सरत्या वर्षांला निरोप देताना सेलिब्रिटी नव्या वर्षांत त्यांचे प्लॅन्स काय आहेत हे सांगताहेत.
श्रीदेवी
दिग्दर्शिका गौरी शिंदेने ‘इंग्लिश-विंग्लिश’मधील शशी गोडबोलेच्या योग्य भूमिकेद्वारे माझे पुनरागमन केले हे माझे या वर्षीचे विशेष. त्या खुशीत हे वर्ष संपतेय. त्याला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत हे मी पती बोनी कपूर, दोन्ही मुली जान्हवी व खुशी यांच्यासोबत घरीच करेन. गप्पा-टप्पा-मौज-मजा-मस्ती-धमाल यांची रेलचेल होईल. नवीन वर्षांत चित्रपटाच्या बाबतीत मी नेमके काय करेन हे इतक्यात सांगता येत नाही. सध्या प्रसार माध्यमासमोर येणे, सहकुटुंब फोटोसेशन, मुलाखती यातच रमले आहे.
मेघा धाडे
आमचा एक ग्रुप खूप खूप दंगा-मस्ती-मजा करीतच ‘नवीन वर्षांचे धूम स्वागत’ करेल. आमच्या ग्रूपमध्ये प्रिया अरुण, शिल्पा नवलकर, राजन ताह्मणे इत्यादी आहेत. नवीन वर्षांत तब्येतीला मी सर्वाधिक महत्त्व देणार. तशी मी ‘फिटनेस’बाबत नेहमीच कॉन्शस असते, पण आता जरा जास्तच लक्ष देणार. समाजात वाढलेल्या स्त्री-अत्याचाराबाबत शक्य त्या माध्यमातून जागरूकता करणार, त्याचप्रमाणे मला माझे वाचनदेखील वाढवायचे आहे. कारकिर्दीबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कन्नड-तमिळ चित्रपटांमुळे मी दक्षिणेकडे चालले आहे.
सोफिया चौधरी
भव्य डान्स इव्हेन्टमध्ये ‘झूम’के नाचून नवीन वर्षांचे स्वागत करतेय. गेल्या काही वर्षांपासून ‘नाचगाण्या’नेच नवे वर्ष उजडते. पण यंदा मीच गायलेले ‘हंगामा हो गया’ जोरात आहे. ‘अनहोनी’ चित्रपटातील हे ‘झिंग’ आणणारे नृत्य बिंदूजींकइतके मी थरारक-आकर्षक करू शकले अथवा नाही हे मी कसे सांगणार? मला हिंदी चित्रपटातून भूमिका साकारण्यातही विशेष रस आहे हे मी नवीन वर्षांत आलेल्या चित्रपटसृष्टीसमोर नेण्याचा ‘जोर-शोर’से प्रयत्न करणार.
तेजश्री खेले
या वर्षीचे नवीन वर्षांचे स्वागत मी चेन्नईतून करेन. तमिळ-तेलगू-कन्नड अशा बेचाळीस चित्रपटांतून काम केल्यावर आता दोन मल्याळम चित्रपटांतून भूमिका साकारत आहे. मराठी-गुजराती चित्रपटांतूनही काम करते. त्यामुळे नियोजन वगैरे करण्यापेक्षा तारखा जुळतील त्यानुसार काम करण्याला मी प्राधान्य देते. आपले नृत्य अधिकच सहज व आकर्षक व्हावे हेच नवीन वर्षांचे उद्दिष्ट.
शृजा प्रभुदेसाई
जाणाऱ्या वर्षांला कसा निरोप द्यायचा नि नवीन वर्षांचे स्वागत कसे करायचे याबाबत माझे कधीही पूर्वनियोजन नसते. ऐनवेळी व जसे योग्य वाटेल तेच करायचे हा माझा अनेक वर्षांचा ‘सही फंडा’ आहे. पण जे काही असेल ते घरच्या घरीच करते. खाओ-पिओ-मस्त-जिओ असेच साधारण स्वरूप असते. रात्रभर जागल्याने नवीन वर्षांची पहाट कशी असते याची कल्पना येते. नवीन वर्षांत कटाक्षाने व्यायामाकडे लक्ष देणे, सहा वर्षांच्या मुलाला अधिकच वेळ देणे व मराठी चित्रपटातून चांगल्या भूमिकेची अपेक्षा ठेवणे ही ठळक उद्दिष्टे आहेत. सावकाशीने निश्चितपणे ध्येय साध्य करणे हेच माझे कायम ‘लक्ष्य’ असते. नवीन वर्षांत तेच स्वरूप ठेवेन.
