‘ती’ येऊन ठेपलेय दाराशी.. ‘ती’ आल्यावर होणार आहे प्रकाशाची पहाट.. पसरणार आहे आनंदाची लाट.. ‘ती’ दिवाळी! या आनंदलाटेच्या उधाणावर केवळ आपण एकटंच स्वार न होता ‘आपण सगळेजण मिळून स्वार होऊ या’ असं सामाजिक भान असलेली नि त्या जबाबदारीला ओझं न म्हणता ती सहजगत्या स्वीकारणारी तरुणाई आहे आपल्याच आसपास.. त्यांच्यासाठी नाहीये लाइफ केवळ फन अँण्ड फाइन.. ते आहे जॉय ऑफ गिव्हिंग.. तरुणाई आपला खारीचा वाटा उचलतेय दिवाळीच्या निमित्तानं.. कोवळं आजारपण, अनाथ बालपण, चुकलेल्या वाटा, सुरकुतलेले हात, अकाली अपंगत्व, हलाखीची परिस्थिती अशा अनेक कारणांनी वेढलेल्या त्या त्या घटकांना तरुणाईच पुन्हा घेतेय सामावून आपल्यात.. समाजात.. कारण.. ‘एक पणती मिणमिणती.. अंधाराला संहारती.. चतन्यानं बहरू दे अवकाश.. सामाजिक बांधीलकीचा निरंतर प्रकाश..’
तरुणाईच्या विस्तारलेल्या सामाजिक जाणिवांच्या क्षितिजाची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.

डॉ. अमोल नाईकवाडी, धन्वंतरी मेडिकल ट्रस्ट
viv15    घराघरांतून रद्दी गोळा करत उभारलेल्या निधीतून कॅन्सरपीडित गरजू मुलांसाठी वस्तू उपलब्ध करून द्यायचा उपक्रम आम्ही राबवितोय. या कामी कॉर्पोरेट ऑफिसेस आणि नागरिकही मदतीचा हात पुढं करताहेत. टाटामध्ये कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या दोन ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांपकी कितीतरी मुलं मुंबईबाहेरून आलेली असतात. या आजाराशी लढताना मुलांच्या शारीरिक व्याधींसह त्या कुटुंबाची मानसिक आणि आíथक परिस्थितीही ढासळत जाते. या सगळ्या परिस्थितीशी निकराचा लढा देताना त्यांना थोडीशी बळकटी येण्यासाठी ‘क्रािफ्टग स्माइल’ हा उपक्रम राबवून आम्ही खारीचा वाटा उचलतोय. लोकांचे रद्दी पेपर विकून येणाऱ्या पशांतून दर महिन्याचं धान्य आणि वस्तू त्यांना देतो. कधी आíथक मदत केली जाते, तर कधी मनोरंजनासाठी राणीबागेत फिरायला नेतो. या मुलांना शक्य तेवढा सपोर्ट करायचा आमचा प्रयत्न असतो. मुलांच्या पालकांना केवळ रोजचा स्वयंपाक करायला परवानगी असल्यानं दिवाळीत त्यांना फराळ वाटणार आहोत. मदतीचा हात देताना जाणवणाऱ्या या दुर्दैवी आजारी लहानग्यांच्या नि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावभावनांचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे.  संपर्क – ९८२०८९९७९७.

स्वप्नाली धाबुगडे, ट्रेकलव्हर्स
viv16आमचा ग्रुप कल्याणजवळ मामणोलीला ‘समतोल फाउंडेशन’च्या मुलांसोबत २६ ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणार आहे. वेगवेगळ्या कारणांनी घर सोडून आलेली अनेक मुलं मुंबईतील रेल्वेस्थानकांत राहतात. त्यांना एकत्र करून या विविध स्तरांतील मुलांचं मनपरिवर्तन करण्यासाठी एका वेळी ३० मुलांचं दीड महिना शिबीर घेतलं जातं. खेळ आणि कार्यशाळांच्या माध्यमाचा सुयोग्य वापर करून त्यांच्या घरचा पत्ता शोधून काढून त्यांची पाठवणी केली जाते. ही मुलं घरी गेल्यावर त्यांच्याजवळच्या एनजीओला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं जातं. आतापर्यंत संस्थेनं आठ हजार मुलांना घरी परत पाठवलंय. आमच्या ग्रुपमधील डॉक्टर मेडिकल चेकअप करून त्यांना चांगल्या आरोग्य सवयींविषयी, स्वच्छतेविषयी सांगणारेत. त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘आंगन’ संस्थेच्या चित्रकलेच्या पुस्तकांचा माध्यम म्हणून वापर करणार आहोत.  आमचं कॉन्ट्रिब्युशन देणगी किंवा उपयुक्त वस्तुस्वरूपात दिलं जाणारेय. केवळ ट्रेकिंगपुरतंच सीमित न राहता दिवाळी उपक्रमाच्या निमित्तानं आपली सामाजिक बांधीलकी ओळखून चांगल्या कामांत आम्ही मनापासून सहभागी व्हायचा प्रयत्न करणार आहोत. संपर्क – swapnali.dhabugade@gmail.com

