|| मितेश जोशी
पर्यावरणाविषयी तरुणाई किती सजग आहे याची प्रचीती सध्या अवतीभोवती वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण संवर्धनासाठी झोकून दिलेल्या अनेक तरुण मुलामुलींच्या कार्याच्या निमित्ताने येते आहे. दरवर्षी ५ जूनला पर्यावरण दिन साजरा केला जातो, मात्र अशा कुठल्याही एका दिवसाचा विचार न करता खरोखरच तन-मन-धनाने पर्यावरणासाठी घाम गाळणाऱ्या या तरुणाईचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे..
मे महिन्यात कॉलेजला सुट्टय़ा लागल्या, की तरुणाईला इंटर्नशिपचे किंवा भटकंतीचे विचार मनात येऊ लागतात. पण अशीही काही मुलं असतात ज्यांना वेगळंच जग खुणावत असतं. कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांला असणाऱ्या कर्जतच्या उत्कर्ष जोशी या तरुणाला ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमाने वेड लावले होते. आपणही पुढच्या वर्षी श्रमदानाला जायचं असं ठरवत या वर्षी तो अंबेजोगाई येथे एका चमूसोबत दाखल झाला. दुष्काळ काय असतो, हे इथे आल्यावर मी अनुभवलं, असं उत्कर्ष सांगतो. सर्वात पहिल्या दिवशी अंबेजोगाईमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या तहानेने व्याकूळ झालेला मी, पाण्याचा थेंब पोटात जाण्याची इच्छा झाली, पण उतरतो आणि पाहतो तर काय पिण्याच्या पाण्याचे कॅन्स भरून नेणारे ट्रक.. पहिल्या दिवशी मी भातशिरपुरा गावात श्रमदान केलं. सामान्य व्यक्तीच्या मतानुसार श्रमदान करणं म्हणजे आपले श्रम कोणाच्या तरी उपयोगी आणणं; पण खरं तर प्रत्यक्षात श्रमदान केल्यावर कळलं की इथल्या लोकांना त्याची किती गरज आहे. नंतर आनंदवाडी, पांगुळगव्हान आणि मांडवखेळ अशा गावांमध्ये भेट देऊन जमेल तसं श्रमदान केलं. अरबुजवडी येथे ग्रामसभेचा अनुभवसुद्धा घेतला, अशी माहिती देणारा उत्कर्ष पुढच्या वर्षी श्रमदानासाठी मराठवाडा गाठणार असल्याचे सांगतो.
लहानपणापासूनच गिर्यारोहण, जंगल कॅम्पस, पक्षी निरीक्षण यामधून वन्यप्राणी, जैविक साखळी याविषयी चेंबूरच्या सुप्रिया पाटील या तरुणीचे कुतूहल वाढत होते. दिवसेंदिवस होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, अवेळी पडणारा पाऊस, नष्ट होत चाललेली जंगले यासाठी काही तरी केले पाहिजे, या विचाराने तिला झपाटून टाकले आणि बीएस्सी झुऑलॉजीनंतर मास्टर्ससाठी एन्व्हायर्नमेन्टल सायन्स हा विषय घ्यायचे तिने मनाशी पक्के केले. मास्टर्स झाल्यानंतर लगेचच ‘ग्रो ट्रीज’ या सोशल संस्थेबरोबर काम करायची संधी सुप्रियाला मिळाली. गेली ५ वर्षं सुप्रिया या संस्थेबरोबर कार्यरत आहे. ‘ग्रो ट्रीज’च्या वेबसाइटवर अत्यल्प किमतीत झाडे लावण्याची संधी लोकांना उपलब्ध आहे. आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यांच्या वेबसाइटवर जाऊन तिथे जितकी हवी तितकी झाडे लावण्याची विनंती आपण करू शकतो. त्यासाठी मला थोडेसे पैसे मोजावे लागतील. पण झाड लावलेल्याचं ई-सर्टिफिकेट मला मिळतं. ही झाडे नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना विविध प्रसंगी ई-सर्टिफिकेटच्या माध्यमातून भेटही देता येतात हे विशेष! ‘आम्ही गेल्या १० वर्षांत देशभरात १६ राज्यांमध्ये तिथल्या सार्वजनिक/वनजमिनींवर गावकऱ्यांच्या सहभागाने, अनेक कंपन्यांच्या सीएसआरच्या मदतीने तब्बल ४० लाख झाडे लावली आहेत. स्थानिक लोकांना वृक्ष लागवडीमुळे त्यांच्या उपजीविकेकरिता व पर्यायाने पर्यावरणालाही कसा फायदा होईल याचे महत्व आम्ही पटवून दिले आहे’, असं सुप्रिया सांगते. या कामातून आलेले अनुभवही अविस्मरणीय असल्याचे तिने सांगितले. एकदा झारखंडमधील एका ज्येष्ठ लाभार्थींनी माझ्याकडे मन मोकळं (पान २ वर) (पान १ वरून) केलं. उद्या माझी मुलं माझी काळजी घेतील की नाही याची कल्पना नाही, पण हे मोहाचे लावलेले झाड नक्कीच मला दर वर्षी २० हजारांचा नफा (फळांच्या विक्रीद्वारा) मिळवून देईल. असंच मत महाराष्ट्र प्रकल्पातील लक्ष्मीनेही व्यक्त केलं. तिला वृक्ष लागवडीच्या कामांमधून रोजगाराची संधी मिळाली आणि महिला सशक्तिकरणाच्या संकल्पनेला हातभार लागला, असं सुप्रिया सांगते.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात सगळीकडे अन्याय-अत्याचार होत असताना संतांनी ज्या पद्धतीने समाजप्रबोधनाचे काम केले त्याच पद्धतीने संतसाहित्याच्या आधारे पर्यावरणविषयक समाजप्रबोधानाचे काम महा.