सध्या आई-बाबा जनरेशनची मंडळी ‘व्हॉट्सअॅप’वर भलतीच अॅक्टिव्ह झाल्यानं तरुण मुलांची थोडी अडचणच झाली आहे. ‘लास्ट सीन हाइड’, ‘नाइट मोड’, ‘आइज प्रोटेक्टर’सारखी अॅप्स काहींच्या मदतीला आहेतच. पण व्हॉट्स अॅपवरचा वावर जरा जपूनच होतोय हल्ली.
इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये सध्या व्हॉट्सअॅप चलतीत आहे, हे वेगळं सांगायला नको. हवं त्या लोकांशी, हवं तेवढं आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होता यावं यासाठी व्हॉट्सअॅपहून उत्तम काय, असं हे अॅप आलं तेव्हा वाटलं होतं. पण आई-बाबांची जनरेशन सध्या इथे फारच अॅक्टिव्ह झालीय. त्यामुळे सदान्कदा व्हॉटस्अॅपवर पडीक असणाऱ्या जमातीची मोठी अडचण झाली आहे. कशी? ..
भारतात स्मार्टफोन्स पहिले श्रीमंतांच्या, मग तरुणाईच्या आणि आता प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या हाती येऊन पडले. त्यामुळे आई-बाबा, ताई-दादा, आक्का-मामा-काका, मावशी-मामी-वहिनी असे सहकुटुंब सहपरिवार व्हॉटस् अॅपवर रोजच सोहळे होताना दिसतात. हा बदल म्हणजे मित्र-मत्रिणींपर्यंत मर्यादित असलेल्या व्हॉटस्अॅपच्या वर्तुळाला छेद देणारी क्रांतीच ठरली. रात्र गप्पांमध्ये गाजवणाऱ्या, शाळेत काकूबाईंसारखं वावरून आज अचानक एकदम हॉट शॉर्ट्समध्ये डी. पी. ठेवणाऱ्या आणि गर्लफ्रेंडसाठी ‘लव्ह यू फॉरेव्हर’चं (सोबत दोन हार्ट्स) स्टेटस ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ही व्हॉट्सअॅप क्रांती फार मजेशीर ठरली. त्याचं झालं असं.. सगळी ‘लास्ट सीन’ची कमाल!
‘अजून ५ मिनिटं’.. आई उठवायला आल्यावर झोपेतच रोहन कुरकुरला. ‘उशिरा झोपलास का बाळा?’ आईचा नेहमीचा काळजीयुक्त प्रश्न. पण त्यावर उत्तर आलं बाबांकडून.. ‘नाही गं, तसा लवकरच झोपला हा!’.. काहीसं गोंधळून झोपेतच रोहननं मागून उत्तर दिलं, ‘हो, ११ वाजताच झोपलो’. त्यावर आईचा लगोलग प्रश्न आलाच, ‘हो का.. मग बाबांनी काढलेल्या फोटोनुसार तू रात्री १.४७ ला काय करत होतास?’ त्यानंतर दोन मिनिटांची नि:शब्दता. रोहनची झोप चांगलीच उडवून गेली, यात शंकाच नाही. लास्ट सीनचा स्क्रीन शॉट घेतला वाटतं बाबांनी. बिछान्यातून थेट आंघोळीला पळण्याचा मार्ग रोहनला तात्पुरत्या वेळेकरिता का होईना सापडला. यापुढे लास्ट सीन हाइड करण्यात तथ्य नव्हतं. उघडउघडच आपण मत्रिणींशी रात्री गप्पा टाकत पडलेलो असतो हे समस्त परिवाराला बाबांनी काढलेल्या स्क्रीन शॉट्सच्या कृपेने समजलेलं. त्यामुळे गर्लफ्रेंडशी बोलावं कसं हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे होता. तिने सुचवल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर प्ले स्टोरमध्ये सापडलं. वुई चॅट, टेलीग्राम, लाइन, हाइक असं सगळंच त्याने डाउनलोिडगला लावलं आणि अशा प्रकारे ११-११.३० नंतर गर्लफ्रेंडशी बोलण्याची सोय झाली. तिथेही काही भाऊबंद भेटतातच, पण तेही समदु:खी असल्यामुळे तशी अडचण येत नाही. थोडक्यात, सगळीच सेटिंग लावली जाते बॉस!
