ड्रेस शिवायचा म्हटल्यावर कापडाचं महत्त्व काय, हे वेगळं काही सांगायची गरज नाही. कापडाचा रंग, पोत, प्रकार, वजन पाहिल्यावरच त्यापासून कोणत्या प्रकारचा ड्रेस शिवता येईल, ते ठरवता येतं. प्रत्येक प्रकारचं कापड वेगवेगळ्या पद्धतीचा परिणाम देतं. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम ड्रेसमध्ये साधायचा असेल तर योग्य कापड निवडणं गरजेचं आहे. कॉटन पातळ असलं तरी त्याचा फॉल सरळ रेषेत असतो. घेरदार ड्रेसमधील सुळसुळीतपणा कॉटनमधून मिळत नाही.

त्यासाठी मलमल योग्य ठरतं. सिल्क, क्रेप, जॉर्जेट, शिफॉनमध्ये हा सुळसुळीतपणा मिळतो. तसंच या कापडांचा ड्रेस कितीही घेरदार शिवला तरी फुगीर दिसत नाही. पण टसर सिल्क, ब्रोकेड कापड ड्रेसला फुगीरपणा देतं. कापडाचे रंग, प्रिंट्स आणि त्यानुसार एखाद्या ड्रेसमध्ये तुम्ही कसे दिसाल यावर वारंवार चर्चा होतच असते. पण यापलीकडे ड्रेसच्या कापडासोबत खेळण्याचा प्रयत्न कधी केलायत का? नसेल तर या वेळी नक्की करा. कारण एकाच कपडय़ातून अख्खा ड्रेस शिवणे आता ओल्ड फॅशन झालंय.

वेगवेगळ्या कापडांची सुंदर सरमिसळ करून तयार केलेले ड्रेसेस हा नवा ट्रेंड आहे. कपडय़ांच्या बाजारात गेल्यावर एखादं आपल्याला पसंत पडलेलं कापड घेतो आणि त्यातून कुर्ता, ड्रेस शिवून मोकळे होतो. पंजाबी सूटसारखा प्रकार शिवायचा असेल तर कुर्ता, सलवार, ओढणीसाठी वेगवेगळं कापड निवडलं जातं. त्यातही स्लीव्ह, हेमला लावायला बॉर्डर, नेकलाइनला एखाद्या एम्ब्रॉयडरीचा पॅच या पलीकडे वेगळ्या कापडाचा विचार आपण सहसा करत करत नाही. बाजारात मिळणाऱ्या ‘सूटपीस’ या प्रकारात तर संपूर्ण पंजाबी सूटसाठी लागणारं कापड अगदी मोजून मापून दिलं जातं. त्यात ठरावीक पॅटर्नऐवजी वेगळ्या डिझाइन वापरायचं म्हटलं तरी कापड पुरत नाही. पण यापलीकडे ड्रेसचं कापड वेगळ्या पद्धतीने कसं वापरता येईल, असा विचार करून ड्रेस शिवायला घ्या. अर्थात थोडी मेहनत आणि टेलरशी थोडी हुज्जत घालावी लागेल, पण तुमचं स्टाइल स्टेटमेंट उठून दिसेल हे नक्की. साधारणपणे एक कुर्ता किंवा ड्रेस शिवताना दोन, तीन कापडांशी सहज खेळता येतं. मजा म्हणजे कित्येकदा ड्रेस शिवून झाल्यावर आपल्याकडे उरलेलं कापड असतं (टेलरकडे ड्रेस शिवल्यावर बरंच कापड उरतं. त्याच्याशी थोडं भांडून तर कधी लाडीगोडीने ते मागायला विसरू नका.). त्याचा वापर या प्रयोगांमध्ये नक्कीच करता येतो.

अशा वाया जाणाऱ्या कापडाच्या तुकडय़ांपासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे एकाच ड्रेसमध्ये कुठकुठले प्रयोग करता येतील –

पहिल्यांदा योग्य कापडांची निवड करणे गरजेचे असते. सर्व फॅब्रिक्स एकाच वजनाची असणं गरजेचं आहे. (कापडाच्या वजनाचे परिमाण जीएसएम हे आहे.grams per square meter  म्हणजे एक स्क्वेअर मीटर लांबीच्या कापडाचे वजन मोजले जाते. कापडविक्रेत्यांकडे प्रत्येक कापडाच्या वजनाची नोंद असते.)

