एक होता राजा. त्याला स्वत:विषयी जाणून घ्यायला फार आवडत असे. भाट, चारण, ज्योतिषी राजाला सतत त्याच्याविषयी सांगत राहात. असाच एक दिवस एक ज्योतिषी राजाच्या दरबारी आला. त्याने राजाचा हात पाहून सांगितलं, ‘अरेरे महाराज तुम्ही तर फारच कमनशिबी बुवा. तुमच्या डोळ्यासमोर बायका, मुले, नातू यांचा मृत्यू पाहणं तुमच्या नशिबात आहे’. राजाला त्याचा आला राग. त्याने त्या ज्योतिषाला तुरुंगात डांबलं. मग दुसरा एक ज्योतिषी दरबारी आला. त्याने तोच हात पाहून तेच भविष्य सांगितलं, पण शब्द मात्र वेगळे होते. तो म्हणाला, ‘महाराज तुम्ही फार नशीबवान बुवा. तुमच्या अख्ख्या कुटुंबात तुम्हालाच दीर्घायुष्य लाभलं आहे’. राजाने खूश होऊन त्याला बक्षीस दिलं. आणि रोज त्याच्याकडूनच भविष्य ऐकून घेऊ लागला.
तात्पर्य काय तर एखादी गोष्ट आपल्या आवडीनुसार सांगितली की बरी वाटते आणि तीच गोष्ट आपल्या आवडीनिवडीच्या विरोधात सांगितली की नकोशी वाटते. या कथेतील हे तात्पर्य आजच्या इंटरनेट काळातील बहुतांश वेबसाइटनी चांगलंच ओळखलेलं आहे. आणि म्हणूनच सर्च इंजिनने दिलेले रिझल्ट, इन्स्टाग्रामने सुचवलेले रील्स, अॅमेझॉन सुचवत असलेले प्रॉडक्ट्स, यूट्यूबला दिसणारे व्हिडीओ हे आपल्या आवडीनिवडीप्रमाणे कस्टमाइज्ड होत असतात.
समजा एक आहे आबूराव आणि एक आहे छबूराव. दोघांनी गूगलवर सर्च केलं – कोविड १९. आता आबूराव पडले सरळमार्गी. त्यांना तज्ज्ञांच्या मुलाखती, लसीकरणाची सांख्यिकी अशी माहिती दिसेल. पण छबूरावांना मसालेदार आणि खळबळजनक गोष्टी बघण्यात भारी रस. त्यांना ‘कोविडचं षड्यंत्र’, ‘लसीकरणाचे तोटे’ असा आशय असलेल्या वेबसाइट दिसतील. ‘हेल्दी फूड रेसिपी’ असं सर्च केल्यावर फिटनेस फ्रिकांना हाय प्रोटीन, किटो डाएट असा आहार सुचवला जाईल, तर वेगन मंडळींना सोयामिल्क आणि इतर तत्सम पदार्थ दाखवले जातील. नॉन व्हेजिटेरियन लोकांना मांसाहारी आणि व्हेजिटेरियन मंडळींना बरोबर शाकाहारीच पदार्थ सुचवले जातील.
आपलं स्थान, आपले सर्च रिझल्ट्स, आपण कशावर क्लिक करतो, कुठली गोष्ट जास्त वेळ पाहतो, शॉपिंग पोर्टलवर आपण काय शोधतो, यूट्यूबवर आपण कोणत्या विषयांवरचे व्हिडीओ बघतो, अशा अनेक गोष्टींवर विविध वेबसाइट्सचे अल्गोरिदम्स लक्ष ठेवून असतात. यातून त्यांना आपल्या आवडीनिवडी, आर्थिक स्थिती, राजकीय कल, सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा अनेक गोष्टी कळत असतात. आणि मग त्यांना अनुसरून आपल्याला पुढचे रिझल्ट्स दाखवले जातात. उदाहरणार्थ, एखाद्याने ‘फर्स्ट क्राय’वर लहान मुलांच्या कपडयांची खरेदी केली असेल किंवा यूट्यूबवर ‘कोकोमेलन’ची बालगीतं पाहिली असतील तर त्याच्या ‘बेस्ट स्कूल्स निअर मी’ या शोधाला उत्तर म्हणून लगेच जवळच्या शिशुगटाच्या शाळा दाखवल्या जातील. कारण या व्यक्तीचं मूल ३ ते ४ वर्षांचं आहे याचा अंदाज वेबसाइटच्या अल्गोरिदमने आधीच लावलेला असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा दाखवून वेळ वाया घालवणं त्यांना परवडणारं नसतं. अशा व्यक्तीला इतर वेबसाइटवरच्या जाहिरातीतसुद्धा लहान मुलांचीच खेळणी सुचवली जातात.
