मालकीण: काय गं सखू, तीन दिवस कुठे होतीस..? सांगून का नव्हती गेलीस..?
सखू : बाईसाहेब, म्या गावाला गेली व्हती आणि फेसबुकवर स्टेटस टाकलं व्हतं की.. सायबांनी लाइक बी केल व्हतं.. गेल्या काही दिवसांपासून हा मेसेज अनेकांच्या इनबॉक्समध्ये घुटमळतोय.
त्या दिवशी मित्राच्या मेसेजने अचानक एक विचार मनात आला. यातला विनोदाचा भाग सोडला तर खरंच जाणवेल की, या सोशल नेटवर्किंग साइट्सने आपलं लाइफस्टाइल पार बदलून टाकलं आहे. पूर्वी सकाळी उठल्यावर हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी म्हणणारी पिढी आता कालबाह्य़ झालेली आहे. अलीकडे तरुण पिढी आज उठल्याबरोबर सर्वप्रथम मोबाइल हातात घेऊन फेसबुक किंवा ट्विटरवर ट्विट करणं अधिक पसंत करते, कदाचित देव माणसांतच असतो ही उक्ती त्यांना पटलेली असावी.
ग्रॅहम बेलच्या टेलीफोनच्या शोधानंतर संपर्क क्षेत्रात झपाटय़ाने प्रगती झाली- संगणक, इंटरनेट. मग जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा वेळ कमीकमी होत गेला, धावपळीच्या जगात शर्यतीच्या घोडय़ाप्रमाणे धावताना माणसाला मित्र, स्नेही, नातेवाईक यासाठी वेळच उरला नाही. मग यावर उपाय म्हणून की काय, या सोशल नेटवर्किंगचा शोध लागला. आपल्या जगभरातील मित्रांना दररोज भेटण्याची, त्यांच्या बऱ्यावाईटाला व्हच्र्युअली का होईना पण उपस्थित राहण्याची संधी आपल्याला या सोशल नेटवर्किंग साइट्सनेच उपलब्ध करून दिली. याहू, जीटॉकवरून फक्त शब्दांनी सुरू झालेल्या प्रवासात पुढे स्माइलीजने इमोशन्सचे दान टाकले, मग वेबकॅममुळे तर अनेक वृद्धांना आपल्या सुना-नातवांना याची देही याची डोळा बघण्याची इच्छापूर्ती करून दिली. असं म्हणतात की, आजची टेक्नॉलॉजी ही उद्याचा इतिहास असते, त्याचप्रमाणे या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही बरेचसे आमूलाग्र बदल घडून आले, त्यांच्यातही आता अटीतटीची स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. फेसबुक, ट्विटर, ऑरकूट, लिन्कड-इन, यू टय़ूब यांसारख्या अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स स्वत:चे असे काही वेगळेपण काढून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामागे मानवजातीला एकत्र आणणे, त्यांचा एकमेकांशी संवाद-चर्चा घडवून आणणे हा एकमेव उद्देश आहे असं तर अजिबात समजू नका. यामागेही अर्थार्जन हाच मुख्य हेतू आहे. जर माझ्या साइटवर सर्वाधिक लोक भेट देत असतील तर मला माझ्या साइट्सवर प्रसिद्ध होणाऱ्या अॅडव्र्हटाइझसाठी मला सर्वाधिक पैसे मिळतील. त्यांचं काही का असेना, पण त्यामुळे आपलं जीवनमान सुधारलं(?) आहे. या साऱ्यांच्या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे ते म्हणजे फेसबुक. या फेसबुकने आज टेक्नॉलॉजी क्षेत्रातील साऱ्या पात्रांचे दान आपल्या पात्रात पाडून घेतलेले दिसते. आज टीव्ही असो, मोबाइल असो, फ्रिज असो अगर आलार्म वाजविणारं घडय़ाळ असो, त्यावरून फेसबुक ऑपरेट करता आलं पाहिजे हा लोकांचा गॅजेट खरेदीचा मुख्य क्रायटेरिया झाला