मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. टायगर सफारी हा फोटोग्राफर्स आणि व्याघ्रप्रेमी पर्यटकांचा हळवा कोपरा आहे. याच सफारींचं नियोजन करून करिअरचा एक वेगळा मार्ग निवडण्यात काही तरुण यशस्वी झाल्याचं दिसून येतं..

२९ जुलै २०१० रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत उपस्थित देशांनी एक करार केला. या कराराची आठवण म्हणून २९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. घनदाट जंगलात आश्रयाला असणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा तसेच आधुनिकीकरणाच्या नादात जंगलांचं प्रमाण कमी झालं. साहजिकच वाघासारख्या जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. हे लक्षात घेता भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात झाली. सुरुवातीला देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात ताडोबा,पेंच, सह्याद्री, मेळघाट, नवेगाव-नागझिरा आणि बोर असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा, पण तितकाच महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाची कुठलीही जाहिरात विदर्भातले वाघ दाखवल्याखेरीज पूर्ण होत नाही. याचं कारण आपल्या राज्यातले बहुतांश व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. व्याघ्रदर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सफारी गाइड ही संकल्पना तेजीत आली असून करिअरची एक वेगळी वाट तरुणाईसाठी खुली झाली आहे.

पुण्यातील रोहित दामले हा त्यापैकीच एक तरुण. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण करत असताना त्याला वाइल्डलाइफ फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. पुण्याजवळच्या डोंगरांवर, निसर्गाच्या जवळ जाऊन प्राणी-पक्षी पाहण्याचा व ते क्षण कॅमेरात टिपण्याचा त्याला छंद लागला. त्याच्यासोबतचे इतर फोटोग्राफर मित्र सफारीला जात व परतल्यावर तिथले वाघांचे फोटोज रोहितला येऊन दाखवत. रोहितलासुद्धा सफारीला जायची इच्छा होती, पण त्याचे आईवडील करिअरला प्राधान्य देणारे असल्यामुळे त्याचं लक्ष करिअरवर केंद्रित करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. रोहितच मन मात्र काँक्रीट आणि माणसांनी बुजबुजलेल्या शहरात रमत नव्हतं. जंगलातला निसर्ग आणि त्या निसर्गाशी इमान राखणारे वन्यजीव त्याला खुणावत होते. अखेर त्याने ताज सफारीच्या ट्रेिनग प्रोग्रॅममध्ये भाग घेतला. त्या प्रोग्रॅमनंतर त्याला नॅशनल पार्कमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. ज्यात तो पर्यटकांना गाडी चालवत सफारी घडवायचा व माहिती द्यायचा. कालांतराने अनुभवाने पक्कं होत त्याने ‘सफारी विथ रोहित’ या नावाने स्वत:ची कंपनी सुरू केली आणि करिअरची एक वेगळी वाट निवडली. सफारी नेमकी कशी आयोजित केली जाते याविषयी माहिती सांगताना रोहित म्हणतो, ‘करंगळी एवढं जर जंगल असेल तर त्याच्या नखाएवढय़ा भागातच सफारी करता येते. ज्याला कोअर क्षेत्र असे म्हणतात. आता ताडोबाच्या बफर क्षेत्रातही सफारी करता येते. बफर सफारीचा फायदा ग्रामस्थांना जास्त होतो. ताडोबा बफर झोनमध्ये १३ प्रवेशद्वार आहेत आणि सफारी मार्ग बहुतेक एकमेकांशी जोडले आहेत. कोअर झोन पावसाळय़ात बंद असतो. प्रत्येक झोनचे प्रवेश शुल्क वेगवेगळे असतात. पर्यटकांच्या मागणीनुसार त्या त्या क्षेत्रात त्यांना नेलं जातं. काही पर्यटकांना वाघांची फक्त पिल्लं बघायची असतात, तर काहींना मेल टायगर बघण्याची इच्छा असते. प्रत्येकाच्या अजब अपेक्षा असतात’. 