थोडक्यात, आपल्या आवडीनिवडीचा एक बुडबुडा हळूहळू या वेबसाइट फुगवत नेतात. आणि आपण या बुडबुड्यातच आपल्या डिजिटल क्रिया करत राहतो. हा बुडबुडा म्हणजे डिजिटल जिंदगीतील एक महत्त्वपूर्ण संकल्पना – ‘फिल्टर बबल’. आपण आधी काय शोधलं आहे, पाहिलं आहे किंवा क्लिक केलं आहे यावर आधारित माहितीतून वेबसाइट्स आणि अॅप्स फक्त आपल्या आवडींशी जुळणाऱ्या पोस्ट, बातम्या, व्हिडीओ, रील्स, सर्च रिझल्ट्स दाखवतात आणि परिणामी हळूहळू आपण गोष्टीची दुसरी बाजू किंवा आपल्या आवडीपलीकडचं सत्य बघणं कमी करतो. आणि आपण त्या बुडबुड्यात अडकतो.
अमेरिकन लेखक आणि डिजिटल अॅक्टिव्हिस्ट एली पॅरिसर यांनी २०११ मध्ये या संकल्पनेला ‘फिल्टर बबल’ हा शब्द सर्वप्रथम वापरला. याच विषयावरचं त्यांचं ‘फिल्टर बबल – व्हॉट द इंटरनेट इज हायडिंग फ्रॉम यू’ हे पुस्तकदेखील लोकप्रिय झालं. त्यांच्या मते आपली स्क्रीन हा जणू एक अनोखा आरसा आहे. यात जेव्हा आपल्या आवडीनिवडीचं प्रतिबिंब पाहण्यात आपण मुग्ध होतो, तेव्हा पलीकडे बसलेलं अल्गोरिदम आपलं सतत निरीक्षण करत असतात. एका टेड टॉकमध्ये पॅरिसर म्हणतात, ‘इंटरनेट आपल्या खऱ्या आवडीनिवडीनुसार गोष्टी दाखवत नाही तर त्याला आपण काय बघावं असं त्याला वाटतं यानुसार आपल्याला गोष्टी दाखवल्या जातात.’ ‘फिल्टर बबल’चं एक उदाहरण त्यांनी आपल्या पुस्तकात दिलं आहे. पॅरिसर यांनी आपल्या दोन मित्रांना ‘ब्रिटिश पेट्रोलियम’ हा शब्द गूगल करायला लावला. पर्यावरणविषयक जागरूक मित्राला या कंपनीद्वारे झालेली मोठी तेलगळती, त्याचे पर्यावरणीय नुकसान आणि अशा बातम्यांचे अहवाल दाखवणारे परिणाम मिळाले. तर दुसऱ्या शेअर मार्केटची आवड असणाऱ्या मित्राला या कंपनीतील गुंतवणूक, तिची आर्थिक स्थिती या विषयक परिणाम दिसले. त्याला या कंपनीद्वारे झालेल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या तेलगळती विषयी बातमीचा पुसटसा उल्लेख सुद्धा दिसला नाही. एकाच घटनेसाठी दोन पूर्णपणे वेगळं वास्तव कसं दाखवलं जातं हे त्यांनी सांगितलं.