आहे. त्याशिवाय फक्त मेसेजिंग आणि आपल्या आप्तेष्टांपर्यंत आपापले संदेश पोहोचविण्यासाठी अस्तित्वात आलेले व सध्या नेत्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत साऱ्यांना भुरळ घालणारे ट्विटर, ऑर्कूट आपल्या जीवनातील महत्त्वाचे क्षण शब्दांखेरीज दृश्य माध्यमातून साऱ्यांपर्यंत पोहोचविणारे पिकासा, फ्लीकर किंवा मग आपले प्रोफेशनल स्टेट्स जपणं, आपण काम करीत असलेल्या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी व संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी असलेले लिन्कड-इन या साऱ्यांमुळे आपण सोशली अॅक्टिव्ह झालो आहेत हे मात्र नक्की. अनेकांना या लिंक्ड-इनमुळे रोजगारही मिळाला आहे. आपल्या क्षेत्रांतील लोकांना जोडून नवनवीन कल्पनांना जन्म देणारी ही सोशल नेटवर्किंग साइट सध्या बरीच प्रसिद्ध होत आहे.
या सोशल नेटवर्किंगसाइट्सने शैक्षणिक क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणले आहेत. घरात रोज येऊन पडणारे वर्तमानपत्र कधी तरीच नाक मुरडत हातात घेणारी आजची पिढी निदान, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमाने डायरेक्ट नाही तर इनडायरेक्टली तरी वर्तमानपत्रे चाळू लागलेली दिसते. मध्यंतरी माझ्या एका मित्राच्या कॉलेजमध्ये स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामद्वारे एक मुलगी शिकायला आली होती. त्या वेळी तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सगळ्या असाइनमेंट्स, प्रोजेक्टस् यांचं सबमिशन ब्लॉगद्वारे केलं जातं. म्हणजे विद्याथ्यार्ंनी आपला ब्लॉग उघडायचा व त्यावरच सगळे असाइनमेंटस, प्रोजेक्टस दिलेल्या वेळेत पोस्ट करायचे, संबंधित विषयाचे शिक्षक तो ब्लॉग फॉलोअर तर असतातच त्यामुळे लागलीच त्यांना ते चेक करता येतात. व्यवसाय विकत घेण्याचा त्रास नाही की प्रोजेक्ट पेपर वर्षभर सांभाळण्याचा ताप नाही. हे ब्लॉग्ज म्हणजे ब्लॉगर्ससाठी पैसे कमाविण्याचे साधन झाले आहे. म्हणजे समजा, तुम्ही प्रवासासंबंधी एखादा ब्लॉग चालवीत आहात, तर कोणतीही टुरिस्ट कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल व तुमचा ब्लॉग त्यांच्या इन्फरमेशन पेजशी कनेक्ट करण्यासाठी योग्य ते पैसे देईल, यामुळे आता बऱ्याच गृहिणी कमावत्या झाल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्सवर उपलब्ध होणारे गेम्सही फारच मोलाचे कार्य करताना दिसतात. माझा एक मित्र फक्कड बुद्धिबळपटू आहे. पूर्वी तो त्याच्याशी खेळायला कुणी नाही म्हणून फार रडायचा, पण सध्या तो प्ले चेस डॉट कॉम, चेस क्युबसारख्या साइटवर देशविदेशांतील खेळाडूंशी बुद्धिबळ खेळतो व त्यामुळे त्याचा खेळ सुधारल्याचेही मान्य करतो. बेचकी गलोलने आंबे, पेरू तोडताना लागणारे कौशल्य अॅन्ग्रीबर्डस खेळताना नाही मिळविता येत, पण आनंद मात्र नक्कीच मिळविता येतो. पूर्वी पुस्तकात वाचलेली किंवा ऐकलेली एखादी ओळ लगेचच आपल्या टिपणवहीत टिपली जायची, पण आता ती ओळ फेसबुकच्या स्टेटसवर टिपली जाते आणि शेअरही होते.
