दीपिका पदुकोणच्या माय चॉइस व्हिडीओवर तुमचा चॉइस काय? अशी साद व्हिवाच्या माध्यमातून वाचकांना घातली. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यापैकीच काही निवडक प्रतिक्रिया :
विचार काटेरी तरी..
आपण ज्या समाजात राहतो, तिथे आपण असे विचार परखडपणे मांडले तर इथे आपली प्रचंड निंदा होऊ शकते याची कल्पना असून दीपिकाने माय चॉइस प्रसिद्ध केला, त्याबद्दल तिचं अभिनंदन! आता या व्हिडीओतल्या विचारांबाबत. यातले काही विचार खटकतात. शारीरिक संबंधांबाबत ‘माय चॉइस’ नक्कीच! हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पुरुष काय आणि स्त्रिया काय! ओशोंच्या संकल्पाने नुसार, शारीरिक संबंध कोणाशीही ठेवले जाऊ शकतात. यामध्ये ‘भारतीय संस्कृती’ किंवा ‘आपले संस्कार, आपली परंपरा’ न आणता मला ‘स्वत:ला’ असे वाटते की, मी आणि माझ्या वयाच्या अनेक मुलींसाठी शरीर संबंध हा खूप नाजूक विषय आहे. त्याबद्दल जे ऐकले जाते, वाचले जाते त्यावरून आमच्या मनात त्याबद्दल ‘चित्र’ निर्माण होत असते. अशा वेळी जेव्हा दीपिकासारख्या प्रसिद्ध नायिकांच्या तोंडून अशा गोष्टी येतात तेव्हा अनेकींना ‘तेच योग्य आहे,’ असेही वाटू शकते. कारण आत्ता आमची ‘स्वत:ची’ अशी मते बनत असतात. शिवाय हा ज्याच्या त्याच्या मोराल्स आणि एथिक्सचाही प्रश्न आहे. हा चॉइस जरी स्त्रियांचा असला तरी त्यामुळे होणारे परिणाम नेहमीच त्यांच्याबरोबरीने परिवाराला आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांनाच भोगावे लागतात. त्यामुळे हे बोल्ड विचार मांडताना पुढच्या वेळी काळजी घेतली जावी. लग्न ठरवण्याचा चॉइस असणे, ही समज द्यायची गरज पुरुषांइतकीच स्त्रियांनाही आहे. कारण आजही स्त्रिया ‘व्रत-वैकल्ये-उपासतापास’ यातून बाहेर आलेल्या नाहीत. त्या स्वत:हून या विळख्यातून बाहेर येतील, त्या वेळीच त्यांना जाणवेल की आपला जन्म फक्त संसार करण्यासाठी झालेला नाही. माय चॉइसमध्ये जे विचार मांडले आहेत ते प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणायचे झाले तर बायकांनी आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये जे विचार परखडपणे मांडले आहेत, त्यातून स्त्री सबलीकरणाचा उद्देश नक्की दिसतो. पण नक्की काय करायला हवे या विचारांची मांडणी झाली असती आणि काही ‘काटेरी’ वाटणारे विचार जरा नाजूकपणे मांडले असते तर हा चॉइस आणखी मनाला भिडला असता.
पल्लवी शिरोडकर, सातारा.
स्वातंत्र्य आणि स्वैराचार
खरं तर माय चॉइस व्हिडीओवर एवढी चर्चा करण्याची काहीच गरज नाही. कारण या एका व्हिडीओमुळे महिलांचे प्रश्न एका फटक्यात सुटणार आहेत असं अजिबात नाही. स्त्री-स्वातंत्र्य, समानता वगैरे गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणून साध्य केल्या गेल्या पाहिजेत. स्त्रीला स्वातंत्र्य देणं आपल्या हातात आहे आणि ते कृतीतूनच बहाल करता येईल, असे व्हिडीओ बनवून नाही. हा व्हिडीओ मला पटला आणि खटकलासुद्धा. मुक्त, सशक्त, सबल नारी कोणाला आवडणार नाही? मलाही आवडेल. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात गल्लत झालेली दिसते. या गोष्टीवर मार्ग काढण्याची इच्छा असेल तर त्यासाठी कृती करणं जास्त श्रेयस्कर आहे. रादर दॅन वेस्टिंग टाइम इन धिस. प्रत्यक्ष कृतीतून स्त्रीला स्वातंत्र्य बहाल करणं, इज इटसेल्फ ‘माय चॉइस’!!
