वेदवती चिपळूणकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरवर्षी ८ मार्च या दिवशी जगभरात वुमन्स डे साजरा केला जातो. १९०८ या वर्षी पंधरा हजार महिला कामाचे समान तास, समान वेतन आणि मतदानाच्या अधिकारासाठी याच तारखेला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या होत्या. दोन वर्षांनी या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा दर्जा मिळाला. १९७५मध्ये संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्सनी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. ज्या देशांमध्ये स्त्रियांना समान हक्कांसाठी लढा द्यावा लागला त्या सगळय़ा देशांमधल्या स्त्रिया यात उत्साहाने सहभागी व्हायला लागल्या. स्त्रियांचे हक्क ते स्त्रियांच्या कर्तृत्वावर अवलंबून असणारं भविष्य, व्हाया महिला सक्षमीकरण असा हा प्रवास झालेला आहे. या सगळय़ात आपण स्वत:ला नेमकं कुठे पाहतो हा चर्चेचा मुद्दा आहे.
वुमन्स डेच्या निमित्ताने अनेक मॉल्समध्ये, वेगवेगळय़ा ब्रॅण्ड्सकडून, अनेक प्रॉडक्ट्सवर, ऑनलाइन शॉपिंगमध्येसुद्धा डिस्काउंट्स दिले जातात. पण आपला वुमन्स डे तेवढय़ापुरताच मर्यादित आहे का? भारताच्या इतिहासानुसार भारतातल्या महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी भांडावं लागलं नाही. मग आपल्या देशातल्या मुलींसाठी, स्त्रियांसाठी महिला दिनाचं महत्त्व नक्की काय असायला हवं? आपल्या पिढीच्या मुलींच्या मनात महिला दिनानिमित्त नेमकी काय भावना असायला हवी? जगभरात वेगवेगळय़ा उपक्रमांनी साजऱ्या होणाऱ्या या दिनाचं स्थान ‘मुली’ या वयोगटाच्या लेखी नेमकं काय आहे?
या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली थीम आहे ‘जेंडर इक्वॅलिटी टुडे, फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ आणि इंटरनॅशनल वुमन्स डेने दिलेली थीम आहे ‘# BreakTheBias. अर्थात दोन्ही थीम्सचा मथितार्थ एकच होतो. तर या वेळी महिला दिनाच्या निमित्ताने समानतेबद्दल बोलणं, चर्चा करणं, संकल्पना मांडणं अपेक्षित आहे. सामान्यत: या सगळय़ात सहभाग असतो तो महिलांचा.. मग तरुण मुलींनी स्वत:ला यामध्ये नेमकं कुठे पाहावं? हक्कांसाठी लढलेल्या, काही कर्तृत्व दाखवलेल्या, आदर्श मानल्या जाणाऱ्या महिला या साधारणपणे तरुणाईच्या वरच्या वयोगटातल्या असतात. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सामान्य मुलीवर या जागतिक महिला दिनाचा किती परिणाम होतो? तिला खरंच काही प्रेरणा मिळते, बळ मिळतं की केवळ त्या दिवशी अनेक मुलांकडून ‘हॅपी वुमन्स डे’ अशा शुभेच्छा स्वीकारणं एवढीच तिची अचिव्हमेन्ट असते? कॉलेजला एक दिवस गुलाबी रंगात सजवलं जातं, अनेक चर्चा घेतल्या जातात, वेगवेगळे उपक्रम केले जातात, काही वेळा महिला प्रोफेसर्सचा वेगळा सन्मान केला जातो. पण त्यात केवळ प्रेक्षक म्हणून सहभागी असलेल्या प्रत्येक सामान्य मुलीच्या मानसिकतेवर या सगळय़ाचा कितपत सकारात्मक परिणाम होतो? इतरांनी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची अपेक्षा करण्याऐवजी ती स्वत: स्वत:ला ‘एम्पॉवर्ड’ किंवा ‘सक्षम’ समजते का, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो विचारण्याची गरज सर्वाधिक आहे.
या एका दिवसाच्या सोहळय़ाने स्त्रियांच्या प्रश्नांकडे तात्पुरतं लक्ष वेधलं जातं, त्यांच्या कर्तृत्वाला एक दिवस मान दिला जातो आणि एक दिवस त्यांना गौरवलं जातं. या वर्षीच्या थीमनुसार बायस मोडून काढायचे आहेत, म्हणजेच समानतेच्या दृष्टीने विचार करायचा आहे. मग हे सगळे समारंभ एक दिवस करून एका दिवसात समानता प्रस्थापित होणार आहे अशी आपली अपेक्षा आहे का? आपण वर्षांनुर्वष वुमन्स डे साजरा करतोय, तरीही स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबल्या आहेत का? महिला दिनाच्या दिवशी कोणत्याच महिलेला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागत नाही का? वर्षांतून एकदा महिला दिन साजरा करतोय याचा सन्मान ठेवून कोणतीच सासू आपल्या सुनेकडे हुंडा मागत नाही का? आपण सर्वच महिला आहोत याचा विचार करून कोणतीच महिला दुसऱ्या महिलेचं नुकसान करत नाही का? सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सगळय़ा स्त्रियांना एकमेकींकडून पूर्ण सन्मानाने वर्षभर वागवलं जातं का? जर या सगळय़ाची उत्तरं सकारात्मक आणि आशादायी नसतील, तर आपल्या एका दिवसाच्या महिला दिन साजरा करण्याला काहीच अर्थ उरत नाही.
हे सगळे केवळ प्रश्न नाहीत, तर महिला दिनानिमित्तचे विचार आहेत, आदर्श आहेत, उद्दिष्टं आहेत. सर्वसमावेशक ध्येय डोळय़ासमोर ठेवून त्यासाठी कायमस्वरूपी आणि सातत्याने वाटचाल व्हावी, हा यामागचा हेतू आहे. स्त्रियाच स्त्रियांच्या प्रगतीतला अडसर बनू नयेत यासाठी प्रत्येक महिलेने, मुलीने हे प्रश्न स्वत:ला विचारणं आवश्यक आहे.
viva@expressindia.com