डॉ. अपूर्वा जोशी
भांडवल उभारणी ही एक सततची प्रक्रिया आहे, स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना आणि नवीन कल्पना मोठी करायला लागते ते भरपूर भांडवल. मागील लेखात आपण बूट स्ट्रॅप आणि सीरिज ए या राऊंडबद्दल वाचले. आता या लेखात आपण पुढील सिरीजचा आढावा घेणार आहोत.
सिरीज बी राऊंड
केवळ ५० टक्केच स्टार्टअप या राऊंडपर्यंत पोहोचतात. ज्या स्टार्टअपचे उत्पादन किंवा सेवा हळूहळू परिपक्व होत जातात, विक्री वाढत जाते आणि आधीच्या राऊंडमध्ये उभ्या केलेल्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला गुंतवणूकदारांना मिळालेला असतो त्याच स्टार्टअप या राऊंडमध्ये यशस्वी भांडवल उभारणी करू शकतात. या राऊंडपर्यंत पोहोचलेल्या स्टार्टअपकडे ग्राहकांचा भरपूर डेटा जमा झालेला असतो, या राऊंडमध्ये ग्राहकांचा खरेदीचा पॅटर्न, ग्राहकांची खरेदी क्षमता हा वास्तविक डेटा मानला जातो. या फेरीत उभा केलेला पैसा व्यवसायवृद्धीसाठी किंवा भौगोलिक विस्तारासाठी वापरला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करणे, अथवा तुमच्या व्यवसायाविषयी अधिक जाहिरात करून ब्रॅण्ड शक्तिशाली करणे, व्यवसायातील मोठी उलाढाल हाताळण्यासाठी नवीन नियुक्ती करणे आदी कारणांसाठी खर्च केला जातो. या फेरीत भाग घेणाऱ्या गुंतवणूकदारांचा यशस्वी होऊन बाहेर पडायचा मार्ग ठरलेला असतो, वास्तविक नफा नसला तरी विक्रीचा जोर वाढत असेल तर या फेरीत प्रमुख व्हेंचर कॅपिटल फंड गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.
सिरीज सी राऊंड
सिरीज सी व्यवसायाच्या स्केलिंग म्हणजेच व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यासाठी आहे. या टप्प्यातील गुंतवणूकदार सर्वात मोठय़ा उद्यम भांडवल निधी (व्हेंचर कॅपिटल फंड), प्रायव्हेट इक्विटी कंपन्या आणि कॉर्पोरेशन्स असतील. आतापर्यंत भेटलेल्या गुंतवणूकदारांमधले सर्वात जास्त आव्हानात्मक गुंतवणूकदार या टप्प्यात भेटतात.
त्यांच्याकडे डय़ू डिलिजन्स आणि वाटाघाटी करण्यासाठी मोठय़ा टीम्स असतात. या गुंतवणूकदारांकडे त्यांच्याच मोठय़ा क्लायंट्सचे, इतर गुंतवणूकदारांच्या एकत्रित समूहाचे पैसे असतात जे शेवटी स्टार्टअप्समध्ये जातात आणि ही रक्कम आकारमानाने मोठी असते. तुमच्या कंपनीची विक्री या टप्प्यावर येईपर्यंत किमान दहा आकडी झालेली असायला लागते. नवीन पैशाचा वापर हा बाजारावर मक्तेदारी गाजवण्यासाठी, नवीन क्षेत्रात विस्तार करण्यासाठी आणि इतर कंपन्यांच्या किंवा स्पर्धक कंपन्यांच्या, पूरक व्यवसायातल्या कंपन्या यांचे अधिग्रहण, अशा मोठय़ा हालचाली करण्यासाठी केला जातो.
