ऋषिकेश वाघ हा मुळचा जुन्नरचा. जुन्नर तालुक्यातील त्याच्या खोडद या गावात अनेकदा त्याने बिबट्या शेतात शिरल्याच्या घटना पाहिल्या होत्या. मानव-बिबट्या संघर्ष व सहजीवन, बिबट्याने केलेल्या शिकारी या गोष्टी त्याने जवळून अनुभवल्या होत्या. तेव्हापासून ऋषिकेशच्या मनात बिबट्याविषयी आकर्षण निर्माण झाले होते. एकंदर वन्यजीवांबद्दलच त्याला एक प्रकारचे आकर्षण आणि प्रेम वाटत होते. याच आकर्षणातून ऋषिकेशने ‘झुओलॉजी’ या विषयातून शिक्षण घ्यायचे ठरवले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्याने झुओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ऋषिकेशने महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच अनेक वन्यजीव संशोधन आणि संवर्धन प्रकल्पांमध्ये सक्रियपणे भाग घ्यायला सुरुवात केली होती. यामध्ये मध्य भारतातील प्राण्यांच्या आनुवांशिक जोडणीचा अभ्यास, मेळघाटमधील अखिल भारतीय व्याघ्र गणना प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा गणना प्रकल्प आणि राजस्थानमधील झलाना बिबट्या अभयारण्यात आहाराच्या नमुन्यांचा अभ्यास घेणे अशा प्रकल्पांचा समावेश होता.
पदव्युत्तर पदवी घेत असताना ऋषिकेशच्या संशोधन पर्वास सुरुवात झाली. बिबट्यांच्या आहाराच्या नमुन्यावर ऋषिकेश संशोधन करत होता. या संशोधन प्रकल्पासाठी त्याला ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’कडून (जैवतंत्रज्ञान विभाग) मान्यता मिळाली होती. या प्रकल्पांतर्गत त्याने नाशिकमधील निफाड तालुक्यातील कृषी क्षेत्रात वावरणाऱ्या बिबट्यांवर संशोधन केले. या संशोधनामुळे बिबट उसाच्या शेतात त्यांचे अस्तित्व कसे टिकवून आहेत, त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, तसेच बिबट माणसांबरोबर शांततापूर्ण सहजीवन कसे प्रस्थापित करतात आदी विविध बाबींविषयी सविस्तर अभ्यास मांडता आला. ज्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याबाबत नवीन गोष्टी समजण्यास मदत झालीच, शिवाय पुन्हा एकदा नव्याने बिबट समजून घेता आला, असे ऋषिकेश सांगतो. या संशोधनासाठी ऋषिकेशला ‘वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल’ दरम्यान वन्यजीव सादरीकरण परिषदेत पुरस्कारदेखील मिळाला आहे.
हेही वाचा : डिजिटल जिंदगी : तुम बिन जिया जाए कैसे..?
याचबरोबर ऋषिकेशला महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटातील संवर्धन उपक्रमात योगदान देण्याचा विशेषाधिकार मिळाला. या प्रकल्पात रायरेश्वर किल्ला आणि महाबळेश्वर पर्वतरांगांमधील वनक्षेत्राचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले, जे एक महत्त्वाचे वन्यजीव क्षेत्र आहे. या परिसराला तेथील जंगल वैविध्याबरोबरच पर्यावरणीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. दोन वर्षांहून अधिक काळ या परिसरात ऋषिकेशने श्रीकर अष्टपुत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले आणि या क्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगही केले होते. जानेवारी २०२० मध्ये या क्षेत्राला ‘जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा आमचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले, असे ऋषिकेश सांगतो. एक फील्ड बायोलॉजिस्ट म्हणून त्याने या प्रकल्पासाठी विविध उपक्रम राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी अधिवास संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे माझ्या लक्षात आले आणि त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत, यावरही माझा विश्वास दृढ झाला असे त्याने सांगितले.
हेही वाचा : कॉफी आणि बरंच काही…
सध्या ऋषिकेश मुंबईतील ‘पॉलिसी अॅडव्होकेसी रिसर्च सेंटर’ (पीएआरसी) येथे वन्यजीव संशोधनात विशेष तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. वन्यजीव संवर्धन म्हणजे केवळ वैयक्तिक प्रजातींचे संरक्षण करणे नव्हे, तर ते ज्या अधिवासांवर अवलंबून असतात त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करणे हेदेखील असले पाहिजे. अधिवास पुनर्संचयित करण्यासारखे उपक्रम हाती घेऊन आपण मानवी विकास आणि पर्यावरणीय संतुलन यातील अंतर भरून काढू शकतो, सहअस्तित्व / पर्यावरणाबरोबर सहजीवन वाढवू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपला नैसर्गिक वारसा जपू शकतो, असे तो आत्मविश्वासाने सांगतो. ऋषिकेशसारख्या तरुण वन्यजीव संशोधकांचा अभ्यास आणि त्यांच्याकडून या कार्याच्या अनुषंगाने केले जाणारे ठोस प्रयत्न पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच लोकांमध्ये या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरत आहेत.
viva@expressindia.com