नीलेश अडसूळ
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित केला जाणारा ‘पु. ल. कला महोत्सव’ नुकताच पार पडला. या महोत्सवात होणाऱ्या नाना कलांच्या सादरीकरणाचे वेध मुंबईकरांना लागतेच, पण यंदा महोत्सवाचे आकर्षण बिंदू ठरले ते राज्यभरातून आलेले तरुण कलाकार. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या या तरुणांनी आपल्या कलेच्या सादरीकरणाने महोत्सवातील वातावरण अक्षरश: ‘पुलकित’ केले. प्रशासनाने तरुणांना दिलेली संधी महत्त्वाची आहेच, पण त्या संधीचे सोने करत प्रेक्षकांना भुरळ घालण्याची जबाबदारी या तरुण कलाकारांनी लीलया पेलली हे विशेष..
महोत्सवाची सुरुवात कोल्हापूरच्या ऋषिकेश देशमाने या तरुणाने केली. ‘महाराष्ट्राची लोकवाद्ये’ अशी संकल्पना घेऊन त्याचे माहितीपूर्ण सादरीकरण त्याने केले. यलम्मा देवीसाठी वाजवले जाणारे चौंडके आणि मानदेशातील हलगी – घुमकं या वाद्यांच्या नादाने रवींद्र नाटय़मंदिराचे कलांगण दुमदुमले होते. ‘पु. ल. महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातील कलाकारांना जाणकार प्रेक्षकांसमोर येता येते. मुळात आपल्याकडे लोकगीतांना कायम महत्त्व दिले जाते, पण त्यातला ‘ताल’ दुर्लक्षित राहतो. त्यामुळे तालाचे महत्व पटवून देण्याचे काम आम्ही या माध्यमातून केले आहे. पुढे या संकल्पनेवर अभ्यास करून अधिक मोठा कार्यक्रम तयार करणार आहे,’ असे ऋषिकेश याने सांगितले.
वाईच्या अमित शिंदे या तरुणाने ‘करपल्लवी गोंधळ’ सादर करून गोंधळातील ‘करपल्लवी’ हा प्राचीन प्रकार प्रेक्षकांसमोर आणला. ‘करपल्लवी गोंधळ’ हा शिवकाळात सादर केला जायचा. देवीचा गोंधळ घालून हातांच्या बोटाद्वारे संवाद साधत शत्रूविषयी माहिती दिली जायची. महोत्सवात त्यांनी बोटांच्या साहाय्याने उपस्थितांची नावे ओळखण्याचे सादरीकरण केले.
‘मी लोककला आकादमीचा विद्यार्थी असून घरातून चालत आलेल्या वारशाला अभ्यासाची जोड देतो आहे. सांस्कृतिक खात्यातील अनेक मान्यवरांना हा प्रकार नवीन असल्याने त्यांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे आमची कला पाहून काही अधिकाऱ्यांनी पुढेही संधी देण्याचे आश्वासन दिले. ही दाद आमच्यासाठी अविस्मरणीय आहे, असे अमित म्हणाला.
हल्ली जात्यावर दळण करायची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. तरी पूर्वीच्या स्त्रिया दळण कांडण करताना ओव्या म्हणत असत हे तर प्रत्येकालाच ठाऊक आहे. या ओव्यांमध्ये सासू सुनेचे भांडण, भाऊ बहिणीचे प्रेम, माहेरची आठवण, नवऱ्याचे कौतुक, मुलांची माया असे कौटुंबिक विषय बांधले जात. याच लोप पावत चाललेल्या कलेला मीरा भालेराव या तरुणीने जतन केले आहे. तिच्या महोत्सवातील सादरीकरणाने अनेकांना गावाकडचे दिवस आठवले. तर अनिल केंगार या माळशिरसमधील तरुणाने भारूड सादर केले.
ठाण्यात निधी प्रभू हिने शास्त्रीय नृत्याची मैफल रंगवली. यावेळी अतुल फडके, श्रीरंग टेंबे, रोहित देव, प्रसाद रहाणे या तरुण वादकांनी साथसंगत केली. ‘दास्तांगोई’ हा उर्दू कलाप्रकार मराठीत आणून त्याला ‘मुंबई या विषयाचे कोंदण चढवण्याचे काम अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी केले आहे. ‘दास्ताँ ए बडी बांका’ ही मुंबईच्या सुख दु:खांचे वर्णन करणारी दास्तांगोई त्यांनी या महोत्सवात सादर केली. मराठीत झालेल्या या अभिनव प्रयोगाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तसेच प्रेक्षकांकडून पुढील प्रयोगांची मागणी झाल्याचा सकारात्मक प्रतिसाद या कलाकारांना मिळाला.
वासुदेव, पोवाडा, गोंधळ, भारूड अशा लोककला कायम पुरुषांकडून सादर होताना आपण पाहतो. पण मुलीही त्याचे उत्तम सादरीकरण करू शकतात याचा दाखला औरंगाबाद येथील शुभांगी जाधव हिने दिला. तिच्यासह आलेल्या सातजणींनी मिळून महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण केले. या सर्व मुली शिक्षण घेत असून लोककलेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन महोत्सवात घडवले. या चोवीस कलाकारांनी ढोल, कच्छी, पेपरे, सुरनई नाल, खुळखुळे अशी पारंपरिक वाद्ये, ढेमसा, चंडकाई, पेरसापेन, सत्तीक आणि जामगडी असे नृत्य प्रकार तर गोंडी गीत गायन केले. ‘आमच्यापैकी काही मुले शिक्षण घेत आहेत तर काही मोल मजुरी करून पोट भरत आहेत. मी स्वत: एका शाळेत शिक्षक असून आमची संस्कृती समाजापुढे आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे,’ असे या संघातील सुरेश वेलाते यांनी सांगितले.
तर महोत्सवाच्या सांगतेलाही तरुण कलाकारांनी बहर आणला. मुंबईच्या ‘अभंग रिपोस्ट’ या समूहाने अभंगाला नव्या बाजाचे संगीत देऊन एक आगळावेगळा आविष्कार सादर केला. याशिवाय अनेक तरुण कलाकार आणि त्यांचे संघ या महोत्सवात सामील झाले होते. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली. महोत्सवाचे सातही दिवस प्रेक्षकांनी पु. ल. महाराष्ट्र कला अकादमी संकुल गजबजले होते.
विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या संयोजनातही तरुणाई सामील झाली होती. पुलंचे रेखीव चित्र असलेले प्रवेशद्वार, नेत्रदीपक रोषणाई, भोवतालची सजावट आणि एकूण महोत्सवाचे संयोजन क्षितिजा गुप्ते आणि विनायक सैद यांच्या समूहाने केले होते. या संयोजनात त्यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे आजी- माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणाईने इतक्या मोठय़ा प्रमाणावर एकत्र येत कलासादरीकरणाचा केलेला हा प्रयत्न म्हणूनच लक्षणीय ठरला.
– viva@expressindia.com