विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असल्याने इंजिनीअिरकडे कल होता. केवळ पुस्तकी यशापेक्षा इंजिनीअिरगच्या ज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याची आस परदेशात येऊन पूर्ण झाली.मला तंत्रज्ञान आणि विज्ञानाची आवड शालेय वयापासूनच होती. मी मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होतो. या आयबी स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना रस असणारे विषय घेता येतात आणि काहींत रस नसला तरीही ते शिकणं अपेक्षित असतं. माझा फिजिक्स वगैरे विषयांतला रस लक्षात घेता कळलं की, आपल्याला इंजिनीअिरगला जायला हवं. त्यातही इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगला पुढे चांगली संधी मिळू शकते, हा विचार डोक्यात सुरू होता. शिवाय परीक्षेतील यशापेक्षा माझा क्रिएटिव्हिटीवर अधिक भर आहे. मला वैविध्यपूर्ण प्रकल्प करायला आवडतात. परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त गुणांच्या आकडेवारीपेक्षा विचार करणं आणि सर्जनशीलता या गुणांना अधिक महत्त्व मिळतं. माझे बाबा अमेरिकेत शिकून भारतात परतले आहेत. आपणही त्यांच्याप्रमाणे तिथे जाऊन शिकावं असंही वाटलं. मी सात-आठ ठिकाणी अर्ज केला होता. पैकी तीन-चार ठिकाणांहून होकार आला. त्यातील ‘परडय़ू स्कूल ऑफ इंजिनीअिरग अँण्ड टेक्नॉलॉजी’, आययूपीयूआयने शिष्यवृत्ती देऊ केल्याने इथे यायचं पक्कं केलं आणि मी ‘बॅचलर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग’ला प्रवेश घेतला.
ऑगस्ट २०१९ मध्ये मी अर्ज केला होता. त्यानंतर प्रवेश घेतला. पुढे कोव्हिड आला तेव्हा माझं दुसरं वर्ष सुरू होतं. मार्चमध्ये आम्हाला महाविद्यालयातर्फे सांगण्यात आलं की सध्या वर्ग ऑनलाइन भरतील. त्यामुळे मी भारतात यायचा निर्णय घेतला. माझं पहिलं सेमिस्टर जानेवारी ते मेपर्यंत होतं. मी मार्चमध्ये भारतात आलो. त्या सेमिस्टरची परीक्षा ऑनलाइन दिली. पुढची सेमिस्टर ऑगस्टमध्ये सुरू होणार होती. तीही मी ऑनलाइनच दिली. डिसेंबरच्या अखेरीस मी इथे परतलो. नंतरचे क्लासेस ऑनलाइनच भरले, पण आम्हाला लॅबमध्ये काम करावं लागतं, त्यामुळे तेवढय़ापुरतं लॅबमध्ये यायची परवानगी मिळाली आणि भारतात असताना पुढे ढकलावं लागलेलं लॅबवर्क २०२१ मध्ये करता आलं, तेही मास्क लावून, पुरेसं अंतर ठेवून. आम्हांला आपापले प्रयोग लिहून दिलेल्या सूचनांनुसार एकटय़ालाच करायला लागायचे.
भारतातून ऑनलाइन शिकताना वेळेच्या गणिताचा थोडा प्रश्न यायचा. बरेचसे प्राध्यापक त्यांचं शिकवणं रेकॉर्ड करून अपलोड करत होते. ते नंतर ऐकता- बघता येत होते. ऑनलाइन क्लास अटेंड करणं अगदी अनिवार्य नव्हतं. आम्ही दुसऱ्या देशात आहोत आणि वेळेचा प्रश्न आहे हे कारण पुरेसं होतं. काही शंका असल्यास त्या ईमेल करून विचारता येत होत्या. बऱ्याच पुस्तकांच्या पीडीएफ मिळत होत्या. करोनाच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा कशी घेणार याबाबत आम्हाला आणि विद्यापीठालाही साशंकता वाटत होती. नंतर ठरावीक मुदतीत दिलेला प्रॉब्लेम सोडवावा, असं सांगण्यात आलं. त्यासाठी पुस्तकाची मदत घेतलेली चालणार होती. ही गोष्ट दिसायला सोपी दिसली तरी तितकीशी सोपी नव्हती. कारण ते प्रश्न दिसतात तेवढे चटकन सुटणारे नसायचे. हा अभ्यासक्रम शिकताना केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती, संशोधनाची तयारी, जिद्द, चिकाटी इत्यादी मुद्दे आपसूकच अंगीकारले जात आहेत. गणित हा विषय इतर विषयांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येक गणित (सम) युनिक असते. त्यामुळे अधिकाधिक गणितं सोडवण्यावर भर दिलेला चांगला. आत्ताही मला आठवतं आहे की, भारतात असताना एकदा एक सम सोडवताना एका पायरीवर थोडा अडलो होतो, पण शेवटी ते सोडवता आलं. नंतरच्या काळात विद्यापीठाने ठरवलं की, एरवीसारखीच परीक्षा घ्यायची, फक्त ती झूमवर घेणार. सगळय़ांचा कॅमेरा ऑन असणार आणि परीक्षा होणार. इथे परत आल्यावर रोजचे वर्ग ऑनलाइन आणि परीक्षा ऑफलाइन होतील असा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा भारतात लस उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे इथे आल्यावर मला करोनाची चाचणी करावी लागली होती. आता सध्या सगळं सुरळीत सुरू झालं आहे. फक्त करोना झाला असेल त्या व्यक्तीने कॉलेजला न यायची सूचना देण्यात आली आहे. या सेमिस्टरमध्ये आमच्या एका प्राध्यापकांना करोना झाला. त्यामुळे तेव्हा त्यांनी काही लेक्चर्स ऑनलाइन घेतली.
