वन्यजीव संशोधक म्हणून काम करताना अनेक जीव आणि त्यांच्या प्रजाती अभ्यासकांना आकर्षित करतात. त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा मनात जागते आणि झपाटून जाऊन मग संशोधक एखाद्या वन्यजीवाच्या संशोधनात आकंठ बुडून जातो. पुरातत्व शास्त्राचा अभ्यासक आणि वन्यजीव संशोधक असलेला ऋषिकेश त्रिपाठी हा तरुण चक्क कोळ्यांच्या प्रेमात पडला. कधीही हार न मानता जाळं विणत राहणारे, जिद्दीचं प्रतीक मानले जाणारे कोळी हा त्याच्या अभ्यासाचा विषय कधी बनला हे त्याचं त्यालाही कळलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणापासूनच ऋषिकेशला निसर्गाचं आकर्षण होतं. जंगलातील पक्ष्यांचे आवाज ऐकत, वेगळं काही अनुभवता आलं तर त्याच्या नोंदी करण्याची त्याची सवय. याच सवयीतून त्याचं निसर्गाशी एक वेगळंच नातं निर्माण झालं. निसर्गात रमणारा ऋषिकेश त्रिपाठी आता पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि वन्यजीव संशोधक म्हणून कार्यरत आहे, मात्र गेली काही वर्ष तो कोळी संशोधनात रमला आहे. एवढंच नव्हे तर त्याने कोळ्यांच्या नवीन प्रजातीचा शोधही लावला आहे.

ऋषिकेश त्रिपाठी हा मूळचा मुंबईचा. निसर्गाची आवड त्याला होतीच, शिवाय वन्यजीवांविषयीही त्याला विशेष कुतूहल होतं. म्हणून ऋषिकेशने ‘झुऑलॉजी’ या विषयातून शिक्षण घ्यायचं ठरवलं. शालेय जीवनात अभ्यासात फार काही मन लागलं नाही, असं तो सांगतो. मात्र, निसर्गाची आवड असल्यामुळे करिअर करायचं तर निसर्ग आणि पर्यावरणाशीच निगडित करायचं असं त्यानं ठरवलं होतं. ‘झुऑलॉजी’ आणि ‘एम.एस्सी. इन बायोडायव्हर्सिटी’ या दोन्हीचं शिक्षण घेत असताना आपल्याला उत्तम मार्गदर्शक लाभले आणि म्हणूनच वन्यजीव संशोधनाची गोडी निर्माण होत गेली, असं ऋषिकेशने सांगितलं. ‘महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना अनेक रात्री माथेरानच्या जंगलात काढल्या. जंगलात रात्रभर फिरायचं आणि विविध सापांच्या प्रजाती शोधायच्या, त्यांचा अभ्यास करायचा हे सत्र सुरू झालं होतं. वन्यजीवांशी जसजसं प्रत्यक्ष संपर्कात येत गेलो तसतसं माझं आकर्षण अधिक वाढत गेलं’ असं तो म्हणतो.

वन्यजीवांवरच्या संशोधनाची गाडी कोळी संशोधनापर्यंत कशी पोहोचली, याबद्दल माहिती देताना एम.एस्सी’चं शिक्षण सुरू असताना एका प्रबंधासाठी म्हणून कोळ्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, असं सांगणाऱ्या ऋषिकेशने कोळी संशोधनावरच काम करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला. गेली आठ वर्षं तो वन्यजीव संशोधन क्षेत्रात काम करतो आहे. ‘मी इंजिनीअर, मेडिकल यांसारख्या क्षेत्रांची निवड केली नाही याचा मला अभिमान आहे, त्याऐवजी असं क्षेत्र निवडलं जिथे मला दररोज जंगलांमध्ये आणि वन्यजीवांच्या ठिकाणी जाऊन काम करता येतं, जिथे अन्य लोक फक्त सुट्टीच्या दिवशी भेट देतात’ असं तो म्हणतो तेव्हा त्याची या क्षेत्रातली रुची किती खोल आहे हे जाणवतं.

