वेदवती चिपळूणकर
आजकाल कोणत्याही फॅशनमध्ये कम्फर्टला सगळय़ात जास्त महत्त्व आलेलं असल्याने या पाळायला अवघड असलेल्या पद्धती मागे पडल्या आहेत. त्यामुळे प्रवास करतानादेखील आपल्याला ज्यात कम्फर्टेबल वाटेल असे कपडे वापरायची सवय सगळय़ांनाच लागते आहे.
‘बॅग भरो, निकल पडो’च्या सीझनला आपण पुन्हा आलेलो आहोत. टूर्सच्या जाहिराती टीव्हीवर यायला लागल्या आहेत, दिवाळी किंवा ख्रिसमसच्या सुट्टय़ांचे प्लॅन्स सुरू झालेले आहेत, डेस्टिनेशन्स कोणते यावर शिक्कामोर्तब होत आहे. याच धामधुमीत शॉपिंगलाही सुरुवात झाली असेलच. पिकनिकसाठी वेगळं नव्याने शॉपिंग करायचं हा ट्रेण्ड तसा नवीन, पण फोटोसाठी नवीन लूक्स तर हवेतच! ट्रॅव्हल लूक्ससाठी खास लक्ष ठेवावेत असे काही बॉलीवूड सेलेब्रिटीज सगळय़ांनाच माहीत आहेत. त्यांच्या कपडय़ांवरून आणि स्टाइल स्टेटमेंटपासून प्रेरणा घेत आपणही आपले लूक्स ठरवू शकतो.
पूर्वीच्या काळी घरातून बाहेर पडताना एकदम व्यवस्थित तयार होऊन जाण्याची पद्धत होती. त्यातून विमानाने प्रवास करायचा असेल तर अगदीच बिझनेस मीटिंगला चालल्यासारखे सूट, बूट, टाय लावून लोक निघत असत आणि जमत नसेल तरी शॉर्ट्स, स्कर्ट, वन-पीस असे परिधान करून मिरवण्याचा प्रयत्न मुली करत असत. मात्र आजकाल कोणत्याही फॅशनमध्ये कम्फर्टला सगळय़ात जास्त महत्त्व आलेलं असल्याने या पाळायला अवघड असलेल्या पद्धती मागे पडल्या आहेत. त्यामुळे प्रवास करतानादेखील आपल्याला ज्यात कम्फर्टेबल वाटेल असे कपडे वापरायची सवय सगळय़ांनाच लागते आहे.
कम्फर्टला प्राधान्य देणाऱ्या या फॅशन संस्कृतीनुसार ट्रॅव्हल करताना बॉडी-फिट कपडय़ांऐवजी थोडे सैलसर कपडे निवडले जातात. धोती पॅन्ट्स, हॅरम, इजार पॅन्ट्स अशा बॉटम्सचा वापर जास्त केला जातो. एअर ट्रॅव्हल करताना सिक्युरिटीला अडचण होते म्हणून शक्यतो बेल्ट टाळला जातो. हातात कमी वस्तू ठेवायला लागाव्यात आणि हात मोकळे राहावेत म्हणून खिसे असलेल्या बॉटम्स कधीही उत्तम! तरीही बॉडी-फिट बॉटम हवीच असेल तर जिम-वेअर पॅन्ट्स किंवा नायलॉन लेगिंग्ज हा चांगला पर्याय आहे. मात्र दूरच्या प्रवासाला ट्रेनने जायचं असेल तर सैल कपडेच केव्हाही वावरायला सोपे आणि सुटसुटीत! टॉप्समध्ये बॉडी-फिट लेयिरग करण्याऐवजी फिटिंगचा टँक टॉप किंवा इनर आणि त्यावर लूज – फिट जॅकेट, कफ्तान किंवा श्रग असं कॉम्बिनेशन करता येईल. टॉपमध्ये लेयिरग असेल तर शक्यतो गळय़ात कोणत्याही अॅक्सेसरिज नसाव्यात आणि कानात केवळ मोठे इअरिरग्स किंवा स्टड्स् उठून दिसतील. मात्र प्रवासात उकाडय़ाची शक्यता असेल तर टॉपमध्ये लेयिरग नसावं. लॉन्ग सैल कुर्ता किंवा ओव्हरसाइज टी-शर्ट हा अशा प्रवासासाठी योग्य ठरेल. सोबत छोटी स्लिंग बॅग, स्लिंग पाऊच किंवा वेस्ट पाऊच घेतला तर हातही मोकळे राहतील आणि अत्यावश्यक वस्तूदेखील जवळ बाळगता येतील.