प्रत्येक सफारीत पर्यटकांबरोबर किस्से घडत असतात. असाच एक किस्सा रोहितने सांगितला. ‘एक विदेशी पर्यटक होता. तो दरवर्षी भारतात यायचा व सफारी करायचा. त्याच्या एकूण १७० सफारी झाल्या होत्या, पण त्यातल्या एकाही सफारीमध्ये त्याला वाघ दिसला नाही. वाघाचे पंजे, झाडात बसलेल्या वाघाची शेपटीच त्याने पाहिली होती, पण वाघ काही पाहिला नव्हता. वयाच्या साठीपासून तो सफारी करत होता. एकदाही वाघ न दिसल्याने तो अत्यंत हतबल झाला होता. पन्ना नॅशनल पार्कमध्ये वयाच्या ८२व्या वर्षी तो आयुष्यातली शेवटची सफारी करण्यासाठी आला, तेव्हा त्याचा सफारी गाइड मी होतो. त्या सफारीतसुद्धा त्याला वाघ दिसला नाही. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं व तो हुंदके देऊन रडायला लागला. मी त्याची खूप समजूत काढली. तेवढय़ात अचानक एक वाघ झाडीतून बाहेर आला व रस्त्यावर येऊन थांबला. त्याला मी सांगितलं तो बघ वाघ तुझ्या समोर आहे, पण त्याचे डोळे इतके पाणावले होते की त्याला समोरचा वाघच दिसत नव्हता. शेवटी मी गाडी थांबवून त्याला वाघ दाखवला. तेव्हा त्याला आकाश ठेंगण झालं होतं. त्याचे हात आनंदाने कापत होते. त्या परिस्थितीतही त्याने कॅमेरा काढला व वाघोबाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. मोजून नऊ सेकंद त्याने वाघ पाहिला. त्याला आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान माझ्यामुळे मिळालं, असं तो सांगत राहिला’, ही आठवण सांगतानाच कुठल्याही जंगलात जाणं हा सर्वात आनंदाचा क्षण तर जंगलातून शहरात परतणं हा अतीव दु:खाचा क्षण असतो, असं रोहित सांगतो. 

नागपूरमध्ये निकिता व कार्तिक हे तरुण जोडपं जंगल सफारीसाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ताडोबा जंगलाच्या नजीक जन्माला आलेल्या कार्तिकला लहानपणापासूनच आजोबांबरोबर जंगलात फिरण्याची आवड होती. कार्तिकचे आजोबा शिकारी होते. त्यामुळे त्यांना जंगलातले खाचखळगे माहिती होते. त्यांच्याबरोबर फिरून त्यानेही आजोबांसारखी माहिती करून घेतली. वयाच्या नवव्या वर्षी कार्तिकने एकटय़ाने जंगल सफारी केली होती. ताडोबामध्ये डब्ल्यूडब्ल्यूएफने आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये त्याने सहभाग घेतला होता. कार्तिकला माहिती खूप असल्यामुळे त्याचे नातेवाईक व मित्रपरिवार त्याला गाइड म्हणून सोबत येण्यासाठी गळ घालायचे. त्यातूनच त्याला सफारी गाइड म्हणून काम करण्याची दिशा सापडली. कार्तिक सांगतो, ‘पूर्वी माझ्या लहानपणी संपूर्ण ताडोबा जंगल सर्वासाठी खुलं होतं. मी स्वत: संपूर्ण जंगल पायी चालत फिरलो आहे. ताडोबातले सगळे वाघ मी हजारो वेळा पाहिले आहेत. व्याघ्र सफारीसाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा वेगवेगळा उद्देश असतो. सफारीचं बुकिंग तीन महिने आधी करावं लागतं. उन्हाळा आणि हिवाळा हे दोन ऋतूच जंगलसफारीसाठी अनुकूल व खुले असतात. दोन्ही ऋतूत वाघांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. हिवाळय़ात सकाळच्या वेळी गवतावर दव पडत असल्यामुळे वाघ झाडीतून चालत नाही तर तो रस्त्यावरून चालतो. त्यामुळे हिवाळय़ात सकाळी हमखास रस्त्यांवर वाघ पाहायला मिळतो. उन्हाळय़ात पाणवठय़ावर पाणी पिताना किंवा पाण्यात खेळताना वाघ दिसतो’.आपल्या हिंदी सिनेमांनी ‘माणसांची शिकार करणारं हिंस्र जनावर’ असंच वाघाचं चित्रण कायम केलं आहे. वन्यजीव-मानव संघर्षांच्या घटना वरचेवर घडत असतात, पण वाघ किंवा अन्य वन्यजीव सहसा माणसावर भक्ष्य म्हणून हल्ला करत नाहीत. विशेषत: वाघ तर मला ‘परफेक्ट जंटलमन’ वाटतो, असं कार्तिक म्हणतो. ‘वाघाला माणसात तर अजिबात रस नसतोच, पण पोट भरलेलं असेल तर तो त्याच्या आवडत्या भक्ष्याकडेसुद्धा ढुंकून पाहत नाही’, असं त्याने सांगितलं. 

