रसिका शिंदे
‘‘अरे बॅग पॅक झाली का?’’ सगळं सामान घेतलंस ना? आणि थंडीचे कपडे ते मुळात आधी बॅगमध्ये टाकले आहेस का ते बघ.’’ घरोघरी ऐकू येणारे संवाद म्हणजे थंडी आणि भटकंतीची तयारी सुरू.. गेली काही वर्ष सुरू असलेला सोलो ट्रिपचा म्हणजेच एकटय़ाने भटकंतीचा ट्रेण्ड यंदाही कायम आहे. कमीत कमी बजेटमध्ये देशभरात विविध राज्यांत फिरण्याचा ट्रेण्ड तरुणांमध्ये विशेषत: मुलींमध्ये अधिक वाढताना दिसतो आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मुक्तपणे तरुणाईला भटकंती करण्याची संधी मिळाली आहे. खरं तर दोन वर्षांच्या गॅपनंतर आपल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर भटकंती करायची संधी चालून आली आहे, त्याचा आनंद तरुणाईत असला तरी गेली काही वर्ष सोलो ट्रिपचा ट्रेण्ड गाजतो आहे. नवनव्या लोकांबरोबर वेगवेगळी शहरं फिरायची वा ट्रेकिंग करायचं, नवे मित्रमैत्रिणी जोडायचे हे तरुणाईला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जोर धरलेल्या बॅग पॅक, सोलो ट्रिपसारख्या ट्रेण्ड्सना यंदाही तितकाच चांगला प्रतिसाद आहे. बऱ्याचदा सोलो ट्रिपला जायचं तर कुठे जायचं, असा प्रश्न पडतो. मात्र काही हमखास लोकप्रिय ठिकाणं सोलो ट्रिपसाठी लोकप्रिय आहेत. हम्पी, गोकर्ण, केदारनाथ, राजस्थान या ठिकाणांना तरुणाईकडून जास्त पसंती मिळते. फिरणं म्हटलं की खर्च आलाच, पण काही ट्रॅव्हल कंपन्या तरुणांसाठी तर काही खास तरुणींसाठी सोलो ट्रिपचं नियोजन करून देतात. ज्यात त्यांच्या खाण्या-पिण्याची, कोणती ठिकाणे फिरण्याची आहेत याची यादी आणि राहण्याची सोय यांचं नियोजन करून दिलं जातं. पूर्वी हॉटेल हा एकच पर्याय असायचा. आता मात्र ‘झोस्टेल’ ही नवी संकल्पना तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या झोस्टेल्समध्ये राहताना तिथं राहणं सुरक्षित आहे का, असा विचार नक्कीच डोकावतो. याबद्दल माहिती देताना, ‘बकेट लिस्ट’ या संस्थेची सह-संस्थापक प्राप्ती बुरंबाडकर सांगते, ‘‘अलीकडच्या काळात मुलींचा कल हा सोलो ट्रिपकडे अधिक आहे. हम्पी, गोकर्ण या ठिकाणांबरोबरच मनाली, कसोल, हृषीकेश, उदयपूर, जयपूर या पर्यटन ठिकाणांनाही सोलो ट्रॅव्हलर्स पसंती देत आहेत.’’
काही ठरावीक ठिकाणी फिरायला जायचं तर परफेक्ट सीझन असावा लागतो. पर्यटनासाठीचा परफेक्ट सीझन म्हणजे ऑक्टोबर ते मार्च आहे. या काळात उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत विविध ठिकाणी तरुण मंडळी आपल्या ट्रिप्स प्लॅन करू शकतात. करोनाकाळानंतर ट्रेकिंग करण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. काही ठिकाणं ही फक्त हिवाळय़ातही ट्रेकिंग करण्यासाठीच निवडली जातात. सध्या नाइट ट्रेकिंगही मोठय़ा प्रमाणावर केलं जातं. यात उत्तरेकडील केदारकांता, ब्रह्मताल, खेरगंगा या ट्रेक्सचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात कळसूबाई, हरिहर, रतनगड, हरिश्चंद्र हे नाइट ट्रेक केले जातात. हे ट्रेक अगदी कमी खर्चात केले जाऊ शकतात. लोकल ट्रान्सपोर्टचा वापर, खाण्या-पिण्याचा आणि प्रवासाचा एका व्यक्तीचा एकूण खर्च कमीत कमी ६०० रुपयांपर्यंत केला जाऊ शकतो, जो कॉलेज विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारा असल्याने ट्रेकला पसंती सहज मिळते.
सोलो ट्रिप प्लॅन करताना पहिल्यांदाच जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं आणि काही गोष्टींचा अभ्यास करून मगच प्रवासाला निघणं गरजेचं असतं. आपण ज्या राज्यात, ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत त्याचा गूगल मॅप हा ऑफलाइन डाऊनलोड करून ठेवायला हवाच. कारण बऱ्याचदा नेटवर्कचा किंवा रेंजचा प्रॉब्लेम होतो आणि आपण रस्ता भटकण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी ऑफलाइन मॅप उपयोगाला येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिरायला जाणाऱ्या ठिकाणाची जुजबी माहिती गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे कमी खर्चात कुठं राहू शकतो, किंवा तिथं जेवणाची खासियत काय आहे किंवा तिथली संस्कृती, तिथलं स्थानिक वातावरण आणि हवामानही कसं आहे, याचाही अंदाज घेतला पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमची बॅगही पॅक करू शकता आणि तुमच्या फिरायच्या ठिकाणांची बकेट लिस्टही ठरवू शकता.
फिरण्याची आवड ही प्रत्येकामध्ये असतेच. फिरायला जायचं ते कुटुंबासोबतच ही संकल्पना हळूहळू काळानुरूप बदलू लागली आहे. वर उल्लेख केल्यानुसार सोलो ट्रिपचा वाढता ट्रेण्ड किंवा ज्या ट्रॅव्हल कंपनी ट्रिप्स आयोजित करतात त्यात वेगवेगळय़ा भागातून आलेले प्रवासी असतात. त्या अनोळखी प्रवाशांसोबत आपला फिरण्याचा नवा प्रवास अनुभवण्याचाही ट्रेण्ड दिसामाजी वाढतो आहे. अनोळखी सहप्रवाशांच्या सोबतीने केलेली सोलो ट्रिप एक नवा अनुभव, नवी ऊर्जा आणि जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळवून देते. अर्थात, हा ट्रेण्ड वाढण्यामागे काही प्रमाणात हिंदी चित्रपट आणि नव्याने लोकप्रिय झालेले ट्रॅव्हल ब्लॉग्ज, व्लॉग्ज कारणीभूत आहेत. मात्र नवनव्या आठवणी जोडण्याचा हा तरुणाईचा छंद त्यांना एकटय़ाने भटकंतीची गंमत मिळवून देतो आहे हेही खरं.