ढोलकी, दिमडी, पखवाज, संबळ, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी.. महाराष्ट्राच्या मातीतली ही वाद्यं.. इथल्या लोकसंगीतात वापरली जाणारी. केवळ आपल्या मातीतली ही वाद्यंच नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतांत वाजवली जाणारी पारंपरिक वाद्यं जमवून ती वाजवणारा एक तरुण अवलिया ‘फोक्स वॅगन’ या एका आगळ्या प्रकल्पासाठी झपाटून काम करतोय. ‘महाराष्ट्र दिनी’ या मराठमोळ्या तरुण कलावंताच्या संगीत सफरीची गोष्ट.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुगल’च्या जमान्यातही त्याच्याकडे असलेल्या खजिन्याची माहिती कितीही वेगवेगळ्या प्रकारे सर्च करा, ती कुठेच सापडत नाही. कारण त्याच्याकडचा खजिना अद्याप अनेकांसाठी एक नवलाईच आहे. एक-दोन-पाच नव्हे तर तब्बल ३० हून अधिक पारंपरिक वाद्यांचा संग्रह आणि ती वाजवण्याची कला. गेल्या चार-पाच वर्षांत भारताच्या कानाकोपऱ्यात फिरून जमा केलेली ही वाद्ये एकत्रितपणे पाहायला मिळणं आणि ती ज्या पद्धतीने वाजवली जातात तशी त्याच्याकडून ऐकायला मिळणं ही सामान्य कानसेनासाठीच नव्हे तर कुणा दिग्गज संगीतप्रेमीसाठीही पर्वणीच ठरावी. मधुर पडवळ हा पंचविशीतला मराठमोळा तरुण, पण लोकसंगीतामधल्या वाद्यांचा वापर करून तो जे काही करतोय किंवा करण्याची त्याची इच्छा आहे ते भन्नाटच म्हणावं लागेल.
घरात संगीताची कुठलीही पाश्र्वभूमी नसताना आणि स्वत:देखील दहावीच्या सुट्टीत आवड म्हणून गिटार शिकायला सुरुवात केल्यानंतरचा मधुरचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. रमेश अय्यर हे त्याचे संगीतातले गुरू. त्यांच्याकडे त्याने गिटार शिकायला सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांपासून मधुर एका वेगळ्या संकल्पनेवर काम करत आहे, ती म्हणजे ‘फोक्स वॅगन’ (folk’s wagon. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून तेथील पारंपरिक वाद्ये स्थानिक कलाकारांकडून शिकून घेणं, ती त्यांच्याकडून विकत घेणं आणि इथे मुंबईत येऊन त्यांची सांगड घालून लोकांना त्या संगीताचा आनंद देणं.
‘फोक्स वॅगन’ ही एक अविरत वृद्धिंगत होणारी संकल्पना असली तरी त्याच नावाने वेगवेगळ्या मित्रांच्या सहभागाने ती म्युझिक बँड म्हणूनही सादर होते. तेव्हा पारंपरिक संगीताच्या या वॅगनमध्ये बसवून तो अख्ख्या भारताची सफर घडवून आणतो. मधुरकडे खडताल, रावणहत्ता (राजस्थान), बाऊल, दुतारा, खमूक, एकतारा (पश्चिम बंगाल), बगलबच्चा (मध्य आणि उत्तर प्रदेश), रिवाना (हिमाचल प्रदेश), भपंग, तुंबी (पंजाब), नगाडा, ढोलक (हरियाणा), उत्तरांचल, रबाब (जम्मू काश्मीर), कुटुली, गोगना, बिहुढोल (आसाम),  मेघालयचा दुतारा ही वाद्ये संग्रही आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रात वाजवली जाणारी ढोलकी, दिमडी, पखवाज, संबळ, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी ही वाद्ये आणि दक्षिण भारतात वाजवली जाणारी घट्टम, मृदुंग, गंजिरा, चेंडा, उरूक्कई ही वाद्ये ही तो ‘फोक्स वॅगन’मध्ये वापरतो. याव्यतिरिक्त जवळपास बाराहून अधिक गिटार त्याच्याकडे आहेत.
संगीत शिकायला लागल्यापासून संगीताला कोणतीही भाषा नसते हे मधुरच्या लक्षात आलं. संगीताने संपूर्ण जगाला एका सुरात बांधून ठेवलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात खूप मान आहे. पण पारंपरिक संगीताला अद्याप योग्य ओळख मिळालेली नाही. त्यामुळे ‘फोक्स वॅगन’च्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या वाद्यांचा, संगीताचा शोध घेणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं ध्येय आहे.
कुठलीही कला अर्धवट सादर करणं चुकीचं आहे. तो कलेचा अपमान आहे, हा मधुरचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्यामुळे देशात कुठेही वाद्याच्या शोधात गेल्यावर तिथली केवळ वाद्ये न शिकता, त्या वाद्यांवर वाजवली जाणारी गाणी आणि त्या गाण्यांमागचा अर्थ समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कुठलाही कलाकार हा लहान नसतो. त्यामुळे  ‘फोक्स वॅगन’च्या प्रयोगाच्या वेळीही क्वायरमध्ये गाणारा आणि टाळ वाजवणारा कलाकारही त्याच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक कलाकाराला दुसऱ्या कलाकाराबद्दल आदर असला पाहिजे, हा त्याचा आग्रह.
रुईया महाविद्यालयामध्ये शिकत असल्यापासून मंदार पिलवलकर, नितीश रणदिवे आणि आता नव्याने ओळख झालेला आदिनाथ पातकर हे त्याचे जवळचे मित्र. ‘फोक्स वॅगन’ही संकल्पना उचलून धरण्यात त्यांचाही खूप हातभार आहे.
मुंबई विद्यापीठात अलीकडेच पार पडलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी त्यांनी भारतातून आणलेली ही सारी वाद्ये तिथे सादर केली. मधुरने एम टीव्ही, झी मराठी या चॅनेलसाठी काम केलं आहे. तर अलीकडे ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे. आगामी ‘ब्लॅकबोर्ड’ या चित्रपटाचं म्युझिक अरेंजमेंट केलं आहे. एवढंच नव्हे, तर सध्या तो सुभाष घईंच्या व्हिसिलग वूड्स इन्स्टिटय़ूटच्या चार लघुपटांचं बॅकग्राउंड स्कोरिंगचंही काम करतोय.
संगीत हे केवळ पशासाठी न करता स्वत:च्या समाधानासाठी व हे पारंपरिक संगीत जिवंत राहावं यासाठी करतो. तो केवळ म्युझिशियन नाही तर एक चांगला इलस्ट्रेटर आणि एक उत्तम टॅटय़ू आर्टिस्टही आहे आणि ते त्याचं पसे कमावण्याचं साधनही. तो एक सच्चा कलाकार आहे, हे त्याला भेटल्यावर त्याच्या हातावर असलेले टॅटय़ू आणि घरात प्रवेश केल्यावर हॉलमध्ये सचिन तेंडुलकरला भेट देण्यासाठी तयार केलेलं त्याचं इलस्ट्रेशन याची खात्री पटवून देतात.

भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या वाद्यांचा, संगीताचा शोध घेणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे ‘फोक्स वॅगन’चं ध्येय आहे.
– मधुर
प्रशांत ननावरे -viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young marathi singers music tour on maharashtra day