काही वेळा आम्ही करत असलेल्या काही प्रकल्पांमुळे खूप गोष्टींचं आकलन होतं. उदा. एका प्रकल्पात स्मार्ट चेसबोर्ड तयार करताना विज्ञान आणि सर्जनशीलता यांचा मेळ घालता आला. ‘एफआयडीई’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या बुद्धिबळाच्या स्पर्धा खेळताना खेळाडूला त्याची चाल लिहावी लागते. मी तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक चेसबोर्डमध्ये प्यादे पटावर सरकवल्यावर पटाखालचा सेन्सर कार्यरत होऊन त्या चालीची नोंद थेट संगणकावर केली जाईल, असा प्रोग्रॅम तयार केला. त्यावर मी रिसर्च पेपर लिहिला. ‘एफआयडीई’ला ही कल्पना चांगली वाटल्याचे त्यांनी लगोलग कळवले. एक चांगला अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला. अशा प्रकारचे प्रकल्प करताना आमच्या विचारांना, संशोधनाला, अभ्यासाला मोकळीक दिली जाते. निर्णयस्वातंत्र्य दिलेलं असतं. आणखीन एक ‘सिम्युलेटिंग अ कार ऑन मायक्रोप्रोसेसर’ हा प्रकल्प केला होता. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गाडी शिकण्यासाठी हा प्रोग्रॅम उपयुक्त ठरू शकतो. नासातर्फे RASC- AL Competition घेण्यात आली होती. त्यात ‘बिल्डिंग थोरियम माइन्स ऑन द मून’ अर्थात चंद्रावर सापडणाऱ्या थोरियमचा रॉकेटमध्ये कसा वापर करता येईल, या विषयीचा विचार करायचा होता. २०२० ते २०२१ मध्ये ‘रोबोटिक्स क्लब’मध्ये मी दोन वर्ष व्हाईस प्रेसिडेंट होतो. आमची टीम विद्यापीठातर्फे रोबोंसाठीच्या विविध स्पर्धामध्ये सहभागी होत होती. आता अभ्यास वाढल्यामुळे त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
या सेमिस्टरच्या शेवटी आणखी एक प्रकल्प करायचा आहे. या अशा वेगवेगळय़ा प्रकल्पांमुळे आमचं तंत्रकौशल्य वेळोवेळी विकसित होत गेलं. एरवी मी वेळ मिळाला की बुद्धिबळ खेळतो आणि त्याच्या स्पर्धामध्येही सहभागी होतो. कधीकधी मित्रांसोबत बाहेर फिरायला जातो. इथे येण्यासाठी मला पालकांचा कायमच भक्कम पािठबा मिळाला आणि मिळतो आहे. इथे येऊन मी पूर्णपणे स्वावलंबी झालो आहे. माझी निर्णयक्षमता वाढली. मला इंटर्नशिप मिळाली असून ती ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे मला इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करायची संधी मिळणार आहे. मे २०२३ मध्ये पदवी मिळाल्यानंतर पुढे नोकरी करायचा विचार आहे. करिअरचा प्रत्येक टप्पा विचारपूर्वक गाठणं आणि त्यासाठी मेहनत घेणं सुरू आहे. त्यात नक्कीच यशस्वी होईन असं वाटतं.
शब्दांकन : राधिका कुंटे