वृषाली आंगविलकर, द रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे सेंट्रल
viv19यंदा दिवाळी पहाटेला आम्ही कोपरखैरणेच्या ‘स्वीट होम ओल्डएज’मध्ये जाणार आहोत. तिथल्या आजी-आजोबांना चालेल असा फराळ घेऊन जाणार आहोत. आपल्या घराप्रमाणेच आश्रमात दिवाळीनिमित्त थोडी सजावट करून रांगोळ्या काढणार आहोत. त्यांच्यासोबत फुलबाज्या वगरे उडवणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही मोखाडय़ाच्या आदिवासींना कंदील तयार करायला शिकवले होते. त्यातले दोन कंदील या वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत. कारण हे कंदील सौरऊर्जेवर चालतात. त्याखेरीज वृद्धांना लागणाऱ्या टेबलफॅन, डायपर्स आदी वस्तूही पुरवल्या जातात. आश्रमाजवळच अपंग मुलीही राहत असून त्यांना कपडे देण्यात येतील. मनोरंजन म्हणून खेळ-अंताक्षरी वगरे घेण्यात येईल. ठाण्यातल्या एका अपंग मुलांच्या संस्थेत तयार झालेले दिवे तिथं घेऊन जाणार आहोत. इथल्या आजी-आजोबा नि मुलींसोबत घरी साजरी करतो, तशीच दिवाळी साजरी करणाचा आमचा मानस आहे. संपर्क – http://www.facebook.com/rcthanecentral

प्रीती पटेल, ऑफबीट-सह्य़ाद्री
viv17ट्रेकिंग करताना त्या त्या गावांना आम्ही वर्षभर काही ना काही मदत करतो. यंदा आजोबागडाजवळील आठ वाडय़ांवरील गावकऱ्यांना दिवाळी फराळ आणि कपडे दिले जाणारेत. हलाखीच्या परिस्थितीमुळं दिवाळी म्हणजे काय, याचा त्यांना गंधही नसतो. आपापल्या परिचितांकडून उपयुक्त वस्तू नि कपडे गोळा केले जातात. दिवाळीच्या दिवसांत गावकरी भेटतीलच ही खात्री नसल्यानं दिवाळीच्या आदल्या रविवारी आम्ही तिथं जातोय. म्हणजे दिवाळीत हे सामान त्यांना उपयोगी पडू शकेल. फराळ, कपडे-कंदीलादी वस्तू लहान मुलांना कधीच मिळालेल्या नसतात. त्यामुळं ते मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. या उपक्रमाला समाजाच्या सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळतोय. आपण ट्रेकिंगच्या निमित्तानं ज्या ज्या गडमाथ्यांवर जातो, तिथल्या गावकऱ्यांची मदत घेतो, त्यांचं आयुष्य आम्ही जवळून बघितलं. तेव्हाच ठरवलं की, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडायला हवा. त्यासाठी इतरांची वाट न बघता आपणच कामाला लागायचं. तेव्हापासून गेली तीन वर्षे आमची दिवाळी गडांखालच्या गावकऱ्यांच्या आनंदाच्या प्रकाशात न्हाऊन निघतेय.. भटकंतीच्या निमित्तानं त्यांच्याशी झालेल्या परिचयामुळं वाढलेल्या स्नेहाची पणती कायमच तेवत राहणारेय.
संपर्क – https://www.facebook.com/pages/OffBeat-Sahyadri/152424624811585

त्रिंबक डोंगरे
viv18रक्षाबंधन नि भाऊबीज.. बहीण-भावांच्या नात्याचे स्नेहबंध अधोरेखित करणारे हे सण साजरे करताना भोवताली असतात आपलीच माणसं.. तीच नसतील तर.. विविध कारणांमुळं अनाथपण आलेल्या अजाण मुलींचा सांभाळ करणारी टिटवाळ्याची ‘परिवर्तन संस्था’च या मुलींची ‘आपली माणसं’ झाली. इथं मुलींना समुपदेशन करण्यात येतं. त्याही विविध अभ्यासक्रम पूर्ण करून जिद्दीनं शिकतात. गेली दोन वर्षे मी संस्थेच्या ‘बालिकाश्रमा’त जातोय. माझ्यासोबत माझे मित्र-मत्रिणीही येऊ लागले. आश्रमातल्या मुली आणि आमच्या आयुष्यातला फरक जाणवण्याजोगा होता. परिस्थितीला नेटानं सामोरं जायची त्यांची वृत्ती आम्हाला भावली. त्यामुळं आमच्यापकी काहींनी छोटय़ा गोष्टींवरून हट्ट करण्याचा स्वभाव बदलला. भाऊबिजेच्या दिवशी श्रीगणेशाचं दर्शन घेऊन मग आश्रमात जातो. आपल्या घरच्यांसारखीच मजा-मस्ती करत टिपिकल ओवाळणी होते. फळं, मिठाई नि संस्थेला देणगी दिली जाते. घरी निघाल्यावर गेटशी उभं राहून त्या हळवेपणानं टाटा करतात.. त्या बोलल्या नाहीत तरी दादा, तू लवकर ये.. असे भाव त्यांच्या टपोऱ्या डोळ्यांत असतात.. बहिणींच्या या आपुलकीची शिदोरी अजोड आहे. संपर्क : ९६९९६६९७९३

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

Story img Loader