त्या मानाने रोहनची स्थिती बरीच बरी म्हणावी. त्याला रात्री बोलणं कठीण नव्हतं. त्याच्यासाठी कठीण ते फक्त बोलल्यानंतर पकडलं जाणं! ऊर्वशीची मात्र बोलण्यापासूनच सुरवात. कारण- एकमात्र दगाबाज मोबाइलची स्क्रीन आणि तिचा अतिप्रचंड ब्राइटनेस! चादरीत लपूनही टॉर्च मारल्यासारखा प्रकाश येतो. त्यामुळे सर्वाचीच झोपमोड! दर १५ मिनिटांनी आई या कुशीवरून त्या कुशीवर.. रोहनप्रमाणे ऊर्वशीनेही प्ले स्टोर गाठलं आणि आइज प्रोटेक्टर, नाइट मोड यांसारखे अॅप्स डाउनलोड करून रात्री सुखाने चॅटिंग करू लागली. असाच आणखी एक रोमिओ मित्र. मागच्या व्हॅलेंटाइन डेला ‘डीपी’ (पक्षी व्हॉट्सअॅपवरचा डिस्प्ले पिक) बदलून गर्लफ्रेंडचा फोटो ठेवला. वर आयुष्यात ती आल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारं स्टेटस अपडेट करून मोकळा झाला. कॉलेजवरून घरी परतताना बसमध्ये व्हॉट्सअॅपची िवडो उघडताच आईचा पहिला मेसेज झळकला. ‘बऱ्याच लवकर सून शोधलीस माझ्यासाठी. घरी येताना एकटा की सोबत असणारे कोणी?’ पोटात खड्डाच पडला. याचा अर्थ काय समजावा? होकार की नकार? या गोंधळात तो घरी परतला.
तेव्हापासून त्याचे स्टेटस मात्र अॅव्हेलेबल ते बिझीपर्यंतच्या फरकानेच बदलले. तर ‘डी.पी.’मध्ये सहसा बॉलीवूडचे खान वा क्वचित केवळ स्वत:चे फोटो झळकले. घरून परवानगी असली तरी जरा अवघडतोच हे मात्र खरं!
डीपी, स्टेटस आणि लास्ट सीनबद्दलची प्रत्येक भानगड ही आपल्याच कर्माची फळं. पण काही पालक तर त्याच्याही पलीकडे जातात. रियाच्या घरी तिचे दोन जुने मित्र सहज आलेले. बऱ्याच महिन्यांनी भेटल्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या. संध्याकाळची वेळ. आईनेसुद्धा थोडय़ा गप्पा मारल्या. थोडय़ा वेळाने आई आत गेली आणि आणि रियाच्या मोबाइलवर एक मेसेज उजाडला. ‘आई : थोडय़ा वेळाने दोन कांदे चिरून देशील का गं? खिचडी करायची आहे.’ कपाळाला हात. नको त्या वेळी ऑनलाइन असल्याचा परिणाम.
एकंदर पालकांनी व्हॉट्सअॅपवर येणं ही मुलांसाठी क्रांतीच ठरली तर! मित्र-मत्रिणींच्या या स्टेटस-डी.पी.मधला या वर्षभरात झालेला बदल प्रकर्षांने जाणवला. पालक व्हॉट्सअॅपवर आल्यापासून व्हॉट्सअॅपच्या वापराला जरा शिस्त लागलीये, असा शेराही ऐकिवात आला. कारण ट्रायलरूमच्या आरशात वन-पीसवर काढलेले कित्येकींचे सेल्फी जरा कमी झाले. फॅमिली ग्रुपवर आलेल्या अॅडल्ट जोकवर तितकीच जपून कमेंट देणं वाढलं. तर जिथे मोकळेपणाने बोलता येईल असे वेगळे ग्रुपसुद्धा तयार झाले. ज्याने त्याने आपापले मार्ग शोधलेच! तेव्हा व्हॉट्सअॅपकरांनो, आता केवळ मित्र-मत्रिणींसोबतच नाही तर सहपरिवार या व्हॉट्सअॅपची मजा लुटा.
गार्गी गीध
व्हॉट्स अप डॅड?
सध्या आई-बाबा जनरेशनची मंडळी 'व्हॉट्सअॅप'वर भलतीच अॅक्टिव्ह झाल्यानं तरुण मुलांची थोडी अडचणच झाली आहे. 'लास्ट सीन हाइड', 'नाइट मोड', 'आइज प्रोटेक्टर'सारखी अॅप्स काहींच्या मदतीला आहेतच. पण व्हॉट्स अॅपवरचा वावर जरा जपूनच होतोय हल्ली.इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये सध्या व्हॉट्सअॅप चलतीत आहे, हे …
First published on: 09-01-2015 at 01:45 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a parent uses whatsapp