स्वानंद गाडगीळ
चॉइस नव्हे आगाऊपणा
दीपिका पदुकोणने केवळ स्त्रियांकडील सो कॉल्ड ‘चॉइस’वरच भाष्य केले. पण स्त्रीव्यतिरिक्तही समाज असतो, जो तिच्या जीवनावर खूप प्रभाव टाकत असतो. उदाहरणार्थ, हुंडा घेणे हा मुलाचा ‘चॉइस’ असू शकतो. एखाद्या मातेने मुलगी होणार म्हणून गर्भपात केला, तिचा ‘चॉइस’. एखाद्या नवऱ्याने एकाहून अधिक लग्ने केली, त्याचा ‘चॉइस’. अशा कित्येक ‘चॉइसेस्’ स्त्रीच्या भोवताली असलेल्या समाजाला प्राप्त होतील. ‘चॉइस’ची एक हद्द असते. त्या हद्दीनंतर येतो तो ‘आगाऊपणा’. दीपिकाच्या मते हा आगाऊपणा योग्य आहे, तर मग हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह हे चॉइसेस बनतील.
गीत दोंदे, जोशी बेडेकर कॉलेज, ठाणे</strong>
हे बोल्ड नाही, सत्य
माय चॉइस व्हिडीओमधली मतं मला पटली. स्त्री-पुरुष यांना समान अधिकार मिळायला हवा. स्त्रीने कोणते कपडे घालावे, घालू नये, लग्न करायचे अथवा करू नये हे सगळे तिचे प्रश्न आहेत. तुम्ही काय परिधान करता यापेक्षा तुमचं मन कसं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वाना स्वातंत्र्य दिलं आहे तरी व्हिडीओमधील शब्दांना बोल्ड म्हटलं जातं ही चुकीची गोष्ट आहे. स्त्री- पुरुष समानच असायला हवेत आणि दोघांनाही चॉइसेसचे समान अधिकार हवेत. आज नाही तर काही वर्षांनी हे मान्य करावेच लागेल.
’ सरिता बगाडे, न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर.
हे कसलं सबलीकरण?
‘आम्ही कोणाबरोबरही सेक्स करू, कसलेही कपडे घालू.. कोणताही स्वैराचार करू, कारण हे आमचं आयुष्य आहे. आम्हाला कुणी काही विचारायचं नाही’, हे कुठल्या प्रकारचं महिला सबलीकरण आहे समजत नाही. मुळात तो व्हिडीओ ही एका कंपनीची जाहिरात आहे जी फक्त दीपिका पदुकोणसारख्या उच्चभ्रू आणि ज्यांना विचारणारं कोणी नाही, अशा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. खेडय़ामध्ये खितपत पडलेल्या काबाडकष्ट करणाऱ्या ८०% महिलांशी त्यांना काही देणं-घेणं नाही. जाहिरातीकडे फक्त जाहिरात म्हणून पाहा आणि सोडून द्या.
विक्रमसिंह राठोड, टिळक महाराष्ट्र विद्यपीठ, पुणे.
आक्षेपार्ह काय?
या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. दीपिकाने एक सामान्य स्त्रीच्या आतमध्ये दडलेला आवाज, त्यांची होत असलेली घुसमट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या स्त्रियांनाही निवडीचा अधिकार डावलला जाताना दिसतो आणि त्यावरचंच हे भाष्य आहे. हा बेसिक अधिकार मागण्यासाठी असा व्हिडीओ बनवून तो अशा प्रकारे प्रदर्शित करण्याची वेळ यावी हेच लज्जाास्पद. स्त्री-पुरुष समानताविषयीचा हा संदेश पूर्णपणे योग्य वाटतो.
’ किरण रमेश पार्टे, निर्मला कॉलेज, नायगाव
मनावरचा गंज काढा
माय चॉइस व्हिडीओबद्दल वेगवेगळी मतं म्हणजे मला प्रत्येकाच्या मनावर चढलेला गंज वाटतो. आपल्या मानसिक, शारीरिक गरजा काय आहेत? याचा विचार करण्याचे सोडून सामाजिक दृष्टिकोनातून स्त्रीचा चॉइस बघण्याची गरज नाही. स्त्री-पुरुष समानतेचं म्हणाल तर कुठलाही पुरुष विचार करण्याआधीच या कृतीतून पारही पाडतो. स्वत:ला वाटेल तसं आणि मनसोक्त वावरतोही. तेच फक्त एका स्त्रीने म्हटलंय, तर किती ऊहापोह होतोय. शेवटी स्त्रीबद्दलची मानसिकता बदलायला आम्ही तयारच नाही. ’ कल्पना जगताप, मराठवाडा विद्यापीठ.