सीया पाटील
तीस डिसेंबरपासूनच जुन्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत याची प्रक्रिया सुरू करतेय. त्या रात्री रोहा येथे ‘मराठी तारका’ कार्यक्रम आहे. आपल्या कामानेच नवीन वर्षांचे स्वागत करावे अशा मताची मी आहे. त्यामुळे दारूकाम-नाचकाम-लगट अशी ‘अय्याशी’ मला पसंत नाही हे स्पष्ट आहे. स्विफ्ट व्हीडीआय ही गाडी घेऊन २०१२ला निरोप दिला, तर २०१३च्या डिसेंबपर्यंत मुंबईत स्वत:चे घर घेऊन एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करायचा विचार आहे. सांगलीतून आलेली माझ्यासारखी मुलगी मुंबईत स्वत:ची वाटचाल करू शकली हेच विशेष. ‘जागरण’ व ‘योगायोग’ हे नवीन वर्षांतील माझे महत्त्वाचे चित्रपट. तसेच एका हिंदी चित्रपटातून मी स्मिता पाटीलची आठवण येईल अशी भूमिका साकारत आहे.
ईशा कोप्पीकर
दिग्दर्शक मनोहर सरवणकर यांच्या ‘मात’ या चित्रपटाद्वारे मी मराठीत आले हे या वर्षीचे सर्वात मोठे विशेष नवीन वर्षांत पडद्यावर येईल. या चित्रपटासाठीचे माझे मराठी सुधारण्यासाठी माझा हीरो समीर धर्माधिकारी व दिग्दर्शकांनी खूप मदत केली. या चित्रपटाच्या विचारातच मी नवीन वर्षांचे स्वागत करेन.
मृण्मयी कोलवणकर
कुटुंबासह ‘लवासा’मधील फॉरच्युन स्पॉटवर ३१ डिसेंबरला मस्त निरोप व नवीन वर्षांचे अगदी दिलखुलास स्वागत असा माझा बेत आखलाय. मनोरंजन उद्योगातील कामासाठी अर्थात करियरसाठी नेहमीच वेळ देते. पण ‘आपली माणसे, आपल्या भावना’ ही गोष्टदेखील जपायला हवीच. नवीन वर्षांत माझा ‘जरासी लाईफ’ हा पहिला हिंदी चित्रपट झळकेल. त्यातील माझ्या कामाबद्दलच्या इतरांच्या प्रतिक्रिया कशा आहेत व मला स्वत:ला माझ्या कामात कोणते गुण-दोष दिसतात हे अजमावणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. एक मराठी युवती, तीदेखील पुण्यातील मुलगी हिंदी चित्रपटसृष्टीत वावरतेय, याबाबत मराठी समाजाला विलक्षण कुतूहल असते. हे गेले काही दिवस माझ्या लक्षात येत आहे. नवीन वर्षांत याच गोष्टीतून मला काही शिकता येईल असे वाटते. सर्वानाच नव वर्षांच्या शुभेच्छा!
संदीप कुलकर्णी
मी अगदी वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षांचे स्वागत करतोय. नवीन वर्षांत अकरा जानेवारी रोजी झळकणाऱ्या माझ्या ‘अजिंक्य’ या चित्रपटाचे ३१ डिसेंबरच्या रात्रौ ‘प्रमोशन करतोय, पण कसे? तर नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांनी स्थापलेल्या ‘नृत्य संस्थे’चे काम आता त्यांच्या पत्नी पाहतात. त्यांनी त्या दिवशी आयोजिलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘अजिंक्य’वर विशेष ‘फोकस’ आहे. त्यानंतर मित्रांसमवेत गप्पा-टप्पा होतील. नवीन वर्षांत ‘वेगळे काही करता येईल का’ याचा विचार होईल. ‘प्रेमसूत्र’ हा मराठी व निखिल अडवाणीचा नाव न ठरलेला हिंदी चित्रपट हेच २०१३ साठी माझे विशेष आहे.
मिलिंद गवळी
३१ डिसेंबरच्या रात्रौ लवकर झोपणे व १ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे लवकर उठणे, असे मी गेली काही वर्षे नवीन वर्षांचे स्वागत करतो आहे. माझे नवीन वर्ष ‘गुढी पाडवा’ आहे, पण ३१ डिसेंबरच्या रात्री दारू-अपघात व गुन्हे या तीन्हीमध्ये होणारी वाढ मला तरी खूप चिंताजनक वाटते. बरेच जण १ जानेवारीच्या नवीन वर्षांचे ‘स्वागत’ झोपूनच करतात. ते त्या दिवसाचा ‘सूर्योदय’ पाहतच नाहीत. अरेरे, काय म्हणायचे याला? नवीन वर्षांत ‘शूर आम्ही सरदार’ व ‘त्रिकूट’ हे माझी वेगळी भूमिका असणारे चित्रपट झळकतील. ‘आम्ही का तिसरे’पासून माझ्या कारकिर्दीने नवे वळण घेत माझा ‘ग्रामीण हीरो’ ही प्रतिमा बाजूला सारली. या प्रवासात ‘कॅम्पस’ काळातील माझा खलनायकही इतिहासजमा झाला. या सगळ्याची दखल मी ‘पाडव्या’ला घेईन..