|| सचिन जोशी
आजच्या जगात प्रत्येक जण दिवसातील बारा तासांपेक्षा जास्त वेळ काम करतो आहे. अशा या धावपळीच्या जगात आपल्याजवळ जेवण बनवण्यासाठीचा वेळ आणि ऊर्जाच नाही. मग अशा वेळी प्रमाणाने जास्त असलेला, आपली भूक शमवणारा आणि पौष्टिक असा आहार आपल्याबरोबर नेहमी नेणे सोप्पे नसते. त्यातलाच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे व्रॅप. आज आपण या व्रॅपच्याच सफारीला निघालो आहोत.
पोळीसदृश फ्रँकी, पराठे (व्रॅप फूड) किंवा सँडविच हे भरपेट जेवणासाठीचे योग्य पर्याय आहेत. व्रॅप हे पोटभर आणि पौष्टिक असते, कारण त्यात अनेक प्रकारच्या भाज्या, मांस आणि वेगवेगळ्या चटण्या समाविष्ट असतात. व्रॅप हे मुलायम फ्लॅट-ब्रेड आणि सारणाने बनलेली डिश आहे. याला सँडविच म्हणूनच ओळखले जाते, परंतु नेहमीच असे होते असे नाही. साधारणपणे फ्लॅट-ब्रेड हे पोळी, कुल्चा किंवा पिटा ब्रेड असतात. त्यातील सारण हे शिजवलेल्या मासांचे पातळ तुकडे किंवा माशांसोबतच चिरलेला लेटय़ुस, बारीक चिरलेला टोमॅटो किंवा मेक्सिकन पद्धतीतील सॅलड, अवाकाडोयुक्त सॅलड किंवा सॉस, लालसर मशरूम, हलकेसे भाजलेले कांदे, चीज आणि मध, मोहरीयुक्त सॉस बुर्रितो आणि पिटा सँडविच यांपासून बनवले जाते.
बुर्रितो नावाची मेक्सिकन डिश ही आजच्या काळातील अत्यंत प्रसिद्ध व्रॅप आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बुर्रितो हा शब्द स्पॅनिश भाषेतील आहे आणि त्याचा अर्थ छोटे गाढव असा होतो. कदाचित गाढव जसे खूप सामान आपल्या पाठीवर वाहते तसेच बुर्रितोदेखील अनेक सामग्रीने बनतो, म्हणून त्याला हे नाव प्रदान करण्यात आले. बुर्रितो हे वेगवेगळ्या मिक्स पिठांच्या पोळीबरोबर निरनिराळ्या सामग्रीने बनते. बुर्रितो हे पोळीच्या गुंडाळीसारखे असते आणि त्यामुळे ते खाणे सोप्पे पडते. टाकोजपेक्षा ही पोळी आतील सारणासकट गुंडाळलेली असते. बुर्रितोसाठी वापरण्यात येणारी पोळी ही हलकीशी भाजलेली आणि मऊ असते. त्यामुळे आतील सारणाची सहजरीत्या गुंडाळी होऊ शकते आणि अशा पद्धतीने एक व्रॅप तयार होतो. तसेच ओलसर बुर्रितो हे सॉसयुक्त असल्याने तो खाताना फॉइल पेपरच्या मदतीने खाल्ला जातो. मेक्सिकोमध्ये व्रॅप साधारणत: कडधान्य किंवा मांसमिश्रित सारणापासून बनवले जाते
अमेरिकेत बुर्रितोसाठी अधिक साहित्याचा वापर केला जातो, उदा. पालकयुक्त भात, साधा भात, उकडलेले कडधान्य, अवाकाडो सॉस, कांदा-टोमॅटोपासून बनवलेला सॉस, चीज, आंबट सॉस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. अमेरिकेत बुर्रितो हा वेगवेगळ्या आकारांत आणि चवींत मिळतो. बुर्रितो हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींचे आहेत. जसे मेक्सिकोत बुर्रितो हे लहान व पातळ असतात आणि त्यात मोजून एक किंवा दोन सामग्रींचा समावेश असतो. अनेकदा मांस, मासे किंवा बटाटय़ाचा भात असतो. सॅनफ्रान्सिस्कोत मिशन बुर्रितो मिळते. हे बुर्रितो मोठय़ा आकाराच्या वेगवेगळ्या पिठांपासून बनलेल्या पोळीचे असते, ज्यात सारणाचे प्रमाण अधिक असते. याला अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळतात. सारणात बैलाचे मांस, मेक्सिकन पद्धतीचा भात, कडधान्ये, आंबट सॉस आणि कांदा असतो. ब्रेकफास्ट बुर्रितो ही अमेरिकेतील न्याहारीची पद्धत आहे. यात न्याहारीचे पदार्थ पोळीत एकत्र करतात, मुख्यत: स्क्रम्बल्ड एग.
