पांघरुणाच्या आत मोबाइल लपवून व्हॉट्सअ‍ॅपवरून रात्री दोन वाजता चॅटिंग करते आमची कार्टी.. घराघरातले ‘मोठे’ आमची अशी प्रशंसा करतात. आमची पिढी एवढय़ा रात्रीच्या वेळी जागून नेमकं काय करते, असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल. पण या ‘टू : ए एम’ गर्ल्स आणि बॉइजच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं त्या नीरव शांततेत?
‘हाय! ’
‘हाय!’
‘अगं हे काय? अजून जागी आहेस? अभ्यास चाललाय की काय?’
‘नाही गं बाई! अभ्यास कसला.. झोपच येत नाहीये मला. आणि तू पण जागीच आहेस की!’
‘हो!’ (नंतर बत्तीशी दाखवणारी एक स्माइली)
तेवढय़ात दोघींपकी एकीचा ‘फिलिंग इंसोम्निक’ असा स्टेट्स अपडेट. त्यानंतर vv30मग ‘पीजे’ज पासून परीक्षा पुढे ढकलल्यामुळे युनिव्हर्सिटीवर मनसोक्त तोंडसुख घेण्यापर्यंत आणि घरातल्या कुरबुरींपासून ते रात्री दोन वाजता जाणवणाऱ्या ‘त्या’ एकाकीपणाचं व्हॉट्सअ‍ॅपवरून व्यक्त होणं! टीनएजर्स किंवा त्याहून थोडी मोठी मुलं असणाऱ्या घराघरात दिसणारं हे प्रातिनिधिक चित्र. अंथरुणाच्या आत मोबाइल लपवून चॅटिंग करणारी आमची पिढी एवढय़ा रात्रीच्या वेळी नेमकं काय करते, असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल. अंगातून त्राण गेलेलं असूनही आमच्यातला अस्वस्थ अश्वत्थामा मनातल्या कन्फ्युजनचा अर्थ शोधत शोधत त्यावर संवादातून शांत करणारं इमोशनरूपी तेल त्या ‘टू : ए एम’च्या काळोखात शोधत असतो. मग तो संवाद ‘फेस टू फेस’ नसला तरी त्या संवादाचं ‘व्हच्र्युअल’पणही त्या वेळी गरजेचं वाटतंच.
आमची पिढी दोन ध्रुवांची टोकं गाठणारी! एक तर निष्काळजी, नाही तर छोटय़ा छोटय़ा प्रसंगांना सीरियसली घेऊन नराश्य येणारी! हे असंच आहे हे शंभर टक्के मान्य. पण आमच्या या दोन ध्रुवांच्या दयनीयतेचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल आमच्या पिढीने केला तर? अपेक्षांचं ओझं, अभ्यासाचा ताण, सततची स्पर्धा ही झाली नाण्याची एक बाजू.  vn09पण दुसऱ्या बाजूला जेव्हा मला समजून घेणारं माझ्याचसारखं कोणी तरी मला हवं असतं. तेव्हा माझं एकटं असणंच मला त्या ध्रुवांपाशी नेतं आणि मग त्या एकटेपणाबरोबरच दिवसेंदिवस वाढत जातो माझ्यातला निष्काळजीपणा आणि नराश्य. मग माझ्यातल्या अश्वत्थाम्याला ‘टू : ए एम’ची ती नीरव शांतता सापडते आणि मग त्या शांततेत मला स्वत:ला एकटीचा असा फक्त स्वत:चा वेळ द्यावासा वाटला किंवा माझ्यातले न सुटलेले गुंते मला माझ्याचसारख्या अनेकांशी व्हॉट्सअ‍ॅपवरून का होईना पण शेअर करून सोडवण्याचा प्रयत्न करावासा वाटला तर त्यात गर काय?
नेहा.. अशीच एक टू : ए एम गर्ल. या मुलीचं जगच वेगळं! तिला या खऱ्याखुऱ्या आयुष्यापेक्षा फिक्शनरूपी व्हच्र्युअल आयुष्यच हवंहवंस वाटतं. रात्री खूप उशिरापर्यंत चॅटिंग करताना मित्रमत्रिणी सहसा खोटं बोलत नाहीत. दिवसभरात विचार न केल्या जाणाऱ्या अनेक मुद्दय़ांवर चर्चा करतात, असं तिचं म्हणणं. त्यामुळे ही टू : ए एम गर्ल रात्रीच चॅटिंग करणं प्रीफर करते. या टू : ए एम अश्वत्थाम्याचा अजून वेगळा अ‍ॅस्पेक्ट म्हणजे त्याची आर्टिस्टिंक दुखणी. कधी कधी मनातला ‘केऑस’ शांत करण्यासाठी हे आर्टस्टि अश्वत्थामे रात्री उशिरा हातात पेन्सिल आणि समोर कागद घेऊन अगदी चित्र काढायलाही बसतात. कधी मोबाइलच्या त्या ड्राफ्ट नामक कोऱ्या जागेत काव्यपंक्तीही रचतात. निखिल.. असाच एक कवी. छान काही तरी सुचायला आणि खुपलेलं काही तरी लिहायला रात्री उशिराची वेळ तशी उत्तमच. बऱ्याचदा आतून स्फुरणारं काही तरी रात्री उशिरा त्याच्याकडून लिहिलं जातं असं त्याचं म्हणणं. रात्री उशिरा लिहिलेली कविता ड्राफ्टमध्ये सेव्ह करणारा हा टू : ए एम आर्टस्टि.
काही जणांचे टू : ए एम फंडे थोडे वेगळेच. थोडीशी अंडर कॉन्फिडन्ट कॅटेगरीतली एक टू : ए एम कन्यका. ही बया रात्री उशिरा हॉलमध्ये जाऊन चक्क सेल्फीज काढते. एखादा बरा सेल्फी आला की हिचा म्हणे कॉन्फिडन्स वाढतो (असे किडे केल्यावर तरी ही बया शांत झोपते हे महत्त्वाचं.). काही जणांना मात्र रात्रीच्या त्या शांततेत फक्त स्वत:साठी वेळ हवा असतो. स्वत:साठीचा हा वेळ स्वत:ला स्पेस देण्यापेक्षा काहीसा वेगळा असतो. त्या वेळात त्यांना स्वत:ला शांत व्हायचं असतं. त्यात काही प्रॉडक्टिव्ह करायचं नसतं, पण तरीही असाही वेळ देणं त्यांना गरजेचं वाटतं. सानिका.. या कॅटेगरीतली मुलगी. तिला रात्री उशिराच्या त्या शांततेत फक्त स्वत:ला शांत वेळ द्यायचा असतो. कधी कधी बोलून प्रॉब्लेम्स वाढतात. त्यामुळे काही वेळा न बोलताही काही प्रॉब्लेम्सचं सोल्यूशन मिळतं. दिवसभरात ८० टक्के माणसांशी आपण अगदी कृत्रिम संवाद साधत असतो. त्यामुळे कोणालाही टॉलरेट करावं लागत नाही, अशी रात्री मिळणारी शांतता अनुभवणंही गरजच झालीये असं तिचं म्हणणं.
टू : ए एमच्या अश्वत्थाम्यांच्या या एक ना अनेक तऱ्हा. तूर्तास, माझ्यातला अश्वत्थामा हे लिहून शांत झाल्यामुळे मला झोपण्याची सूचना देतोय. त्यामुळे सध्यापुरता स्वल्पविराम. टी. टी. वाय. एल. ( टॉक टू यू लेटर )
लीना दातार