मृण्मयी वैद्य,डिप्लोमा ऑफ इंटिरिअर डेकोरेटिंग, हंबर कॉलेज, टोरांटो, कॅनडा
दहावीत असतानाच रुळलेल्या वाटेवरून जायचं नाही, हे मी ठरवलं होतं. मला डिझाईिनगमध्ये अधिक रस होता. ॲप्टिटय़ूड टेस्टमध्ये या आवडीला दुजोरा मिळाला. त्यानुसार डिझाईिनगकडे वळले. २०१६ मध्ये रचना संसदमधून इंटिरिअर डिझाईनरची पदवी घेतली. नंतर ‘डिझाईनर डय़ुओ’ या कंपनीत नोकरी केली. परदेशात जायचं ठरवलं २०१९ मध्ये. त्याआधी दोन वर्षांपासून स्वतंत्र काम करत होते. आधी अमेरिकेत जाऊन मास्टर्स करायचं मनात होतं. मग कॅनडाचाही विचार केला. भावी आयुष्य, करिअर भविष्याच्या आणि पैशांच्या दृष्टीने कॅनडाला जाणं अधिक सोयीचं होतं. आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेत जवळपास वर्ष गेलं. ‘डिप्लोमा ऑफ इंटिरिअर डेकोरेटिंग’ या अभ्यासक्रमासाठी अर्ज केल्यावर कोविडच्या काळात अर्जाचं उत्तर यायला खूप वेळ गेला. टोरांटोमधल्या हंबर कॉलेजचा होकार आला जून २०१९ मध्ये. विद्यार्थ्यांना होकार देण्यासाठी सप्टेंबर पहिल्या आठवडय़ापर्यंतचा वेळ दिला गेला होता. होकार कळवल्यावर प्रवेश शुल्क निश्चित केलं जाणार होतं. आर्थिक गणितं पाहून होकार कळवला. त्यानंतर व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली. व्हिसा मिळण्याआधी विद्यार्थ्यांना ठरावीक रक्कम कॅनडातल्या बँकेत जमा करावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा होते आणि तिचा वापर करता येऊ शकतो.
मी अर्ज केला होता जानेवारी २०२१ च्या बॅचसाठी. व्हिसाचा अर्ज भरला सप्टेंबर २०२० मध्ये. दरम्यान, कोविडचं सावट सर्वदूर पसरलं होतं. विलंब होत होत डिसेंबर २०२० मध्ये बायोमॅट्रिक्ससाठी वेळ मिळाली. मार्च २०२१ अखेरीस व्हिसा मंजूर झाल्याचं पत्र आलं. मधल्या काळात कॉलेज सुरू झालं होतं. व्हिसा नाकारला गेला तर कोर्समधून बाहेर पडता येण्याची मुदत मार्चची होती. मी आणि मित्राने तिकीट काढलं होतं मेच्या पहिल्या आठवडय़ातलं. एप्रिलमध्ये माझा व्हिसा परत स्टॅम्प मारून आला. त्याच सुमारास मला आणि माझ्या कुटुंबीयांना कोविड झाला. तेव्हा कॅनडाला जावं की नाही, अशा थोडय़ा दुविधेत पडले. कारण विलगीकरणाचा काळ जेमतेम संपत होता. तो निर्णय होण्याआधीच कॅनडाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. त्यामुळे जाणं रद्दच झालं. पहिली दोन सेमिस्टर्स भारतातून ऑनलाइन केली. सुरुवातीला नोकरीनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळणं जरा कठीण गेलं. जानेवारी ते ऑगस्ट या काळात रात्रीची लेक्चर्स अटेंड केली. या वेळा-अवेळांचं फारसं वाटलं नाही, कारण रचनामधल्या अभ्यासात सबमिशनसाठी रात्रीची जागरणं केली होती. तरीही ते टाळण्यासाठी कॅनडाला लवकर जाणं गरजेचं होतं. तोपर्यंत भारतातून थेट विमान सेवा सुरू झाली नसल्याने पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला. कोविड होऊन गेल्याने मी लगेच लस घेऊ शकत नव्हते, मात्र बऱ्याच ठिकाणी लशीची अट होती. सर्बियातून पुढे जाता येऊ शकेल. तिथे एक आठवडा विलगीकरणात राहणं आवश्यक होतं, असं कळल्यावर तो पर्याय निवडला.
