या शतकातली पंचविशी म्हणजेच २०२५ या वर्षाची सुरुवात झाली आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड आठवणी अजूनही मनात रेंगाळत असतील, परंतु आयुष्यातल्या पंचविशीत जसा नवीन अध्याय सुरू होतो तसेच हे वर्षही काहींच्या आयुष्यात नवा अध्याय घेऊन आले आहे. तरुण वर्ग नवीन गोष्टी धाडसीपणे करण्यात मागे नाही. चांगली नोकरी ही आत्ताची गरज आहेच, परंतु सध्या एक नवा ट्रेंड तरुणांमध्ये दिसून येतो तो म्हणजे आपल्या गावात राहून तिथून एखादा चांगला व्यवसाय किंवा जमेल ती नोकरी करणे. यामागची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र शहराचे आकर्षण असले तरी आपले मूळ जिथे आहे तिथूनच अर्थार्जनाचे साधन मिळाले आणि तिथेच राहून आपल्याला काम करता आले तर यासारखे दुसरे सुख नाही, ही भावना सगळ्यांच्या मनात आहे.

गावाकडे राहायचे म्हणजे शेतीची तत्सम कामे करणे व साधं आमटी-भात करून खाणे, ही सर्वसाधारण समजूत, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गावाकडे अर्थार्जनाच्या संधी चांगल्यापैकी वाढल्या आहेत, मुळातच आता विविध क्षेत्रे विकसित झाली आहेत, त्यातच तरुण पिढीकडे प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता असल्याने त्यांच्या पद्धतीने ही क्षेत्रे कशी एक्सप्लोर करायची याचे ज्ञान आणि धाडसही त्यांच्याकडे आहे. असाच धाडसी विचार करून वेगळी जीवनशैली निवडणाऱ्या विक्रम होशिंग यांचे क्षेत्र कमालीचे वेगळे आहे. त्यांची डॉग बिहेविअर मॉडिफिकेशन फॅसिलिटी आहे, ज्यामध्ये ते पाळीव कुत्रे आणि त्यांचे मास्टर यांना कन्सल्टेशन देतात. पाळीव कुत्रे घेण्यापासून ते त्यांचे पालनपोषण करेपर्यंत काय करणे गरजेचे असते, या सगळ्याविषयी ते समुपदेशन करतात.

Bhoomiputras of Uran an industrial city paying lakhs for their employment
उरणचे भुमिपूत्र बेरोजगार, उद्योग नगरी उरणचे भूमिपुत्रांना हक्काच्या रोजगारासाठी मोजावे लागतात लाखो रुपये
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
Youth Congress, officials expelled, Nagpur,
नागपूर : युवक काँग्रेसमध्ये काय चाललंय? आणखी चार पदाधिकारी निष्कासित
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी

हेही वाचा : संकल्पांचे नवे धोरण

‘पुण्याच्या थोडंसं बाहेर मुळशीच्या जवळ आमची ही फॅसिलिटी होती, जिथे कुत्र्यांचं बोर्डिंगसुद्धा होतं. ज्या कुत्र्यांना कुठेच ठेवून घेत नाहीत, कारण ते फार आक्रमक असतात, चावरे असतात अशांना आम्ही ठेवून घ्यायचो. २०२१ नंतर आम्ही गोव्यात शहराच्या थोडं बाहेर राहून वाइल्डलाइफशी जोडलेले काम करतो आहोत. आधी डोमेस्टिक पातळीवर काम करत होतो, आता वाइल्डलाइफशी निगडित प्राण्यांसोबत जास्त काम करतो’ असे विक्रम सांगतात. आधी ‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ आणि त्या पद्धतीच्या अनेक संस्थांमध्ये ते प्रोजेक्ट बेसिसवर नोकरी करत होते, हळूहळू प्राण्यांशी निगडित मात्र स्वत:चं काहीतरी हवं या विचाराने त्यांच्या मनात घर केलं. त्यांच्या पत्नीचे मास्टर्स हे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि अॅनिमल वेल्फेअर अँड बिहेविअर या विषयात झाले असल्याने सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मात्र शहरापासून दूर राहून काम करण्याच्या या निर्णयाबद्दल बोलताना ते सांगतात, तुमची पॅशन आणि काम तुम्हाला एकत्र करायचे असेल तर थोडी जोखीम, थोडी तडजोड करावीच लागते परंतु अंती तुम्हाला जे मिळतं ते नक्कीच समाधानकारक असतं.

