तुम्ही कधी विचार केलाय तुमच्या ड्रेसला लायनिंग कोणतं आहे? लायनिंग अर्थात अस्तर हे तसं बिनमहत्त्वाचं. बहुतेकदा टेलर सांगतो ते मुख्य कापडाला मॅचिंग कापड आपण लायनिंगला निवडून मोकळे होतो. पण कित्येकदा योग्य लायनिंग तुमच्या ड्रेसला एक वेगळाच उठाव मिळवून देतं. गेले काही आठवडे आपण कपडय़ांच्या विविध घटकांबाबत बोलत आहोत. अर्थात पण हे सर्व घटक कपडय़ांमध्ये उठून दिसणारे, दर्शनी भागातील असतात. त्यामुळे आपण जागरूक असतो. पण लायनिंग आत असतं. पारदर्शीपणा लपवण्यासाठी, एम्ब्रॉयडरीच्या संरक्षणासाठी लायनिंग लावलं जातं. पण कधी याचं
लायनिंगसोबत थोडेसे प्रयोग करून ड्रेसला वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केलायत कधी?
लायनिंगच्या नावीन्यपूर्ण वापराबद्दल बोलण्याआधी याच्या रेग्युलर वापराबद्दल आणि प्रकारांबद्दल बोलूया. एरवी कमी वजनाचं कॉटनचं, मॅचिंग लायनिंग आपण निवडतो. पण प्रत्येक कपडय़ाच्या प्रकारानुसार, कापडानुसार लायनिंगची निवड केली जाते. कॉटन कपडय़ांसाठी हलक्या कॉटनचं अस्तर वापरतात.
पण हे कॉटन स्टार्च नसलेलं असणं महत्त्वाचं आहे. कॉटन धुतल्यावर आकसतं, त्यामुळे शिवण्यापूर्वी धुऊन घेणं गरजेचं असतं. या अस्तराच्या कापडाचा रंग निघणार नाही याची चाचपणी करणंही महत्त्वाचं आहे. नाहीतर लायनिंगचा रंग मुख्य कपडय़ांना लागून ते खराब होण्याची शक्यता असते.
रेयॉन कापड हे लायनिंगसाठी उत्तम कापड मानलं जातं. वुलनच्या किंवा सूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडांसाठी रेयॉन वापरता येते. त्यामुळे फॉर्मल सूट्स, स्कर्ट्समध्ये हे लायनिंग पाहायला मिळतं. क्रेप किंवा पॉलिएस्टर सिल्कसुद्धा लायनिंगसाठी उत्तम पर्याय आहे. विशेषत: या सिल्कमध्ये रंगांची विविधता तसंच प्रिंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे पार्टीवेअर स्कर्ट्स, ड्रेसेस यामध्ये सिल्क लायनिंगमुळे मजा आणता येते. या कापडाला आकसणे, रंग सुटणे हे प्रकार होत नाहीत.
ड्रेस शिवताना ड्रेसला मॅचिंग रंगाचे लायनिंग निवडतो. कारण आपला हेतू त्याला झाकण्याचा असतो. पण कॉन्ट्रास्ट लायनिंग वापरून ड्रेसला वेगळाच लुक देता येतो. विशेषत: असिमेट्रिकल, हाय-स्लिट ड्रेसला असे कॉन्ट्रास्ट लायनिंग छान शोभून दिसते. कधीतरी लांब स्लिटच्या ड्रेसच्या लायनिंगला त्याच्यापेक्षा कमी उंचीची स्लिट देऊन पाहा. ड्रेसच्या आतून हळूच डोकावणारं लायनिंग ड्रेसला लेअरिंगचा परिणाम देतं. फॉर्मल कोट, जॅकेट या प्रकारांमध्ये लायनिंगचं महत्त्व अधिक आहे. सूट्सना लायनिंगमुळे क्रिस्पी लुक येतो. पण हेच लायनिंग जड वजनाचं आणि बल्की असेल तर मात्र सूट ढगळ दिसतो. त्यामुळे त्यासाठी योग्य लायनिंग निवडणं महत्त्वाचं आहे. क्रेप सिल्क, रेयॉन कापड यासाठी वापरता येतं. या सूट्ससाठी तुम्हाला प्रिंटेड लायनिंग वापरता येऊ शकतं. चेक्सचं लायनिंग तर उत्तमच. विशेषत: पार्टीवेअर जॅकेट्समध्ये अशा लायनिंगचा छान उपयोग करून घेता येतो. साडीला लावण्यात येणारे फॉल हेसुद्धा लायनिंगचाच एक भाग आहे. त्याच्याकडेसुद्धा आपण असंच दुर्लक्ष करतो. पण एखाद्या छान कांजीवरम किंवा सिल्क साडीला कॉन्ट्रास्ट फॉल लावून बघा. साडीला छान उठाव मिळेल.
१. साडीला लावायचा फॉल हा लायनिंगचाच भाग आहे. कॉन्ट्रास्ट फॉल साडीला वेगळा परिणाम देऊन जाईल. २. डे ड्रेस किंवा जॅकेट्ससोबत प्रिंटेड लायनिंग सुंदर दिसते. विशेषत: प्रिंटेड कपडय़ांना प्रिंटेड लायनिंग अजूनच उठाव आणतं. ३. चेक्स, स्ट्राइप प्रिंट्सचं कापड लायनिंगसाठी उत्तम असतं. हे लायनिंग फॉर्मल्ससोबतसुद्धा छान दिसतं. ४. सूट्सच्या नेकलाइनमधून लायनिंग डोकावतं. त्यामुळे त्या जागेवर मुख्य कापड वापरलं जातं. त्याऐवजी प्रिंटेड लायनिंग वापरून पाहा. ५. एकाच प्रिंटच्या पण वेगवेगळ्या रंगांच्या कापडांचा वापर मुख्य आणि लायनिंग म्हणून वापरायला काहीच हरकत नाही.
६. एखाद्या प्लेन ड्रेसला प्रिंटेड लायनिंग ग्लॅमर मिळवून देतो.