कुणालाही कॅनडाला जायचं असल्यास त्यांच्या मान्यताप्राप्त वैद्यकीय केंद्रात जाऊन ठरावीक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. डॉक्टरांना सविस्तर वैद्यकीय माहिती द्यावी लागते. कुणी टॅटू काढून घेतला असेल तर वेगळी चाचणी करावी लागते. या चाचण्यांच्या वैधतेची मुदत एका वर्षांसाठी असते. बाकी गोष्टी सुरळीत पार पडल्या, मात्र या वैद्यकीय चाचणीचा निष्कर्ष योग्य न आल्यास व्हिसा नाकारला जाऊ शकतो. माझी ही चाचणी १२ ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. तिची मुदत जायच्या आधी संपत असल्याने मी १० ऑगस्टची अपॉइंटमेंट घेतली होती. तिचे अपडेट दूतावासात पाठवले गेले नाहीत. कॅनडाच्या वेबसाइटवर अपडेट झालेलं नसेल तर व्हिसा अवैध ठरू शकतो. १९ ला माझं सर्बियाचं विमान होतं, तोपर्यंत अपडेटचं काम होईल अशा समजुतीत मी होते. दिलेल्या रिसिटवर पुढे जाता येईल, असं त्या वैद्यकीय केंद्रात सांगण्यात आलं होतं. पण ते अपडेट न झाल्याने माझ्या व्हिसाचा स्टेटस इनव्हॅलिड झाला होता, अर्थात हे नंतर कळलं. सर्बियाच्या विमानतळावर पोहोचले. तिथे दोन्ही तिकिट्स आणि बोर्डिंग पास मिळाल्यावर जरा बरं वाटलं. पुढचा थांबा होता फ्रँकफर्टला. आमचा नंबर येणार, इतक्यात माझ्या नावाचा पुकारा झाला. तिथे त्यांनी कॅनडाच्या दूतावासात फोन करून परिस्थिती सांगितली. त्यावर कळलं की, मी इथून पुढे जाऊ शकत नाही. मित्र थांबला असता तर त्याला नवीन तिकीट काढून जावं लागलं असतं. त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांनी सुचवल्यानुसार आम्ही विचार केला आणि तो मार्गस्थ झाला. त्यानंतर अंदाजे चाळीस तास मी तिथेच होते. माझ्या घरचे व्हिसाचा स्टेटस अपडेट होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या दिवशी शुक्रवार असल्याने भारतातलं कार्यालय बंद झालं होतं. शनिवार-रविवार काही होणं शक्य नव्हतं. सगळय़ा प्रयत्नांनंतर जर्मनीतील भारतीय दूतावासात माझ्या मामांनी संपर्क साधला. तिथले अधिकारी त्या विमानतळावर मला भेटले. त्यांनीही मला पुढे जाता येण्यासाठी प्रयत्न केले. पण अपडेटशिवाय पुढे जाता येणार नाही, ही भूमिका ठाम होती. माझी तिथल्या ट्रांझिस्ट हॉटेलमध्ये सोय करण्यात आली. संध्याकाळच्या मुंबईला परतणाऱ्या विमानाचं बुकिंग केलं. मधल्या काळात घरच्यांनी पुन्हा त्या केंद्रात जाऊन माझी कहाणी ऐकवली. फक्त डॉक्टरांची सही घेऊन पुढे अपडेट होणं बाकी होतं. घरच्यांनी टेक देऊन ते करून घेतलं आणि ते दूतावासाकडे गेलं. २१ ला दुपारी मुंबईत परत पोहोचले. दोन सेमिस्टरदरम्यानच्या सुट्टीत हे सगळं घडलं. कॅनडात आल्यावर विलगीकरणात राहावं लागेल, तेव्हा सुट्टी असेल आणि लेक्चर्स बुडणार नाहीत, असा बेत ठरवला होता तो फिस्कटलाच. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात व्हिसाचा स्टेटस अपडेट होऊन तो वैध ठरला. मग १८ सप्टेंबरचं तिकीट काढलं. तेव्हाही सर्बियामार्गेच आले. या वेळी नियम बदलल्याने विलगीकरणात राहावं लागणार नव्हतं. विमानतळावर चाचणी करून काही तास हॉटेलवर राहिले. तिथून पॅरिसमार्गे १९ ला कॅनडात पोहोचले.