पिटा हा व्रॅपचा अजून एक प्रकार आहे. जो मध्य आणि मध्यपूर्व देशात सापडतो. पिटा हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला यीस्टयुक्त गोल सपाट ब्रेड आहे. ब्रेडच्यादेखील वेगवेगळ्या पद्धती आहेत. ज्यात पापुद्रायुक्त पिटा ब्रेड आणि पापुद्रा नसलेला पिटा ब्रेड यांचा समावेश आहे. पिटा ब्रेड हा प्रागैतिहासिक काळापासून मध्यपूर्व भागात सापडतो. पिटाचा वापर आपण चटणी किंवा सॉसमध्ये बुडवून खाण्यासाठी करू शकतो. हुमस (जाड पेस्ट), कबाब किंवा ग्यारेस किंवा फलाफल गुंडाळायलादेखील त्याचा उपयोग होतो.
व्रॅपची भारतीय आवृत्ती ही जगभरातील प्रसिद्ध काठी रोलमध्ये दिसते. काठी रोल हे कोलकात्यातील रस्त्यावर मिळणारे खाद्य आहे. मूळ स्वरूपात ते काठीला कबाब लावून भाजून त्याला पोळीत गुंडाळतात. व्रॅपला काठी रोल म्हणतात, कारण स्टिक या शब्दाला बंगालीत काठी म्हणतात. काठी रोलमध्ये कोथिंबिरीची चटणी, अंडं, कोंबडीचे मांस असते, पण आता वेगवेगळ्या प्रकारे हे उपलब्ध आहे. पारंपरिकरीत्या काठी रोल म्हणजेच काठी कबाब जो पराठय़ात शिजवलेला असतो. अर्धा शिजवलेला पराठा पुन्हा एकदा तव्यावर टाकतात आणि पुन्हा पूर्ण शिजवतात. त्यात अंडं टाकायचे असेल तर तव्यावर अंडं फोडून त्यावरच पराठा ठेवतात, जेणेकरून अंड आणि पराठा एकत्रच शिजून पराठय़ावर अंडय़ाचा थर तयार होतो. काठी कबाब हे मूळ बैलाच्या मांसात मिळत होते, परंतु आता त्यात कोंबडी, बदकाचे मांस किंवा मटण जे मसाल्यात भिजवून ठेवले असते आणि कोळशाच्या शेगडीवर काठीला लावून शिजवले जाते. जेव्हा रोल तयार केले जातात तेव्हा ते काठीतून काढून घेतात आणि तव्यावर असलेल्या पराठय़ाच्या मध्यभागी ठेवून कांदा, मिरची किंवा अन्य चटण्या लावल्या जातात. (आवश्यकता असल्यास अंडं असलेल्या बाजूवर वरील कृती करतात.)अनेक रोल विक्रेते या टप्प्यावर विविध प्रकारचे सॉस, व्हिनेगर वापरतात किंवा लिंबू पिळतात कधी कधी चाट मसाला भुरभुरतात. या टप्प्यानंतर हे सगळे गुंडाळले जाते. सुरुवातीला जुन्या वर्तमानपत्रात हे गुंडाळून दिले जायचे, परंतु आता स्वच्छ कागद वापरले जातात. कोलकात्यात फक्त अर्धा रोलच कागदात गुंडाळला जातो. इतरत्र अधिक किंवा संपूर्ण रोल गुंडाळून देतात.
देशभरातील भारतीय रेस्टॉरंट्सच्या मेनूवर काठी रोल प्रवेश करतो आहे. पायल साहा यांनी ‘काठी रोल’ ही कंपनी काढली. ही कंपनी न्यू यॉर्क शहरात आहे. यू.एस.मध्ये काठी रोल विकणारे हे पहिले रेस्टॉरंट आहे. २०१४ च्या उन्हाळ्यात एका उद्योजकाने भारतीय खाद्यपदार्थ विकणारा फूड ट्रक सुरू केला. त्या ट्रकचे नाव ‘रोल ओके प्लीज’ असे होते. हा ट्रक सियाटल, बेलेव्यु आणि रेमंड या क्षेत्रांत फिरून खाद्यपदार्थ विकत असे.