एनजीओ फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच यांनीही सुरू केले आहे. ‘वारकरी संप्रदाय युवा मंच’चे अध्यक्ष आणि संत साहित्याचे तरुण अभ्यासक अक्षय महाराज भोसले यांच्या विचारांतून एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाला चालना मिळाली आहे. ते म्हणतात, मी मूळचा सातारा जिल्ह्य़ातील बिजवडी गावचा. या गावात कधीच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या गावातील दुष्काळ मी माझ्या जन्मापासूनच अनुभवला आहे. वृक्ष आणि जल संवर्धन होत नाही तोवर दुष्काळ महाराष्ट्रातून जाणार नाही, असं अभ्यासाअंती सिद्ध झालं. कीर्तनाचे धडे ज्यांच्याकडे गिरवले त्या श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर व श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप यांनी याविषयी जाणीव करून दिली. दरम्यान पाणी फाऊंडेशनचं काम उभं राहिलं. या कामाचं यशही पाहिलं. म्हणूनच आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष, जल संवर्धनाविषयी प्रबोधन करायचं ठरवलं आणि त्याची सुरुवात माण तालुक्यातील मोगराळे गावातून केल्याचं ते सांगतात. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘नगरेचि रचावी, जलाशये निर्मावी, महा वने लावावी नानाविध’, असा संदेश दिला होता. मात्र संतसाहित्याचा, विचारांचा पुढे प्रसारच झाला नाही. त्यामुळे गावागावांत आजही पर्यावरणाबद्दल अज्ञानच असल्याचं ते सांगतात. गावं पाणीदार करायची असतील, शेतं हिरवीगार करायची असतील तर शेतीविषयक सखोल अभ्यास होणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या गावात जाऊ न प्रबोधनाचे काम करायचे आहे, त्या गावातील संपूर्ण भौतिक माहिती घेतली जाते. गावातील स्वयंसेवकांशी चर्चा केली जाते. त्यानंतर गावातील लोकांचं दुष्काळाशी सामना करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून मनोबल वाढवलं जातं, अशी माहिती अक्षय यांनी दिली. व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या अक्षयवारीच्या माध्यमातून रोज या संदर्भातील अभ्यासपूर्ण पोस्ट्स जवळपास १०,००० हून अधिक लोकांपर्यंत नियमित पोहोचल्या जातात. आतापर्यंत सोलापूर, सातार, बीडमधील ३० हून अधिक छावण्यांपर्यंत समाजप्रबोधनाचं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दुष्काळग्रस्त भागातील भयावह चित्रण आपण सतत कोणत्या न कोणत्या माध्यमातून पाहत असतो, पण त्या भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांंच्या अवस्थेकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही. पण तिकडे लक्ष गेलं ते पुण्यातल्या अशोक देशमाने या तरुणाचं. मूळचा परभणीतील मंगळुर या दुष्काळग्रस्त भागात वाढलेल्या अशोकने दुष्काळाच्या चांगल्याच झळा सोसल्या आहेत. आईवडील दोघेही शेतकरी. पुण्यात नोकरीच्या निमित्ताने अशोक आला. २०१४ साली भर दुष्काळात गावी गेलेल्या अशोकने त्या वर्षी गावी नोकरी सांभाळून प्रचंड मदत केली; पण केवळ पैशांची मदत करून काही होणार नाही. इथल्या लोकांचं जीवन बदलेल असं काही तरी करायला हवं, या विचारांनी तो पेटून उठला. त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी काम सुरू केलं. सुरुवातीला काही दिवस त्याने नोकरी केली, पण मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय असं लक्षात आल्यावर तो पूर्णपणे या कामात उतरला. त्याच्या या चळवळीला त्याने ‘स्नेहवन’ नाव दिलं आहे. मुलांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे यासाठी स्नेहवनची धडपड सुरू आहे. सुरुवातीला भोसरीत टू बीएचके फ्लॅटमध्ये २५ मुलं राहत होती. आता हा आकडा ५२ वर गेला आहे. सध्या ५२ मुलांचे संपूर्ण पालकत्व घेऊन त्यांचे शिक्षण, संगोपन स्नेहवनमध्ये केलं जातं. नुकतीच या संस्थेला डॉ. कुलकर्णी या उभयतांनी सामाजिक बांधिलकीतून जागा देऊ केली आहे. आळंदीच्या कोयाळी गावात संस्थेला २ एकर जागा १ रुपया भाडय़ाने ९९ वर्षांच्या करारावर दिली आहे. या नव्या जागेत संस्थेसाठी बांधकाम सुरू असून लवकरच संस्थेचे तिथे स्थलांतर होणार असल्याची बातमी अशोक देशमाने यांनी दिली.
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेनेही ग्रामसभा, ग्रामचळवळ, वॉटरकप स्पर्धा यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी एकाच वेळी जनजागरण करण्याचं, प्रत्यक्ष मातीत श्रमदान करण्याचं आणि गावकरी-शासकीय योजना-पर्यावरण संवर्धनासाठी राबवले जाणारे उपक्रम याची योग्य सांगड घालत हे काम तरुणांनी उभारलं आहे. आपल्याला पर्यावरण निर्विवादपणे त्याच्या जवळच्या गोष्टी बहाल करतोय. आपण सर्वच जण पर्यावरणाचं देणं लागतो. ज्या पर्यावरणाच्या कुशीत आपण सुरक्षित आहोत त्या पर्यावरणाचं देणं नवी पिढी नक्कीच पूर्ण करेल आणि इथे वाढणाऱ्या जीवांना ‘एकमेका साहाय्य करून सुपंथ धरेल’ यात काही शंका नाही.