पहिल्याच थंडीचा डट के सामना करून आता दैनंदिन जीवनाची घडी बसली आहे. कॅनडामध्ये ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे इथे आल्यावर कॉलेज ऑनलाइनच सुरू होतं. ऑफलाइन लेक्चर्स ७ मार्चपासून सुरू झाली आहेत. शेवटचा दीड माहिना ऑफलाइन लेक्चर्स सुरू होतील, असं कळलं आहे. इथे यायचा निर्णय योग्य होता, हे वेळोवेळी जाणवतं. इथे प्रत्येकाला स्वयंसिद्ध व्हावं लागतं. सध्या मी वीकएण्डला काम करते, कारण विद्यार्थ्यांना आठवडय़ाला २० तास काम करण्याची मुभा आहे. सुट्टीत हा कालावधी ४० तासांचा आहे. या तात्पुरत्या रोजगाराच्या संधी खूप असून त्यातून महिन्याचा खर्च निघतो. भारतात असताना सुरुवातीला ऑनलाइन शिक्षणाचा सराव व्हायला वेळ लागला. शिकताना सगळय़ांनी स्वत:चा फोटो लावणं आवश्यक होतं. म्हणजे नेमकं कोण शिकतेय हे कळू शकेल. प्रसंगी कॅमेरा बंद ठेवलेला चालणार होता. त्यामुळे आमच्या वर्गातल्या ८० जणांपैकी फक्त १०-१५ जणांना मी बघितलं असेल. कारण प्रत्यक्ष भेटून अभ्यासाची चर्चा करायला अधिक वाव असतो. इथे प्राध्यापकांनी सांगितलेल्या साइट व्हिजिट करता येऊ शकतात. इथे आल्यावर एक साइट व्हिजिट करून असाइनमेंट करता आली. सध्या मास्क आणि लसीकरण अनिवार्य आहे. कॉलेजमध्ये येताना कॉलेजच्या अॅेपवर स्क्रीनिंग करायलाच लागतं.
इथलं शैक्षणिक वातावरण आणि प्राध्यापकांचं वागणं सौहार्दाचं आहे. हा डिप्लोमा कोर्स असल्याने सगळय़ांनाच इंटिरिअर डिझाईनची पार्श्वभूमी माहिती असते असं नाही. काही फ्रेशर्सही असतात. ते लक्षात घेऊन खेळीमेळीने शिकवलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्यांला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. मला भारतात असताना कोविड झाला होता, तेव्हा सेमिस्टर संपत आलं होतं. असाइनमेंट पूर्ण करायची होती, पण आजारपणामुळे प्रचंड थकवा आला होता. तेव्हा असाइनमेंट सबमिट करायची मुदत दोन दिवस वाढवून मिळेल का, असा ईमेल मी प्रा. डेबोरा अलसीद यांना केला होता. त्यांनी माझी परिस्थिती समजून घेऊन सहकार्य केलं. इंटिरिअरमधली आपल्याकडची आणि इथली मानकं वेगळी आहेत. उदाहरणार्थ- स्वयंपाकघराच्या ओटय़ाच्या उंचीतला फरक. कारण इथले लोक मुळातच उंच आहेत. तुलनेने आपल्याकडच्या स्त्रिया बुटक्या असतात. हे छोटेसे फरक पाच र्वष भारतातल्या मानकांच्या आधारे काम केल्यावर डोक्यात फिट्ट बसलेले असल्याने मोठे वाटतात. भारतातल्या मार्केटची अधिक माहिती असते. सुरुवातीला ही तुलना नकळत केली गेली. थोडं गोंधळायलाही झालं. अभ्यासातल्या रेखाचित्रांत आपसूक भारतीय मापांचं प्रतिबिंब पडायचं. आता इथल्या गोष्टींची सवय व्हायला लागली आहे. उदाहरणार्थ- महाराष्ट्रातल्या घरबांधणीत हवामानाच्या वैशिष्टय़ांनुसार बांधकाम करावं लागत नाही, पण इथे ते करावं लागतं. त्यातल्या काही अनिवार्य गोष्टींचं पालन झालं