सध्या शहरातली धावपळ आणि थोडी अनिश्चित जीवनशैली सगळ्यांना आवडेलच असं नाही. काही तरुणांना थोडी स्थिरता, कुटुंब आणि चांगल्या दर्जाची जीवनशैली हवी असते. हर्षद तुळपुळे हा राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याने एमए (इकॉनॉमिक्स) आणि (सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस) या विषयात पीजी डिप्लोमा केला असून; २०१६ ते २०२० च्या कालावधीत मुंबई आणि पुणे येथे ४ वर्षे प्रसारमाध्यमात नोकरी केली. त्यानंतर पर्यावरणविषयक संस्थांसोबत काही प्रकल्पांमध्ये काम करायला सुरुवात केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा आपल्या गावी स्थायिक होण्याच्या निर्णयाबद्दल तो सांगतो, ‘पुन्हा इथे येण्यासाठी माझी २-३ कारणे होती. एक तर आपल्याकडे चांगला कॉम्प्युटर असेल तर हव्या त्या ठिकाणी राहून चांगले काम करता येते. तसेच माझे आई-बाबा दोघंच इथे असतात. मी एकुलता एक असल्याने त्यांच्यासोबत राहणे मला गरजेचे वाटू लागले. फक्त नोकरीसाठी शहरात राहायचे, तिथे राहायला जागा, त्यासाठी भाडे, चांगली नोकरी, प्रदूषणयुक्त प्रवास, त्यातूनही आपले असे कोणी जवळ नसते, आपल्या सोबतचे सहकारी फक्त कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या वेळीच आपल्याला भेटतात. त्याऐवजी आपल्या आवडीच्या ठिकाणी राहून काम केले तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होते, असेही मला वाटले. म्हणूनच गेली ४ वर्षे मी गावात राहून प्रोजेक्ट बेस्ड काम करतो आहे. यात आयआयटी मुंबई संस्थेच्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पामध्येही माझे काम सुरू होते, याशिवाय पुस्तक प्रकाशन, दिवाळी अंक प्रकाशन, दिनदर्शिका प्रकाशन, असे इतर उद्याोगही सुरू असतात. आपल्या घरी राहून जे करणे शक्य असेल ते चालेल, त्यातून पैसे थोडे कमी मिळाले तरी हरकत नाही’.

आता गावांमध्येही इंटरनेट आणि इतर पायाभूत सुविधा चांगल्यापैकी पोहोचल्यामुळे घरबसल्या अर्थार्जन करण्याच्या संधीत वाढ नक्कीच होत आहे. बागायतीवर आधारित उद्याोगांबरोबरच आर्थिक प्रगती साधण्याचे अनेक मार्ग गावातही उपलब्ध आहेत. ‘रोजगाराच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत. वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्स, प्रोजेक्ट बेस्ड जॉब असे अर्थार्जनाचे अनेक नवीन मार्ग प्रस्थापित होत आहेत. यामुळे शहरांकडून गावांकडे या पुनर्स्थलांतरणाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असेल तर आमच्यासारख्या तरुण पिढीने त्याचा फायदा का घेऊ नये!’, असा प्रश्नही हर्षदने उपस्थित केला.

हेही वाचा : सफरनामा : मधु इथे अन्…

अर्थात, निश्चित उत्पन्नाचे काम सोडून हा निर्णय घेणे हे सोपे काम नाही. मग अशा निर्णयातील जोखीम तरुण पिढी कशी हाताळते, याबद्दलही त्याने सविस्तर सांगितले. ‘पुन्हा आपल्या गावीच यायचे हे ठाम ठरवलं, तरी हा निर्णय घेताना अनेक आव्हानं आली. चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होणे ही गरज असतेच, दुसरं म्हणजे लग्न या गोष्टीबाबतीतली अनिश्चितता, त्यामुळे साहजिकच पिअर प्रेशर येऊ शकते. शिवाय, शहरातली नोकरी सोडून गावात राहणं म्हणजे मोठं काही करण्याची क्षमता नसणं असाही अर्थ घेतला जातो. काहीही अडचणी आल्या तर आपला निर्णय कसा चुकला याचीच चर्चा होणारं वातावरण आजूबाजूला असतं. तरी थोडासा बिनधास्तपणा दाखवून या आव्हानांवर मात करता येऊ शकते’, असं तो म्हणतो.

‘गावात राहून मला जशा रोजगाराच्या संधी मिळत आहेत तशाच सर्वांना मिळतील का? एका गावातले १०० तरुण शहर सोडून गावात येऊन राहिले तर सगळ्यांना चांगल्या उत्पन्नाचा रोजगार मिळेल का? याचं उत्तर निश्चितपणे ‘हो’ असं देता येणार नाही. पूर्वीच्या तुलनेत गावात व्यवसायाच्या संधी निश्चितच वाढल्या आहेत, थोडीशी चौकस बुद्धी ठेवली तर त्या संधी आपल्याला दिसतात. स्थिर मासिक उत्पन्नाशी थोडीशी तडजोड, शारीरिक मेहनतीची कामं करण्याची तयारी, सामाजिक दबावाला न जुमानण्याची बिनधास्त वृत्ती अशा काही गोष्टी तरुण पिढीला गावात राहून व्यवसाय करण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकतात. शेवटी ज्याने त्याने आपापला विचार करून आपापला मार्ग निवडावा’ असा सल्लाही हर्षद देतो.

