी सांगितले. त्यातील या प्रातिनिधिक प्रतिक्रिया-
एक व्यक्ती म्हणून मीरा बोरवणकर यांना जाणून घ्यायची संधी मिळाली. एक स्त्री अधिकारी म्हणून त्यांना काय प्रॉब्लेम्स येत असतील अशी उत्सुकता माझ्या मनात होती. प्रशासनात जाऊन काम करण्याबाबत अनेक प्रश्न मनात होते. त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यांनी मुलाखतीद्वारे दिली. इतक्या मोठय़ा संख्येने लोक उपस्थित असतानाही त्यांनी अगदी शांतपणे आणि नेमकेपणाने सर्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिली, हे फार छान वाटले.
कल्याणी मानगावे
बोरवणकरांना पाहणे, त्यांना ऐकणे हा खूप छान अनुभव होता. त्यांच्यामुळे पोलीस खाते आणि सामान्य जनता यामध्ये असणारा गरसमज कळला. एक मुलगी म्हणून स्वत:ला कधीही कमी न लेखता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार आहे. तसेच जे करायचे आहे त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची असे मी ठरवले आहे.
आस्मा शेख
मीरा बोरवणकरांना बघण्यासाठीच मी आज आले होते. त्यांच्यासारख्या व्यक्तींकडे बघून आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यांनी मताप्रमाणे मुलींनी कर्तृत्व सिद्ध करायला हवे. महिला सबलीकरणाची अजूनही गरज आहे असे मला वाटते.
पूजा मुथा
बोरवणकर मॅडमबद्दल आधी मी खूप वाचलं, ऐकलं होतं. पण आज त्यांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी सांगितलेले अनुभव, काही प्रसंग मनाला भावले. विशेषत: त्यांनी सांगितलेला शूटिंगच्या वेळचा अनुभव खरंच फार काही शिकवणारा होता. ‘व्हिवा लाउंज’चे कार्यक्रम आम्हा पुणेकरांना असेच ऐकायला मिळोत ही इच्छा.
प्राजक्ता सोनावणे
मी सध्या यू.पी.एस.सी.ची तयारी करते आहे. तेव्हा त्यासाठी उपयोगी अशा टिप्स तर बोरवणकर मॅमनी दिल्याच, पण एकंदर आयुष्यात उपयोग होईल अशा चार गोष्टीही त्यांच्या बोलण्यातून कळल्या. ‘रिअॅलिटी’ अशी काहीच नसते, तर प्रत्येक जण आपापल्या ‘अँगल’मधून एखाद्या गोष्टीकडे पाहत असतो, हा त्यांचा मुद्दा विचार करण्याजोगा वाटला.
गौरी केसकर
करिअर आणि घर कसं मॅनेज करता, हा उच्चपदस्थ स्त्रियांना नेहमी विचारला जाणारा प्रश्न मलाही नेहमी पडायचा. मीराताईंनी त्यावर दिलेलं उत्तर मला अतिशय सूचक वाटलं. त्यांच्या करारीपणाकडे, कामाबद्दलच्या डेडिकेशनकडे बघून आपणही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी उत्तम करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता मी अधिक जोमाने अभ्यासाला लागणार आहे.
कविता पांडे
आज इतक्या कर्तृत्ववान, कणखर आणि तरीही ‘डाऊन टू अर्थ’ असणाऱ्या व्यक्तीला ऐकताना मी फार भारावून गेले होते. त्यांच्या बोलण्यातून पोलीस प्रशासनाची एक सकारात्मक बाजूही कळली. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी कोणती आणि ती पार पाडण्यासाठी काय करायला हवं हे त्यांनी फार चांगल्या प्रकारे सांगितलं. कामात प्रोफेशनलिझम असण्यासाठी पुरुषी ताकदीची गरज असते असं नाही, हे फार पटलं.
केतकी जगताप
मी यूपीएससीची तयारी करतेय, त्यामुळे घरच्यांकडून सपोर्ट आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कार्यालयात मिळणारे सहकार्य असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते; परंतु आपण जर स्वत:शी ठरवलं तर आपण काहीही करू शकतो, हे मॅमकडे पाहून कळलं. आता मी जोमाने प्रयत्न करीन.
अनुराधा शिंदे