माय चॉइस.. वैचारिक स्वातंत्र्य
एखादा स्त्रीचा वाचा असलेला व्हिडीओ व्हायरल झाला, जागतिक महिला दिन आला आणि वाईटात वाईट म्हणजे सामूहिक बलात्कार झाला की मगच स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. ती खुपते—दुखते किंवा अगदी ‘बिचारी’ वाटायला लागते; पण समान स्थान असलेली कधीच होत नाही. तिला सांगावे लागते आहे माय चॉइस.. कारण आजपर्यंत तिला कधी कोणी हे विचारलंच नाहीये कदाचित..‘माझ्या आई-बाबांना नाही आवडणार, घरातल्यांना नाही चालणार, लोक नावे ठेवतील, आमच्या ह्यांना अमुक डिशच आवडते..’ ‘आम्हाला कोण विचारतंय?’.. आणि विचारलंच जर कोणी तर त्यावर घरापासून मीडियापर्यंत भाष्य करायला सगळेच मोकळे! माझ्या मते त्या व्हिडीओमध्ये फक्त वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या भूमिकेत अस्तित्वात असलेल्या एका स्त्री नावाच्या व्यक्तीच्या इच्छांना काही नावे देण्यात आली आहेत.. मग ती इच्छा सेक्स, मूल, कपडे, नाती कोणतीही असू शकते. ती व्यक्त करण्याचा अधिकार मला आहे, हे सांगण्याचा तो एक प्रयत्न आहे. आता यानंतर कमालीचे निर्थक असे माय चॉइसचे ‘मेल व्हर्जन’ सुद्धा आलेय. आशय समजून न घेतल्याचा हा परिणाम आहे.
स्नेहल देवकर – पाठक, डोंबिवली
बेधुंद- बेधडक
माय चॉइस हा या दशकातील स्त्री-पुरुष समानतेची भाषा बोलणारा सर्वात प्रगल्भ विचार आहे. प्रत्येक मुद्दय़ाला स्पर्श करीत. स्त्री मनाची तगमग स्पष्ट आणि ठोसपणे इथे व्यक्त होते. अगदी सेक्स करावा की करू नये, पुरुषासोबत की बाईसोबत यावरही ‘माझा चॉइस’असं म्हणणं निश्चितच धाडसाचं. बोल्ड. व्यक्तिस्वातंत्र्याच्या वैचारिक सहजतेने येणारा हा मुद्दा. वैचारिक समाजसुधारणा होत असताना सुरुवातीला हा विचार स्वैराचारी, अतिरेकी, संस्कृतीचा कडेलोट आहे असं वाटू शकतं. पण काळागणिक झालेल्या विधवा पुनर्विवाह किंवा केशवपनासारख्या प्रथा बंद करणाऱ्या सुधारणादेखील सहज झाल्या होत्या का? स्त्री-स्वातंत्र्य, समानता या गोष्टी कायदेदरबारी न राहता समानतेची भाषा आचरणात आली पाहिजे. माध्यमांमधून ही समानतेची भाषा चर्चेत राहिली पाहिजे. तरच स्त्री-पुरुष समानतेचं बीज खऱ्या अर्थाने रोवलं जाईल आणि हा विचारवृक्ष भारतीय समाज समृद्ध करेल.
नितीन कोरगांवकर, ठाणे
याव्यतिरिक्त हरीश जैसवाल मुंबई, तेजश्री तानाजी गायकवाड, मुंबई, कपिल भालेराव, पुणे, प्रियांका शिंदे, मुंबई, शैलेश चितेकर, अभिषेक पवार, श्वेता धामणकर, अनुराधा भोले, मुंबई, प्रतीक कुलकर्णी, लातूर, डॉ. दीपक गुप्ते, सौरभ खोब्रागडे, संदीप पेंढरकर, अजित पवार यांचीही पत्र उल्लेखनीय होती. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!