आज सोशलनेटवर्किंग खरंच खूप सोशल झालंय. नातेसंबंध जपण्यासाठी आलेल्या या सोशल साइट्समुळे आता अनेक मार्केटिंग कंपन्यांचं फावतंय. अलीकडे बऱ्याच कंपन्यांमध्ये तर सोशल साइट्सवरील अॅडव्हर्टाइझिंगसाठी स्वतंत्र विभाग असतो. आपल्या बॉलीवूड स्टार्सनी तर स्वत:ची पब्लिसिटी करण्यासाठी या साइट्सचा पुरेपूर वापर केल्याचं दिसून येतंय. शाहरूखने तर त्याच्या ‘रा-वन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यू टय़ूबवर स्वतंत्र पेज बनविले आहे. आपल्या येथील नेत्यांना याचा फारसा वापर करता आलेला दिसत नाही; परंतु शशी थरूर, सुषमा स्वराज यांनी नव्या काळाची पावले ओळखली असून त्यांनी याचा वापर करण्यास सुरुवात केलेली दिसतेय.
सोशल नेटवर्किंग खरंच सोशल झालेलं आहे, कारण अनेक सोशल विषयांवर काम करणाऱ्या संस्था या माध्यमाद्वारे तळागाळापर्यंत पोहोचताना दिसतात. चेंजिंग रूममध्ये लपविलेला कॅमेरा कसा ओळखावा याचे ज्ञानही यामार्फतच लोकांपर्यंत पोहोचविले जाते. आमच्या विभागाच्या नगरसेवकाने नुकतेच फेसबुकवर अकाऊंट उघडले तर कोणी तरी लगेचच रस्त्यावरील खड्डय़ांचा फोटो काढून त्यांना त्यामध्ये टॅग केले. विनोदाचा भाग सोडला तर लोकांना आपल्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत व पर्यायाने सरकापर्यंत या सोशल नेटवर्किंगमार्फत पोहोचविता येतात. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद हादेखील या सोशल नेटवर्किंग साइट्सचे यशच म्हणावे लागेल.
मुख्य म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्सवरील मैत्रीला वय नसतं, त्यामुळे ६० वर्षांचे आजोबा १६ वर्षांच्या मुलाचे मित्र अगदी आरामात होऊ शकतात. कॉलेजगोईंग मुलांचे पालकही या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत यावर कटाक्ष ठेवू लागले आहेत; परंतु या व्हच्र्युअल जगात वावरताना लांबची माणसं जवळ करण्याचा प्रयत्न करताना आपण आपल्याजवळची माणस लांब करत चाललो आहोत हेही तितकंच खरं आहे. आपला मुलगा आजारी आहे हे त्याच्या फेसबुक स्टेटसवरून कळतं. आजीच्या उबदार स्पर्शाची सर मॉनिटरवरून येत नाही. चिऊकाऊच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या कानातला हेडफोन तोकडाच पडतो. मित्रांच्या कट्टय़ांवर जाऊन मोकळं होणं न जमल्याने फेसबुकवर आपण मोकळे होतो खरे व त्यावर अनेकजण अनेक सल्लेही देतात, पण विश्वासाचा हात खांद्यावर ठेवून सांत्वन करणारा मित्र फ्रेंडलिस्टमध्ये तरी नाही भेटत आपल्याला.
असो, काहीही असलं तरी या सोशल नेटवर्किंग साइट्सने जगण्याला एक नवीन दिशा नक्कीच दिली. याचा फायदा काय आणि तोटा काय हा आपला आपण ठरवावा.
वुई आर सोशल…
सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून जगभरात अनेक मित्र जमवले. मित्रांची संख्या वाढल्यावर कॉलरही टाइट झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are social