केवळ वुमेन नव्हे तर मेन्स ट्रॅव्हल फॅशनही तितकीच ट्रेण्डमध्ये आहे. धोती पॅन्ट्स किंवा कॅज्युअल थ्री-फोर्थ् आणि त्यातही बेज, ब्लॅक, ग्रे, व्हाईट हे हरतऱ्हेचे रंग असा ट्रेण्ड पाहायला मिळतो. धोती किंवा हॅरेम पॅन्ट्स हा युनिसेक्स प्रकार रणवीर सिंग, अर्जुन कपूर सारख्या सेलेब्रिटीजमुळेही लोकप्रिय झाला आहे. रणवीरला तर अनेकदा दीपिकाची धोती पॅन्ट घालून फिरतो असे म्हणून कित्येकदा गमतीने ट्रोल केले गेले आहे. मात्र फॅशनच्या बाबतीत कायमच बोल्ड भूमिका घेणाऱ्या रणवीरने स्टाइलच्या बाबतीत सगळय़ांना मागे टाकले आहे. धोती- हॅरम पॅन्ट्स, स्कर्ट्स असे प्रकार त्याने बिनधास्तपणे आपलेसे केले आहेत. मध्यंतरी ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये आमिर खाननेही आपल्याला ढगळय़ा पॅन्ट्स वा धोती पॅन्ट्स कम्फर्टेबल वाटत असल्याची कबुली दिली होती. त्यानेही या प्रकाराची ओळख किरण रावमुळे झाल्याचे सांगितले होते. हॅरेम पॅन्ट्समध्येही पारंपरिक, अरेबियन असे प्रकार पाहायला मिळतात. या पॅन्ट्स वा थ्री फोर्थच्या बरोबरीने फिक्या रंगाचे टी-शर्ट आणि त्यावर डार्क अर्थात गडद रंगाचं जॅकेट या कॉम्बिनेशनची सध्या चलती आहे. वेस्ट पाऊच किंवा स्लिंग पाऊच मेन्स अॅक्सेसरिजमध्येही ट्रेण्डमध्ये असल्याचे पाहायला मिळते. गॉगल्स किंवा शेड्स हा सध्याच्या मेन्स ट्रॅव्हल वेअरमधला एक महत्त्वाचा भाग आहे.
या सगळय़ाचं शॉपिंग करताना आणि ट्रॅव्हल आऊटफिट ठरवताना आपण जिथे जाणार आहोत त्या प्रांतातील हवामानाचाही विचार करायला हवा. पूर्ण थंडी असलेल्या ठिकाणी जात असाल तर ट्रेण्डी स्पोर्टशूज बेस्ट! वुमन लुकसाठी एक सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणजे कम्फर्टेबल ट्रॅव्हल फॅशन असल्यामुळे शक्यतो फुटवेअरही कम्फर्टेबलच असू द्या! हिल्स, वेजेस, बॅलेरिना वगैरे प्रकार शक्यतो टाळा आणि फ्लिप-फ्लॉप, फ्लॅट चप्पल किंवा सॅन्डल्सना प्राधान्य द्या. स्वत:च्या संपूर्ण लूक डिझाइनमध्ये एक सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बॅग्सचा रंग! बॅग्सचेच रंग तुम्ही कपडय़ांमध्ये घालत नाही आहात ना याची खात्री करून घ्या. बॅग्सना मॅचिंग करण्यासाठी एखादी अॅक्सेसरी किंवा शूजमधून दिसणारे सॉक्स, स्कार्फ, हेयरबॅण्ड, कॅप अशांपैकी फक्त एखादीच गोष्ट बॅगच्या रंगाची असू द्या. शेवटी कपडे असोत वा अॅक्सेसरीज रंगसंगती हा फार महत्त्वाचा घटक ठरतो. आपला प्रवासातला कम्फर्ट आणि सोय महत्त्वाची असल्याने कडक इस्त्रीपासून ते क्रम्पल्ड टॉपपर्यंत आपण आधीच पोहोचलो आहोत. आता त्याच कम्फर्टला कायम राखत या सीझनच्या ट्रिप्स प्लॅन करू या. हॅपी ट्रॅव्हिलग!
viva@expressindia.com