कार्तिकची पत्नी निकिता ही खास स्त्रियांसाठी सफारी आयोजित करते. स्त्री पर्यटकांबरोबरचे अनुभव सांगताना निकिता म्हणाली, ‘पुरुषांपेक्षा महिला सफारीसाठी खूप जास्त उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला आवर घालणं ही आमची पहिली  जबाबदारी असते’. पर्यटकांना काही नियमावलीचं पालन करावं लागतं. ब्राइट कपडे न घालणं, सुवासिक परफ्यूमचा वापर न करणं हे बेसिक नियम महिलांना वारंवार सांगावे लागतात, असं सांगणाऱ्या निकिताने तिची एक आठवण सांगितली. ‘एकदा मुंबईची क्राइम ब्रॅंचमधील महिला अधिकारी तिच्या मैत्रिणींचा गोतावळा घेऊन माझ्यासोबत सफारीला आली होती. सफारी संपत असताना एके ठिकाणी त्यांची जिप्सी बंद पडली. मी दुसऱ्या जिप्सीमध्ये होते. नियमानुसार मी त्यांच्याबरोबर थांबूही शकत नव्हते किंवा माझ्या जिप्सीतूनही ओव्हरलोडिंग करून त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हते. नियम तोडणाऱ्या गाइडला दीड ते दोन महिने बॅन करण्याची कडक शिक्षा आहे. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य राखत त्यांना मी म्हटलं की मी बाहेर जाऊन तुमच्यासाठी दुसरी जिप्सी पाठवते. तिच्या जिप्सीमध्ये नियमानुसार गाइड व ड्रायव्हर होता. त्यांनी एका बाजूला गाडी उभी केली. काही वेळाने गाडीच्या एका बाजूला कोपऱ्यात वाघिणीची पिल्लं खेळत होती व गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्यांची वाघीण आई त्यांना शोधत होती. तिला अगदी समोर बघून बंद पडलेल्या गाडीतल्या सर्व महिला घाबरून गेल्या. गाइड त्यांना समजावत होता तरीही त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. जंगलात बारीक आवाजही फार मोठा येतो, त्यामुळे त्यांचा व वाघिणीचा आवाज घुमायला लागला. शेवटी त्यांना गाइडने कसंबसं शांत केलं. मुळात ती वाघीण तिच्या पिल्लांना शोधत होती आणि तिची पिल्लंही तिला आवाज देत होती, पण मधोमध बंद पडलेल्या जिप्सीमुळे त्यांची नजरानजर होत नव्हती. त्यांचा आवाज ऐकून सगळे घाबरले व त्यांनी घाबरून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. काही मिनिटांतच त्यांच्यापर्यंत  जिप्सी पोहोचली. त्यांना सुखरूप दुसऱ्या जिप्सीत बसवलं’, ही आठवण सांगणाऱ्या निकिताने मुळात आतापर्यंत वाघाने पर्यटकांवर कधी हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही, अशी माहिती दिली.

आपण मर्यादा ओलांडून त्याला असुरक्षित वाटेल इतक्या जवळ न गेल्यास तो आक्रमकता दाखवत नाही आणि त्याच्या इशाऱ्याच्या गुरकावण्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय हल्लाही करत नाही. सफारीसाठी लागतात ते पेशन्स. पर्यटकांकडे पेशन्स नसतील तर घाबरून सफारी करण्यात काही अर्थ नाही, असं ती म्हणते. जंगलात सफारी करताना वा गाइड म्हणून काम करताना असे कित्येक प्रसंग येतात जे खूप काही शिकवून जातात. आपल्याला जंगलाबद्दल असलेली माहिती, नियमांचं पालन, प्रसंगावधान राखत या सफारीचं नियोजन करावं लागतं. मात्र खरोखरच जंगलाची-वन्यजीवांची ओढ असेल आणि करिअरची अशी वेगळी वाट खुणावत असेल तर सध्या रोहित, कार्तिक-निकितासारखी अनेक तरुण मंडळींचे काम आणि त्यांचे अनुभव तुम्हालाही प्रेरणादायी ठरू शकतील.

viva@expressindia.com