आत्याकडं सहज म्हणून एक चक्कर टाकली, तर आत्याबाई टीव्हीपुढं ठाण मांडून बसल्या होत्या. श्रीदाची वाट पाहात बसलो होतो. म्हटलं, बघू तरी ही काय बघत्येय. स्क्रिनवर गाणं लागलं होतं.. ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?’ म्हटलं आयला, तेव्हा पण हे असं होतं. बहुधा आत्यानं माझ्या मनातली भावना ओळखली असावी. माझी कीव करत ती घनगंभीर आवाजात म्हणाली, ‘हे वत्सा, प्रेम ही सार्वकालिक भावना आहे. ते अमर असतं..’ एवढी आकाशवाणी करून ती पुन्हा टीव्ही पाहण्यात गुंगली.
काही वेळ असाच गेल्यावर पेपरच्या छापील भाषेत मेघगर्जनेसह गडगडाटी पाऊस सुरू झाला. तिकडं आत्याबाईंचा पिक्चर पॉझिटिव्ह नोटवर संपला नि त्या चहा करायला उठल्या. पाऊस पाहून काळजीवाहू मंत्र्याच्या भूमिकेतही शिरल्या. इकडं मला भसाभस ‘हॅप्पी मान्सून’चे मेसेज येऊ लागले. एकेकाला सवयीनं रिप्लाय करत होतो. तोच एका मेसेजवर हात थबकलाच.‘ती’.. ‘तिचा’ मेसेज होता.. छातीत धडधड का काय म्हणतात ते होऊ लागलं.. ‘तिने’ लिहिलं होतं, ‘पावसात भिजताना..’ या दोन अक्षरांनी माझी दांडीच गुल केली. अरे, हे तर इनडायरेक्टली भेटू या का? असं विचारणं झालं.. हा काय प्रश्न होता का? म्हणजे काय? प्रश्नच नाही. म्हणजे प्रश्न आहे.. पण.. नाही पण.. शप्पथऽऽऽ आपण गडबडलो बुवा, असं मान्य करत मी तिला रिप्लाय केला. काय तो नाही बॉऽऽऽ सांगणार. असं म्हणता म्हणता मी पावसाकडं बघत पुढचे प्लॅन्स आखू लागलो.
तर ‘आम्ही भेटायचंय’.. येस्स्! ‘आम्ही भेटायचंय’.. इतके दिवस ग्रुपसोबत भेटत होतो, आता आम्हीच भेटायचंय. म्हणजे आता सनी, मन्या, सोन्याला मेसेजस टाकून चालणार नव्हतं. ‘सोशल साईट’वरचा स्टेटस् थोड्डासा जरी बदलला असता तरी सगळ्यांनी संशयाचा धूर काढला असता. ‘व्हॉटस् अप’ की तो बात ही छोडो. सब लोग परेशान करते.. अरे भाई, ‘कितीना मुश्किल हैं इस दिल को समझाना.. के धीरे धीरे ये दिल बेकरार होता है..’ वाऽऽऽवा हेडफोनवर ऐकलेली गाणी अशी कामी येतात वाटतं. तर गाण्याचा सूर सोडून आता मान्सूनच्या भेटीचा सॉरी मान्सूनमधल्या आमच्या भेटीचा बेत आखावा.
कुठं भेटायचं बरं? मान्सून राइडच्या वेळी बाइक हाताशी असलेली बरी. ती पेट्रोल भरून मेंटेन करून ठेवतो. त्यासाठी पक्याभाईला मस्का मारायला हवा. खिसा तपासला तर तो ठीकठाक आहे. रिझल्टचं बक्षीस, बर्थ डे गिफ्ट प्लस पॉकेटमनी अशा नोटांनी वजन वाढलेलं आहे. कुठं जावं? मुंबईतच की थोडं मुंबईबाहेर? मुंबईतल्या सगळ्या चौपाटय़ा सध्या हाऊसफुल्ल असतात. कपल्स नि फॅमिलीजनी भरलेल्या. फेसाळणाऱ्या लाटांसोबत खेळत पावसात भिजण्याची मज्जा काही औरच. आणि सोबत ती असेल तर आणखी चार चाँद लागतात. मग एक कणीस वाफाळलेलं.. िलबू-तिखट भुरभुरलेलं नि वर कटिंग दोघांत मिळून एक.. स्स्स्ऽऽऽ हाताला चटका लागला नि मी भानावर आलो. आत्यानं चहा नि गरम भजी पुढय़ात आणून ठेवली होती. त्यावर ताव मारता मारता मी पुन्हा खयालों में गेलो..