‘फिल्टर बबल’ तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर अल्गोरिदम आणि डेटा ट्रॅकिंग वापरले जातात. एआयमुळे तर याला अधिकच बळ मिळालं आहे. जेव्हा आपण एखादं अॅप किंवा वेबसाइट वापरतो, तेव्हा आपल्या प्रत्येक कृतीवर डेटा संकलित केला जात असतो. समजा गूगलवर सर्च करून टेक्नॉलॉजीविषयक लेख वाचले जात असतील तर यूट्यूबवरदेखील असेच व्हिडीओ सुचवले जातील. एखादा ऑनलाइन लेख किंवा व्हिडीओ पाहताना आपण किती वेळ त्यात गुंतलो होतो हादेखील महत्त्वाचा घटक ठरतो. समजा एखादी राजकारणाविषयी लागलेली बातमी लगेच बंद केली गेली तर अल्गोरिदमला आपल्याला राजकारणात फार रस नाही हे कळतं. कुकिंगचे व्हिडीओ बऱ्याच वेळासाठी आणि रोज पाहिले गेले तर असेच व्हिडिओ नंतर सुचवले जातील. यात चुकूनही राजकारण आणि बातम्या दिसणार नाहीत.
डिजिटल कन्टेन्टच्या लाईक, शेअर, कमेंट अशा आपल्या क्रियेतूनदेखील आपली आवड आणि त्या विषयातील रुची कळत असते. फेसबुकवर पर्यावरण विषयक पोस्टला आपण लाइक देत असू तर फेसबुक आपल्याला अशाच पोस्ट वारंवार दाखवत राहिल. क्रिकेट किंवा इतर खेळांच्या पोस्टला लाइक न करता चटकन स्क्रोल करत असू तर हळूहळू अशा पोस्ट कमी दिसायला लागतील. इन्स्टाग्रामवर फिटनेसचे रील्स आपण मित्रांना पाठवत असू तर रील्स फीडमध्ये याच विषयाचे रील्स दिसत राहतील. आपण सोशल मीडियावर कोणाला फॉलो करतो हेदेखील महत्वाचं ठरतं. आपण फॉलो केलेले विविध विषयांचे पेजेस, राजकीय नेते, सेलिब्रेटी, ब्रॅण्ड्स, इन्फ्लुएन्सर्स, पॉडकास्टर या सगळ्यातून आपला राजकीय कल, सांस्कृतिक पार्श्वभूमी, विषयातील रुची अशा गोष्टी कळत असतात. त्यामुळे एकाच घटनेविषयी दोन व्यक्तींना त्यांच्या राजकीय कलानुसार तथ्य सांगणाऱ्या दोन वेगळ्या बातम्या दिसू शकतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्स फक्त आपल्या ऑनलाइन क्रियांचा मागोवा घेत नाहीत, तर आपले स्थान आणि आपण कोणते डिव्हाइस वापरत आहोत यावरसुद्धा लक्ष ठेवून असतात. हॉटेल्स, कॉफी शॉप, पेट्रोल पंप असं काही सर्च केलं तर हमखास आपण आता कुठे आहोत त्यानुसार जवळचे रिझल्ट्स दाखवले जातात. समजा आपण कधी एखाद्या फर्निचरच्या दुकानात जाऊन चौकशी केली, तर नंतर इतर वेबसाइटवर अचानक फर्निचरविषयक जाहिराती आपल्याला दिसू शकतात. आपण घरी आहोत, ऑफिसमध्ये आहोत की प्रवासात आहोत इथपासून ते आपण मोबाइल वापरत आहोत की डेस्कटॉपवर काही सर्च करतो आहोत, यावरूनदेखील रिझल्ट्स बदलले जातात. या रिझल्ट्सचा आपल्यावर होणारा परिणाम, अल्गोरिदम्सने व्यापलेलं आपलं आयुष्य आणि ‘फिल्टर बबल’ या संकल्पनेविषयी अधिक विस्ताराने पुढच्या लेखात जाणून घेऊया…
(क्रमश:)