श्रुती कदम

पर्यटन म्हटलं की बीच, निसर्गरम्य प्रदेश, सागरी वा साहसी खेळ किंवा बर्फाळ प्रदेशातील भटकंती हे तरुणाईचे आवडते पर्याय होते. मात्र गेल्या एक-दोन वर्षांत धार्मिक स्थळांना वा पौराणिक संदर्भ असलेल्या ठिकाणांना भेट देण्याचे तरुण पिढीचे प्रमाण वाढते आहे. अगदी २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळयाला जाण्यासाठी तयारीत असलेल्या तरुणाईची संख्याही अधिक आहे.

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारत देशाला धार्मिक महत्त्व लाभलेलं आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत धार्मिक मंदिरं तसंच पर्यटनस्थळं मोठया प्रमाणात आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी देशभरातूनच नाही परदेशातूनही पर्यटक मोठया प्रमाणात येतात. पण विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या धार्मिक पर्यटन स्थळांवर तरुण पिढी मोठया प्रमाणात गर्दी करताना दिसते आहे. धार्मिक पर्यटनांमध्ये चार धाम, पंच केदार, बारा ज्योतिर्लिग, एकावन्न शक्तिपीठ, वैष्णवदेवी, गंगा, यमुना, सरस्वती, प्रयाग, कुंभ, महाकुंभ, ब्रज, द्वारका, कुरुक्षेत्र, ब्रजची होळी, अयोध्या, चित्रकूट, रामेश्वरम, पुष्कर, तिरुपती, विरुपाक्ष यांसारख्या अनेक स्थळांचा समावेश होतो. प्रत्येक धार्मिक स्थळांची वेगळी कथा असते आणि ही कथा प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. मात्र एरव्ही ट्रेकिंग, भटकंती, सेल्फी यात रमणाऱ्या तरुणाईचा एकंदरीतच या पर्यटनस्थळांकडे वाढता कल हा नवल वाटायला लावणारा आहे. अगदी अयोध्येतील राम मंदिराला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर भेट देण्यासाठीही तरुणाई आसुसलेली आहे.

हेही वाचा >>> काळी फॅशन!

सध्या या धार्मिक स्थळांचे आकर्षण तरुण पिढीमध्ये मोठ्य़ा प्रमाणात पाहायला मिळते आहे. हे आकर्षण इतर अनेक गोष्टींप्रमाणे सोशल मीडियामुळे वाढते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या धार्मिक स्थळांचा प्रचार अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक जण या स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आपल्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती देतात. फोटो, व्हिडीओ, ब्लॉग, व्लॉग अशा विविध माध्यमांतून त्या त्या स्थळाची महती इतरांपर्यंतही पोहोचते. तसंच नवलेखकांच्या माध्यमातूनदेखील या ठिकाणांचे आकर्षण या तरुण पिढीमध्ये निर्माण होऊ लागते. त्यामुळेच बहुतांशी वेळा या धार्मिक स्थळांबरोबरच तेथील संस्कृती, पेहराव, खाद्यसंस्कृती, कला, बोलीभाषा या सगळयाचा आस्वाद घेण्यासाठी तरुण पिढीमध्ये  तिथे जाण्याचे बेत रंगू लागतात.

देवदर्शन वा धार्मिक स्थळांच्या भेटी म्हणजे चाळिशीनंतर करायची गोष्ट हा समजच या तरुण पिढीने मोडून काढला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते नोकरी करणाऱ्या तरुणांपर्यंत सगळयांचीच येथे गर्दी पाहायला मिळते आहे. अनेक तरुण सोलो ट्रिपसाठीही धार्मिक स्थळांची निवड करताना दिसतात. रोजची धावपळ, आणि कामाच्या ठिकाणी, अवतीभवती असलेल्या तणावाच्या वातावरणातून बाहेर पडून मानसिक शांतता मिळवण्यासाठी या धार्मिक स्थळांची निवड केली जाते. धार्मिक परिसरात येऊन ताण दूर होतात आणि नवीन जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, असं या तरुणाईचं म्हणणं आहे.

दिल्लीचा आशीष वर्मा हा एक सोलो ट्रॅव्हलर आहे. आशीष दिल्लीहून निघून शंभर दिवस प्रवास करणार आहे. त्याच्या या प्रवासाचं वैशिष्टय म्हणजे तो या प्रवासात सगळया धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. त्याने त्याच्या प्रवासाची सुरुवातही थोडी वेगळया पद्धतीने केली आहे. त्याने आधी दिल्लीवरून तिरुअनंतपूरम गाठले. आणि तिथून त्याने उलटा प्रवास सुरू केला आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘मला लहानपणापासूनच फिरण्याची खूप आवड आहे. मी एक एडिटर आहे. माझ्या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती वाराणसीला  भेट दिल्यापासून.. वाराणसी हे जगातील काही जुन्या शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. इथे भारतीय संस्कृती फार जवळून अनुभवता येते. आणि वाराणसीमध्ये फिरत असतानाच मला ‘१०० दिवस आझादी’ या नावाने सोलो ट्रिप करण्याची कल्पना सुचली आणि तेव्हाच मी हा प्रवासाचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला होता’. या संपूर्ण ट्रिपमध्ये तो आपल्या देशातील एकूण एक धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. प्रवासाची आवड असणं आणि अशा अनोख्या पद्धतीने धार्मिक स्थळांना भेट देत प्रवास करण्याची मिळालेली संधी हा अनुभवच वेगळा असल्याचेही आशीषने सांगितले.