कापडाचा फॉलसुद्धा सारखाच असला पाहिजे. कडक कॉटनसोबत क्रेप वापरू शकत नाही. त्यामुळे ड्रेसचा फॉल बिघडू शकतो. कॉटन, ब्रोकेड, टसर सिल्कसारखे कडक कापड एकमेकांसोबत सहज वापरता येईल. शरीरावर ते एका सरळ रेषेत पडतात. त्यामुळे त्याच्या फॉलची काळजी करायची गरज नसते. सुळसुळीत कापडांच्या बाबतीत मात्र ही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या कापडांचा ड्रेस शिवताना एकाच प्रकारचे पण वेगवेगळ्या रंग, प्रिंट्सचे कापड निवडा.

ड्रेसचे विभाजन कसे करायचे आहे हे आधी नक्की करा. ‘प्रिन्सेस सिम’ची मदत तुम्ही घेऊ शकता. अनारकलीमध्ये ड्रेसला घेर आणण्यासाठी उभ्या रेषेत कापडांचे पॅनल कापून जोडलेले असतात. त्यांना प्रिन्सेस सिम म्हणतात. आडव्या रेषेत ड्रेसचे विभाजन एम्पायर लाइन (बस्टवर आणि नेकलाइन खाली), बस्टलाइन (बस्टखाली), वेस्टलाइन (कंबर), गुडघ्याजवळ करता येते.

सध्या स्लीव्ह ट्रेंडमध्ये आहेत. साध्याशा ड्रेसला वेगळ्या रंगाची स्लीव्ह लावूनसुद्धा छान लुक मिळतो. एका ड्रेसला दोन वेगवेगळ्या प्रिंटचे स्लीव्ह लावलेले तुम्हाला यंदा पाहायला मिळतील. हा प्रयोग कुर्त्यांसाठी नक्कीच करता येईल.

फ्लेअर ड्रेसमध्ये कपडय़ासोबत खेळण्यासाठी भरपूर वाव मिळतो. त्यामुळे स्ट्रेट ड्रेसऐवजी घेरदार लांब उंचीचे ड्रेस या प्रकारासाठी उत्तम आहेत.

प्रिंट निवडताना बोल्ड प्रिंटऐवजी सटल, रिपीट, लहान आकाराचे, फ्लोरल प्रिंट निवडा. सेल्फ कलर प्रिंट्स प्रयोग करण्यासाठी चांगले असतात. भौमितिक प्रिंट्स एकमेकांसोबत सहज जुळतात. त्यामुळे वेगवेगळ्या भौमितिक प्रिंट्ससोबत खेळणं सोप्पं असतं.

‘फॅब्रिक मॅन्युप्लेटिंग’चे प्रयोग कित्येक डिझायनर्स करतात. यामध्ये कापडाला विशिष्ट पद्धतीने शिवून वेगवेगळ्या प्रकारच्या प्लिट्स, बो बनवता येतात. यामुळे कापडाचे सौंदर्य खुलते. इंटरनेटवर या पद्धती उपलब्ध आहेत. घरच्या घरी सुई-धाग्यानेही हे प्रकार करता येतात. बाजारातील तयार एम्ब्रॉयडरी पॅचऐवजी यांचा वापर करता येईल.

जुन्या साडय़ांच्या बॉर्डर्स खालोखाल एकत्र शिवून त्याचं एक कापड करता येतं. याचा उपयोग स्लीव्ह, नेकलाइन, बटनपट्टी म्हणून करता येतो.

मध्यंतरी एसिमेट्रिकल ड्रेसचा ट्रेंड आला होता. एकाच रंगाचे पण विविध प्रिंट्सचे कापड एकत्र वापरल्यास ड्रेसमधील असिमेट्री उठून दिसते.

छायाचित्रांतील तपशील :
१. जॅकेट, श्रगचा वापर सिंपल ड्रेसला उठाव आणण्यासाठी करतात. दोन वेगवेगळी फॅब्रिक वापरून जॅकेटमध्येही नाविन्य आणता येईल. २. उभ्या कळ्यांचा अर्थात प्रिन्सेस सिम पॅटर्नचा ड्रेस अशा वेगवेगळ्या कापडाच्या प्रयोगासाठी उत्तम. प्रिन्सेस सिममुळे ड्रेसला उठाव येतो. ३. कपडय़ांना घेरा जितका अधिक तितका कापडासोबत खेळण्याच्या संधी अधिक. त्यामुळे घेरेदार ड्रेससोबत वेगवेगळे कापड नक्कीच वापरा. ४. शॉर्ट ड्रेसेसमध्ये हेमलाईन, लेअरिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या कापडांचा छान उपयोग करून घेता येईल.

Story img Loader