vn26तुम्ही डाएटिंग करत असाल तर तुम्हाला आवडत असो वा नसो, सॅलड खाल्लंच पाहिजे, हा एक अलिखित नियम बनला आहे,
पण सॅॅलड आवडत नाही, त्यांनी काय करायचं?
गेल्या लेखात सांगितलेले पंधरा दिवसांत ४ किलो घटवण्याचं आव्हान मनावर घेतलं असेलच. अशा प्रकारे वजन घडवण्यासाठीच नाही तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य, समतोल डाएट घ्यायलाच लागेल. तुम्ही जर डाएटिंग करत असाल तर तुम्हाला आवडत असो वा नसो, तुम्ही सॅलड खाल्लंच पाहिजे, हा दीर्घकाळापासून एक अलिखित नियम बनला आहे. सॅलड सगळ्यांनाच आवडतं असं नाही. परंतु, सॅलड पसंत न करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे, बळजबरीने सॅलड खाण्याऐवजी तुम्हाला रुचेल अशा चवीचे पदार्थ करून तुम्ही खाऊ  शकता. अगदी सॅलडचाच इफेक्ट त्यातून मिळेल आणि चवसुद्धा चांगली असेल.
मुळात डाएटवर असणाऱ्यांना सॅलड का खायला सांगतात? कमी कॅलरीज आणि पोषणमूल्ये अधिक मिळावीत म्हणून, फायबर मिळावं म्हणून. अधिकाधिक फायबर (तंतुजन्य पदार्थ) खाण्यास डाएट खाणारे प्रवृत्त व्हावेत यासाठीचा हा सल्ला आहे. बकव्हीट, ओट्स, बार्ली, नाचणी, राजगिरा, ज्वारी, बाजरी, गहू, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं आणि फळं यामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळतात. पण हे खाद्यपदार्थ प्रकृतीने उष्ण असतात. मसाला रोटी, पराठा, सूप आणि भाज्या, फळ्यांच्या स्मूदीज बनवताना त्यांचा वापर करता येऊ शकतो.
सॅलडला पर्याय
फायबर खाण्याचे इतर मार्ग म्हणजे ओट्स डोसा/नाचणी डोसा/ज्वारी/गहू डोसा, अनेक धान्यांपासून बनवलेला (मल्टिग्रेन) पराठा किंवा थालीपीठ. हे पदार्थ सहज बनवता येण्यासारखे आहेत. सकाळच्या नाश्त्याला भाज्यांसह ओट्स किंवा डाळींचा उपमा, फळं आणि भाज्यांपासून बनवलेल्या स्मूदीज बनवल्या तर तोंडाला नक्कीच चव येईल. टोमॅटो, गाजर आणि माठ वापरून सूप करता येईल. मोडाचे मूग आणि पनीर, तसंच कलिंगड आणि तीळ यांचा सॅलड म्हणून वापर करता येईल. व्होल व्हीट सँडविच सोबत ओट्स भाज्यांची टिक्की, ओट्स सूप आणि भाज्या, टोफू, मूगडाळ छिल्का (सालाची मूगडाळ) आणि पनीर भुर्जी, डाळ पराठा आणि गहू किंवा रागीच्या चपाती- भाकरीसोबत भाज्या आणि अंडय़ाचा पांढरा भाग हे पर्याय उपलब्ध आहेत.
आरोग्यदायी पर्याय एखाद्याने निवडण्यासाठी भूक वाढविणारे आणि रुचकर पदार्थाच्या रेसिपी तयार करण्याकडे कल असला पाहिजे. जर एखाद्याला सॅलड आवडतच नसेल तर त्याला ते खाण्यासाठी जबरदस्ती करणे योग्य नाही. सॅलडमध्ये व्हिनेगर, ऑलिव्ह तेल, मोहरी, लाल मिरचीचा सॉस आणि मसाल्यांचे फ्लेवर यांच्यासोबतीनेच तुळस, पार्सले, ओरेगानो (किंवा ओव्याची पानं) आणि पुदिना टाकूनही त्याला चवदार करता येतं. तसंच अक्रोड आणि बदाम यांच्यासह तीळ, सूर्यफुलाच्या बिया, कलिंगड, सब्जा आणि जवसही वापरता येऊ  शकतात.
काकडी, गाजर, टोमॅटो यासह ब्रोकोली, लेटय़ूससारखं सॅलड एकत्र करून त्यामध्ये पुदिन्याची पानं घालून ब्लेंडरमध्ये स्मूदी तयार करू शकाल. तुमच्या आवडीचे स्पायसेस, ड्रेसिंग वापरून तुम्ही ही स्मूदी चवदार बनवू शकाल. तुमचे खाद्यपदार्थ तुम्हीच तयार केले तर त्यात रसही टिकून राहील आणि तो खाण्याचा उत्साहसुद्धा.
जान्हवी चितलिया -viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट असून वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)

Story img Loader