आहे की नाही, याची यंत्रणांकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. इथल्या घरमालकांना स्वत:च्या घरात स्वत: काम करता येतं. तर आपल्याकडे किमान चार प्रकारच्या कुशल माणसांची मदत घ्यावी लागते. इथे इंटिरिअर करताना एखादी भिंत बांधायलाही सरकारची परवानगी लागते. अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते आहे. हे शिक्षण आवडलं; कारण मला रेसिडेन्शिअल इंटिरिअर शिकण्यात अधिक रस आहे. या अभ्यासक्रमात रेसिडेन्शिअल किचन आणि बाथरूम या विषयांवर अधिक भर आहे. भारतातलं माझं काम या विषयांशीच निगडित होतं. कर्मिशिअल इंटिरिअरमध्ये अनेक मुद्दय़ांचा समावेश होतो आणि बरेचदा ही कामं खूपच लांबतात. उदाहरणार्थ- वडाळय़ाच्या विद्यालंकार कॉलेजचं काम डिझाईनर डय़ुओमध्ये असताना २०१६ मध्ये करायला सुरुवात केली होती. ते काम मी २०१९ मध्ये नोकरी सोडली तेव्हा आणि अजूनही सुरू आहे. मला स्वत:ला घर डिझाईन आणि डेकोरेट करण्यात अधिक स्वारस्य आहे. क्लाएंटच्या भावना त्या घरात गुंतलेल्या असतात. त्या ओळखून आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तसं डिझाईन करणं मला अधिक भावतं.
आमचा हा अभ्यासक्रम जानेवारीत सुरू होत असेल तर तो पूर्ण दोन र्वष न लांबता १६ महिन्यांत संपतो. मात्र तो सप्टेंबरमध्ये सुरू होत असेल तर पूर्ण दोन र्वष लागतात, कारण मध्ये एक सेमिस्टरचा ब्रेक असतो. कॅनडातल्या पद्धतीनुसार दोन वर्षांचा कोर्स असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट मिळतं, ते तीन वर्षांचं मिळतं. एक वर्षांचा कोर्स असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट मिळतं, ते एक वर्षांचं मिळतं. मग काही जण एक वर्षांचे दोन कोर्स करतात. या तीन वर्षांत पीआरच्या अर्जाची तयारी करायची असते. सध्या पुढच्या पर्यायांची कल्पना येण्यासाठी आम्हाला काही कार्यानुभव दिले जात आहेत. रेसिडेन्शिअल डिझाईनशिवाय सॅम्पल होम्स तयार करणाऱ्या काही कंपन्यांमध्येही चांगल्या संधी आहेत. कारण इथे लगेच स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी प्राध्यापक प्रोत्साहन देत नाहीत. मलाही पहिली दोन र्वष नोकरी करून मग स्वतंत्र काम करायचं आहे. शिवाय कॉलेजमध्ये विविध व्यावसायिकांची व्याख्याने आयोजित केली जातात. तेव्हा त्यांच्याशी संवाद साधताना काही संधी निर्माण होऊ शकतात. मी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटत असून ती पूर्ण होतील, याची खात्री वाटते आहे.
कानमंत्र कॅनडात यायचा विचार करत असाल तर व्हिसा आणि कॉलेजसाठीचा अर्ज अगदी लवकरात लवकर करा. कारण दोन्ही प्रक्रियांमध्ये बराच वेळ जाणार हे गृहीत धरा. अभ्यासक्रम निवडताना सखोल विचार करा. चौकशी करा. अभ्यास झेपला नाही तर तो मध्येच सोडावा लागतो. खूप मनस्ताप होतो आणि पैसेही जातात.
शब्दांकन : राधिका कुंटे