लवकरच अयोध्येतील राम मंदिराचेदेखील लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने अनेक तरुण पर्यटनासाठी म्हणून अयोध्येला जाण्याचे बेत आखत आहेत. गेल्या १० वर्षांपेक्षा या २ – ३ वर्षांत संपूर्ण देशातून तरुण पिढी मोठया प्रमाणात अयोध्या, वाराणसी, प्रयागराज अशा धार्मिक ठिकाणी पर्यटनासाठी येत असल्याचे तेथे लोकल गाइड म्हणून काम करणाऱ्या विकी तिवारी याने सांगितलं. याबद्दल बोलताना विकी पुढे म्हणाला, ‘मी १७ वर्षांपासून टूर गाइडचे काम करतो आहे. पूर्वी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांमध्ये चाळिशी ओलांडलेले भाविक जास्त दिसायचे.  किंवा अनेकदा संपूर्ण परिवारासोबत इथे येण्याचे बेत अधिक ठरत असत. पण हल्ली या दोन वर्षांमध्ये तरुण पिढी आपल्या मित्रपरिवारासोबत इथे अधिक येताना दिसते. इथे येतानाही ५ ते ६ दिवसांचा फिरण्याचा बेत आखूनच ही मंडळी येतात. त्यातही तरुणाईला विशेषत: गंगा आरती आणि अयोध्या दर्शन करायचं असतं. या तरुण पिढीची धार्मिक स्थळांवरची गर्दी वाढली असल्यानेच या शहरातील अनेक मुलांना विविध पद्धतीच्या रोजगाराच्या संधीदेखील उपल्बध झाल्या आहेत, असेही विकी तिवारी याने सांगितले. 

‘२०२३ च्या डिसेंबर महिन्यात मी आणि माझे मित्र आम्ही ५ दिवसांसाठी वाराणसीला जाऊन आलो. गेलं वर्षभर आम्ही वाराणसीला जाण्यासाठी बेत आखत होतो, त्यासाठीची तयारी करत होतो’ असं मुंबईतील खारघर येथे राहणारी तरुणी प्राची रावडे हिने सांगितलं. प्राची व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर असून अगदी महिन्याभरापूर्वी ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वाराणसीला फिरून आली. वाराणसी शिवाय ती प्रयागराज आणि अयोध्येलाही फिरून आली आहे. ‘हल्ली विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे अयोध्या-वाराणसीसारख्या ठिकाणांचे वर्णन केले जाते. ते पाहिल्यावर आणि ऐकल्यावर इथे येण्याचा मोह कोणालाही आवरता येणार नाही असाच आहे’ असं सांगतानाच विविध पुस्तकांमुळेही या पर्यटनस्थळांविषयी आकर्षण वाढत असल्याकडेही तिने लक्ष वेधलं. हल्ली अनेक तरुण लेखक पुस्तकं आणि ब्लॉगच्या माध्यमांतून या धार्मिक ठिकाणांविषयी लेखन करतात. मंदिरं, त्यांच्या निर्मितीची कथा, त्या त्या मंदिरामागे सांगितली जाणारी आख्यायिका, पौराणिक संदर्भ अशा कितीतरी गोष्टींचं वर्णन या पुस्तकांमधून, ब्लॉगमधून वाचायला मिळतं. अशा ठिकाणांचं वर्णन वाचून तेथे आवर्जून यावंसं वाटतं, असं प्राची सांगते.

एवढंच नाही तर प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर तेथील लोकांचा साधेपणा, त्यांची आत्मीयता, देवावरची त्यांची श्रद्धा या सगळयाच गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडतो. त्यामुळे अशा धार्मिक शहरांमध्ये आल्यानंतर बऱ्याचदा प्रसन्न आणि शांत वाटतं. हाच अनुभव घेण्यासाठी तरुणाई या धार्मिक स्थळांची पर्यटनवारी करते असं तरुणाईशी बोलल्यावर लक्षात येतं. अयोध्येतील राममंदिराविषयी तर गेल्या वर्षभरात जोरदार चर्चा सुरू असल्याने आतापावेतो अनेक तरुण मंडळी अयोध्येत फिरून आली असतील आणि येत्या काही महिन्यांत तिथे जाणाऱ्या तरुणाईचा टक्काही वाढलेला असेल यात शंका नाही. धार्मिक पर्यटनाचा हा सिलसिला आता अधिकाधिक ‘तरुण’ होत राहणार असं पर्यटन व्यावसायिकांचंही म्हणणं आहे. viva@expressindia.com