विलीनीकरण अधिग्रहण आणि नोंदणी
तुमच्या स्टार्टअपसाठी पुढील प्रमुख तरलतेचे (लिक्विडिटीचे) प्रसंग म्हणजे मर्जर अॅण्ड अॅक्विझिशन डील होणे किंवा कंपनी भांडवल बाजारात नोंदणीकृत होणे. या टप्प्यानंतर लवकरच बरेच संस्थापक त्यांच्या स्टार्टअपचा अखेरचा निरोप घेतात. एखाद्या सार्वजनिक कंपनीचे प्रमुख म्हणून काम करणे किंवा एखाद्या विभागाचे प्रमुख म्हणून इतर कोणासाठी काम करणे हे जगच खूप वेगळे आहे. बरेच उद्योजक बऱ्याच काळासाठी या गोष्टी सोडू शकत नाहीत; कारण उद्योजकांचा स्टॉक हा वेळेच्या प्रमाणात किंवा उत्पन्नाच्या कालावधीसाठी करारबद्ध केला जाऊ शकतो ज्यासाठी उद्योजकांना त्यांच्या कंपनीबरोबर राहणे आवश्यक असते. उद्योजकांनी या अंतिम टप्प्यावर एक कुशल एम अॅण्ड ए सल्लागाराबरोबर काम करणे सुनिश्चित करायला हवे; जो उद्योजकांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम सौदा मूल्यांकन करण्यास ( इव्हॅल्युएशन ऑफ डील) आणि वाटाघाटी करण्यास मदत करू शकेल.
व्हेंचर कॅपिटल (व्हीसी) विरुद्ध प्रायव्हेट इक्विटी (पीई)
स्टार्टअप्स, निधी उभारणी आणि उद्यम भांडवलामध्ये वाढती प्रसिद्धी आणि उत्सुकतेमुळे बरेच शब्द नेहमीपेक्षा अधिक अस्पष्ट बनले आहेत. यामुळे उद्योजकांनी पैशाच्या उभारणीबद्दल खरोखर गुंतवणूकदारांना कसे सामोरे जावे, याबद्दल त्यांची संदिग्धता वाढली आहे. तर, कोण वित्तपुरवठा करतं? तुम्ही एखादा उपक्रम सुरू करण्याचा किंवा विस्तारित करण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यांना इतके महत्त्व का आहे?
प्रारंभ निधी संकलन (स्टार्टअप फंड रेझिंग)
जेव्हा तुम्ही कुठलीही स्टार्टअप आयडिया विकसित करताय किंवा तुमच्याकडे डेटा आहे, उत्पन्न सुरू झालंय किंवा आता कंपनीचं कामकाज वाढवायचं आहे, तेव्हा कुठले गुंतवणूकदार आहेत जे तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जातील हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपनीचा पुढचा टप्पा काय, निर्गमन धोरण (एक्झिट स्ट्रॅटेजी) काय आहे याचा विचार आवश्यक आहे.
निधी उभारणे आणि संभाव्य निर्गमन धोरणाची दिशा ठरवून कंपनीला त्याप्रमाणे काम करायला लावणे या गोष्टी वेळ घेणाऱ्या आणि तणावपूर्ण असू शकतात. हे गोंधळात टाकणारेसुद्धा असू शकते. गेल्या दोन वर्षांत बरेच काही बदलले आहे. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भिन्न भांडवल स्रोत मोठी भूमिका बजावत आहेत.
विविध मार्केट प्लेयर्स ते कसे आणि कोणत्या टप्प्यावर सहभागी होतील यावर जोर देत आहेत. तर व्हीसी आणि पीई फर्ममधील फरक काय आहेत? या प्रकारात आणखी भांडवल कोण देत आहे?
प्रायव्हेट इक्विटी (पीई)
पीई स्पेस थोडीशी गर्दीची झाली आहे, कारण खासगी इक्विटी कंपन्या, सर्व प्रकारच्या नवीन चॅनेलमध्ये म्हणजेच ‘भाडय़ाने देण्यात येणारी घरे’ या वेबसाइट्सपासून ते चॅनेल पद्धतीने देण्यात येणारे गहाणखत कर्ज (मॉर्ट्गेज लेंडिंग) यामध्ये प्रवेश करतायेत. तरीही, त्यांच्या सर्वात पारंपरिक स्वरूपात खासगी इक्विटी कंपन्या अधिक परिपक्व (मॅच्युअर्ड) कंपन्या खरेदी करतात किंवा त्यामध्ये शेअर घेतात असाच विचार केला जातो. याचा अर्थ ते अशा प्रस्थापित कंपन्यांचा शोध घेतात ज्यांच्या उत्पन्नाची सुरुवात झाली आहे. काही प्रकरणांमध्ये या अशा कंपन्या असतात ज्या कदाचित उत्कृष्टही असतील, पण कंपनीला जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळवण्यासाठी नवीन व्यवस्थापनाची आवश्यकता असू शकते.
viva@expressindia.com