विक्रम होशिंग यांना मात्र नवीन ठिकाणी जम बसवण्यात वेळ गेला. ‘आमचं क्षेत्र थोडं वेगळ असल्याने आणि आम्ही लांब राहत असल्याने लोकांना पहिले माहिती करून घेण्यातच वेळ गेला. त्यात आमची कुठेही वेबसाईट नाही त्यामुळे माऊथ पब्लिसिटीनेच लोकांपर्यंत माहिती पोहोचली. आम्ही मुळशीतून पुण्यात प्रवास करायचो, जिथे ट्रेनिंग द्यायचे असेल त्या जागी जायचो. लोकांना आमच्याविषयी माहिती मिळून जम बसेपर्यंत २ वर्ष लागली’ असं ते सांगतात. ‘आम्ही फक्त कुत्र्यांनाच नव्हे तर त्यांच्या मालकांनाही प्रशिक्षण अनिवार्य करायचो. कारण त्यांनी कुत्रा पाळला असल्याने त्यांना या गोष्टी समजणं अधिक गरजेचं आहे. या विचारामुळे आमचे काही क्लाएंट्स कमी झाले, परंतु ही गोष्ट बदलली नाही. फक्त कुत्र्याला प्रशिक्षण देऊन चालत नाही त्यांच्या मालकालाही रोजच्या आयुष्यात बदल आणावेच लागतात. तुम्ही त्या कुत्र्याला घरचा सदस्य बनवू शकता, परंतु माणूस बनवायला गेलात तर ते शक्य होणार नाही. हे सगळे विचार तेव्हा लोकांना नवीन होते. त्यामुळे आमच्यापुढे अशी काही आव्हानं आली, मात्र अडचणींचा विचार तुम्ही आधी केलेला असला पाहिजे’ असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : सरत्या वर्षातले फॅशन ट्रेंड्स

या पद्धतीच्या करिअरमध्ये अनेक इन्फ्लूएन्सर, सेलिब्रिटी यांचीही भर पडली आहे. आपली आवड, गरज, विचार, ध्येय, प्राधान्य या सगळ्यांचे समीकरण साधून आजची पिढी असे धाडसी निर्णय घेत आहे. लोकप्रिय यूट्यूब चॅनल ‘रेड सॉइल स्टोरीज’चे पूजा आणि शिरीष गवस सांगतात, ‘आमच्या शिक्षणाचा म्हणजेच डिजिटल मार्केटिंग आणि फिल्म मेकिंगचा आपल्या मातीला कसा फायदा होईल हे आमचं ध्येय होतं. असं काहीतरी करताना सगळ्यात पहिले आव्हान असतं ते म्हणजे आपल्या आई-वडिलांना आणि घरातील मोठ्यांना हे समजावून देणं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकतं आणि संसार चालू शकतो हे पटवून देणे अवघडच असते. त्याखेरीज इथेसुद्धा थोडं लांब असल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवते, तुम्ही बघता ती अगदी भांडी-कुंडी, घर, पूर्ण सेट-अप हे सगळंच आम्ही स्वत: उभारले आहे. प्रोफेशनली एखादी गोष्ट करायची म्हटली तर तांत्रिक बाबीसुद्धा परफेक्ट असायला हव्यात.

शहरापेक्षा लांब असल्यामुळे अनेक चांगल्या संधींनासुद्धा मुकावे लागते, पण इथल्या वातावरणात आणि संस्कृतीमध्ये ते विसरायला होते’. थोडक्यात काय तर थोडीशी तडजोड, जिद्द, सातत्य आणि तुमची कला प्रामाणिकपणे सादर करणे याचा समन्वय साधला तर आज काहीही शक्य आहे. एक गोष्ट मात्र तरुण पिढीने कटाक्षाने पाळायला हवी ते म्हणजे सोशल मीडियाचे जग हे भयंकर अस्थिर आहे, बेभरवशी आहे त्यामुळे तुमच्या कामात सातत्याने दर्जा राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात आणि अशा पद्धतीने घेतलेला निर्णय अमलात आणताना संघर्ष आणि परीक्षा चुकलेली नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले.

तरुण पिढी आपली मुळं विसरली आहेत, त्यांना जुन्या पद्धती आणि संस्कृतीत रस उरला नाही, अशी ओरड आजही होते. मात्र केवळ पैसे कमावणे हे ध्येय न ठेवता आवड आणि व्यवसाय यांची सांगड घालत शहरापासून दूर राहणारी ही पिढी आपली मुळं घट्ट धरून उभी आहे हेच अशा उदाहरणांवरून जाणवतं. नव्या वर्षात आणि इथून पुढेसुद्धा तरुण पिढीचा हा ट्रेंड अधिकाधिक वृद्धिंगत होऊ दे.
viva@expressindia.com

Story img Loader