कोळी संशोधनाची सुरुवात ही थर वाळवंट येथून झाली आहे. गेल्या काही वर्षांत ऋषिकेशने या प्रदेशांत सर्वेक्षण केलं आणि वाळवंटात सापडणाऱ्या कोळ्याचं वर्तन, वितरण आणि अनुकूलन यांचं दस्तऐवजीकरण केलं आहे. आत्तापर्यंत ऋषिकेशने ३० नवीन प्रजातींचं वर्णन केलं आहे. त्याचा हा अभ्यास भारतातील अष्दपाद प्राण्यांच्या विविधतेविषयी जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरलं आहे. ऋषिकेशने केलेल्या संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणजे ग्राउंड स्पायडर वंशाच्या ‘ट्रायकोथायस’चा केलेला वर्गीकरणात्मक अभ्यास आणि भारतातील ‘स्टेनेलुरिलस’ या उडी मारणाऱ्या कोळी प्रजातीबद्दल केलेलं संशोधन.

काही महिन्यांपूर्वीच ऋषिकेशने जंपिंग स्पायडरच्या प्रजातीतील ‘ओकिनाविशीयस टेकडी’ या नवीन कोळ्याचा पुणे शहरात बाणेर टेकडीवर पहिल्यांदा शोध लावला. संपूर्ण जगभरात हा नवीन शोध आहे. टेकडी या नावाचं वैशिष्ट्य असं की हा कोळी बाणेर टेकडीवरील वडाच्या झाडावर आढळला. या नावामुळे पुण्यातील शहरी जंगलांचं, बागांचं आणि टेकड्यांचं महत्त्व लक्षात येतं, असं ऋषिकेश म्हणतो. ‘ओकिनाविशीयस टेकडी’ या कोळ्याची पूर्ण माहिती व त्याचं वर्गीकरण अर्कनॉलॉजी जर्नल ब्रिटिश अर्कनॉलॉजीकल सोसायटी या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. त्याची माहिती आता जगात प्रत्येक संशोधक, निसर्गवादी आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचली आहे. ऋषिकेशच्या या समग्र संशोधनाची दखल घेत त्याला अनेक फेलोशिपही देण्यात आल्या आहेत. यामध्ये कोळ्यांच्या नवीन प्रजातींची नावं देण्यासाठी ‘बायोपॅट फेलोशीप’ (जर्मनी), ‘अमेरिकन आर्कोनोलॉजिकल सोसायटी फेलोशीप’, ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिया’ तसंच ‘वैज्ञानिक आणि औद्याोगिक संशोधन परिषद – ज्युनियर रिसर्च फेलोशीप’चाही तो मानकरी ठरला आहे.

‘माझा अभ्यास पुढे नेण्यात या फेलोशीपनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे मला नवीन प्रजातींचे दस्तऐवजीकरण आणि वर्णन करण्यासाठी मान्यताही मिळाली आणि कोळ्यांच्या विविध प्रजातींचं उत्क्रांतीवादी, पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबद्दलची समज, अभ्यास यातही मौलिक भर घालता आली’ असं त्याने सांगितलं. कोळी संशोधनाविषयी ऋषिकेश शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लेक्चर स्वरूपात विविध माहिती देतो. विद्यार्थ्यांना कोळ्यांच्या आकर्षक जगाची ओळख करून देतो आणि या क्षेत्रातील त्याच्या अनुभवांवर चर्चादेखील करतो. या सत्रांद्वारे, मी भविष्यातील जीवशास्त्रज्ञांना प्रेरणा देण्याचा आणि निसर्ग, संवर्धन आणि वैज्ञानिक शोधांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं ऋषिकेशने सांगितलं. अधिवास पुनर्संचयित करणे, क्षेत्रीय अभ्यास आणि वर्गीकरणाद्वारे, आपण मानवी विकास आणि पर्यावरणीय संतुलनामधील अंतर भरून काढू शकतो, निसर्ग आणि लोक एकत्र राहतील असं भविष्य निर्माण करू शकतो, असं त्याने सांगितलं. ‘प्रत्येक कोळ्याचं जाळं उत्क्रांती, अनुकूलन आणि जगण्याची कहाणी सांगतं. या कथा उलगडल्यामुळे आपल्याला केवळ जीवनाची जटिलता लक्षात येते असं नाही तर आपल्या परिसंस्थेतील सर्व प्रजातींना जोडणारे नाजूक धागेदेखील ओळखता येतात’ असं सांगणारा ऋषिकेश हा खऱ्या अर्थाने स्पायडर मॅन ठरला आहे.

viva@expressindia.com