तो यश म्हणत होता की, तो गेट वे ऑफ इंडियाला गेला होता. ती जागा आहे छान. पण तिथं जाऊन करायचं काय? पावसामुळं बोटिंग बंदच असेल. समोर ‘ताज’ आहे, पण सध्या ते खिशाला टुकटुक माकड करणार. नकोच. मग.. नॅशनल पार्क.. हां तिथं मनसोक्त भेटता येईल. कुणी ओळखीचं भेटणार नाही. आयला, पण सिंहाच्या गर्जनेनं ती घाबरली नि रडतबिडत बसली म्हणजे.. लोकांचा काहीतरी गरसमज होईल नि नस्ता झोल होईल.. नो. नो. नकोच. मग खंडाळा-लोणावळा.. ‘घाटातली वाट, काय तिचा थाट’ असं मी बाइक चालवताना म्हणेन नि ‘ती’ मात्र मला वळणांच्या भीतीनं अगदी गच्च धरून बसेल.. भोवताली सगळं कसं हिरवंगार असेल.. ‘मन तळ्यात, मन मन मळ्यात, मन ‘जाई’च्या फुलात..’ असं होऊन जाईल. संदीप तू खरंच ग्रेट. कसं ओळखतोस आमच्या मनातलं.. समजा तिथं पोहोचल्यावर कुणी टपोरी भाई लोक भेटले तर तर काय मी मागं नाही हटणार. सोडणार नाही त्यांना. की तिकडं अलिबाग-नागावला जावं. म्हटलं तर खेडं, म्हटलं तर मुंबईजवळ.. काय राव, काही ठरतच नाहीये.
‘ती’.. कधी भेटतोय ‘तिला’ असं झालंय.. भेट.. अरे हो, तिला काहीतरी भेट द्यावी. नाही का? चॉकलेटस्, टेडी बेअर हे नेहमीचच झालं. हां, तिला परफ्युम आवडतो. ‘जाई’चाच. ‘तिच्या’चसारखा.. सुंदर.. तोच देऊ या. काय म्हणेल ‘ती’ त्यावर.. ‘अरे, तू कधी आलास लेका ?’ छे? असं कसं म्हणेल ‘ती’.. असा विचार मनात येतो न येतो तोच पाठीत दाणकन बुक्का बसला. भानावर येऊन बघतो तर श्रीदा आला होता चिंब भिजून. आत्या त्याला लटकंच रागावत होती. पंचानं खसाखसा त्याचे केस पुसत म्हणत होती, ‘आता मी थकले हो तुझं करून. आता आण एक हक्काचं माणूस.’ त्यावर तो गालातल्या गालात हसत होता. दाल में कुछ काला हैं.. या पुरी दाल काली हैं.. श्रीदानं एफएम सुरू केलं.. गाणं लागलं होतं, ‘आती क्या खंडाला..’ मी गरगरलोच. माझ्या मनातलं लोकांना वाचता येतंय का काय? तेवढय़ात मेसेजटोन वाजला. तिनं नुसताच स्माइली पाठवला होता. इथं आपण खल्लास.. अरे, पण कधी भेटायचं, कुठं भेटायचं.. हा प्रश्नोत्तरांचा तास अजून बाकीच होता. फुल टू स्मार्ट होऊन आता मलाच हे विचारायला लागणार होतं, ‘जाई, संगतीनं, माझ्या तू येशील काय?’
‘४ल्ल३ी.१ंँ्रि‘ं@ॠें्र’.ूे
..संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आत्याकडं सहज म्हणून एक चक्कर टाकली, तर आत्याबाई टीव्हीपुढं ठाण मांडून बसल्या होत्या. श्रीदाची वाट पाहात बसलो होतो. म्हटलं, बघू तरी ही काय बघत्येय. स्क्रिनवर गाणं लागलं होतं.. ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?’ म्हटलं आयला, तेव्हा पण हे असं होतं. बहुधा आत्यानं माझ्या मनातली भावना ओळखली असावी. माझी कीव करत ती घनगंभीर आवाजात म्हणाली, ‘हे वत्सा, प्रेम ही सार्वकालिक भावना आहे. ते अमर असतं..’ एवढी आकाशवाणी करून ती पुन्हा टीव्ही पाहण्यात गुंगली.
Written by badmin2

First published on: 28-06-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will you come along with me