ब्रेकफास्ट बुर्रितोची पाककृती
- साहित्य- २ लहान तिखट सॉसेज, मीठ, मिरे, ४ लहान पिवळे बटाटे, ४ अंडी, १/३ कप किसलेले चेडर चीज अधिक १/३ कप सजावटीसाठी, दुधाचा शिपका, १ लहान चमचा तेल, कजून मसाला, २ पोळ्या, गरजेनुसार तिखट सालसा.
- कृती – पाकिटातून सॉसेज काढून तव्यावर माध्यम आचेवर शिजत ठेवा. चमच्याने सॉसेजचे तुकडे करा. जसे शिजतील तसे त्याचे बारीक तुकडे करत जा. ८ ते १० मिनिटं शिजवल्यावर त्याला बाजूला ठेवा. सॉसेज शिजत असताना दुसरीकडे लहान भांडय़ात मिठाचे पाणी घ्या व उकळत ठेवा. त्यात बटाटे टाका आणि काटय़ाने तुटतील इतके शिजवा. (अर्धेकच्चे असतील तरी चिंतेचे कारण नाही. ते पुन्हा तव्यावर शिजवताना कुरकुरीत होतील.) १० ते १५ मिनिटे उकळवा. नंतर गार पाण्याखाली धरा. पाणी निथळून घ्या व बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. एका लहान भांडय़ात अंडी आणि १/३ कप किसलेले चेडर चीज एकत्र करा. त्याला दुधाचा शिपका द्या. मीठ-मिरपूड टाकून एकत्र करा. ५ ते ७ मिनिटे मध्यम ते कमी आचेवर स्क्रम्बल्ड एग बनवून घ्या. जेव्हा अंडी शिजवत असाल तेव्हाच मध्यम आचेवर अजून एक तवा ठेवा. त्यात बटाटे, थोडा कजून मसाला टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत ठेवा. आता हे सगळे मिश्रण एकत्र आणण्याची वेळ आली आहे. अंडय़ाला समांतर भागात दोन पोळ्यांमध्ये पसरावा. दोन्ही पोळ्यांमध्ये बारीक चिरलेले सॉसेज आणि बटाटा टाका. उरलेले चीज समांतर भागात भुरभुरा. सालसाचा पातळ थर त्यावर ओता. सव्र्ह करण्यासाठी ती पोळी योग्य पद्धतीने गुंडाळा. एका गोष्टीची काळजी घ्या. हे करताना काम पूर्ण होईपर्यंत आपण रोल खाली ठेवायचा नाही.
काठी रोल – तयार करण्यासाठी लागणारा वेळ:- २६ ते ३० मिनिटे
- साहित्य : ४ पोळ्या, १ मध्यम कांदा, १ मध्यम भोपळी मिरची, १ मध्यम चिरलेला टोमॅटो, १ चमचा हळद, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २-३ मोठे चमचे टोमॅटो प्युरी, १ कप पनीर, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, २ चमचे कोथिंबीर पुदिना चटणी, १/४ कप दही, ताजी पुदिन्याची पाने सव्र्ह करण्यासाठी, कांद्याच्या चकत्या, चाट मसाला.
- कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. कांदा चिरून त्यात टाका. भोपळी मिरची चिरा. तव्यावर टोमॅटो, हळद, आलं-लसूण पेस्ट घालून चांगले एकत्र करा आणि २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. त्यात टोमॅटो प्युरी घालून एक मिनिट मोठय़ा आचेवर शिजवा. तव्यामध्ये भोपळी मिरची, पनीर, तिखट, मीठ, गरम मसाला घालून ते एकजीव करा. भाज्या शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवा. पोळी ओटय़ावर ठेवा. कोथिंबीर व पुदिन्याची चटणी दह्य़ासोबत एकत्र करा आणि चमच्याने सारखी पसरवा. पोळीच्या एका बाजूला भाजीचे तयार सारण पसरावा. त्यावर पुदिन्याची पाने, कांद्याच्या चकत्या आणि चाट मसाला टाका. पोळी घट्ट गुंडाळा. उर्वरित काठी रोल असेच तयार करा. मधोमध कापा व लगेच सव्र्ह करा.
viva@expressindia.com