गावातील एकाचे वडील वारले. अंत्यसंस्कार करायचे तर जागा नाही. तो वैतागला, सरपंचांकडे गेला. सरपंचांनी एक क्षण विचार केला आणि म्हणाले, गावात येणाऱ्या रस्त्यावर अंत्यसंस्कार होतील. तयारी झाली आणि पाटोदा गावातील बाबुराव आगळे यांना अग्नी देण्यात आला. गावात येणारी वाहतूक थांबली. प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस, महसूल विभागाचे आयुक्त गावात आले. तेव्हा त्यांना कळले की, गावात स्मशानभूमीच नाही. महसूलच्या दप्तरी स्मशानभूमीची नोंद होती. सरपंचांनी ती जागा मोजून देण्याची मागणी केली, तेव्हा स्मशानभूमीची अडचण संपली. समस्या सोडविणाऱ्या माणसाचे पद होते सरपंच.
आणखी एक किस्सा गाव बदलण्याचा. २ ऑक्टोबर २००५ रोजी ग्रामसभा झाली. साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरले. सरपंचांनी गावात ५२५जणांची यादी तयार केली. ५२४ जणांनी जरासा विरोध करून का असेना, स्वच्छतागृह बांधले. पण एक घर काही बधत नव्हते. पाटोदा गाव तसे औरंगाबादजवळील औद्योगिक वसाहतीला चिकटून. त्यातील एकजण कंपनीत कामाला जायचा. घरी दोघेच, नवरा- बायको. स्वच्छतागृह नाहीच. उघडय़ावर जाण्याला गावात बंदी. मग शोध सुरू झाला, ही व्यक्ती स्वच्छतागृह का बांधत नाही? सरपंचांनी चक्क पाळत ठेवली. मध्यरात्रीनंतर दोन वाजता घरातील महिला बाहेर निघाली. ज्या रस्त्यावरून ती चालली, तेथे ते थांबले. नजरानजर झाली. ते काहीच बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी ती आली आणि म्हणाली, चुकले आता. चार दिवसांची मोहलत द्या. शेवटी सर्व गावात पाणंदमुक्ती झाली. गावाला तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. ते घ्यायला जाताना जे नाव घेतले गेले ते होते औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे यांचे.
लालबुंद डोळे पाहून एखाद्याला वाटेल हा माणूस प्यायलेला तर नसेल? पण संस्कार वारकरी. तसा स्वभाव रागीट. पण चांगले काही करायचे ठरले की काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे पेरे यांचे पाटोदा हे गाव ओळखले जाऊ लागले. स्वच्छता अभियानात पहिला राज्यस्तरीय पुरस्कार पटकावणारे गाव. गेली ८ वष्रे गावात अनेक उपक्रम राबविणारा चेहरा म्हणजे भास्कर पेरे.
किती उपक्रम असतील? मोजता येणार नाहीत एवढे. गावात २४ तास शुद्ध पाणीपुरवठा आहे, तोदेखील मीटरने. गावच्या शाळेत, अंगणवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच, पण गावात येणाऱ्या रस्त्यावरही हे कॅमेरे लावले आहेत. प्रत्येक घरासमोर झाड, कचराकुंडी आहे. ओल्या-सुक्या कचऱ्याची वेगळी-वेगळी. प्रत्येक गल्लीत बेसीन आहे. तेथे कोणालाही सहज हात धुता येतात. या सर्व प्रयोगांसाठी लोकसहभाग मिळविणारी व्यक्ती म्हणजे पेरे. गावातील म्हाताऱ्या-कोताऱ्यापासून ते नव्याने येणाऱ्या सुनांपर्यंत प्रत्येकजण पेरे यांच्याशी थांबून बोलतात. मनातले भडाभडा बोलतात. लोकसंग्रहासाठी कधी भंडारा, तर कधी गावजेवण असे उपक्रम होत असतातच. पण हे सारे ज्या पद्धतीने हाताळले जाते, त्यामुळेच गाव स्वच्छ नि लख्ख आहे. गावात अवैध कनेक्शन नाही, कारण शेगडी वापरण्यास बंदी आहे. रस्ते-पाणी नि वीज सुविधांसह शंभर टक्के स्वच्छतागृहांचा वापर करणारे हे गाव नव्या जाणिवा निर्माण करणारे आहे. त्यात पेरे यांचा चेहरा उठून दिसतो. नव्या पुरस्कारामुळे तो पुन्हा चच्रेत आला आहे.
सरपंच असावा असा!
गावातील एकाचे वडील वारले. अंत्यसंस्कार करायचे तर जागा नाही. तो वैतागला, सरपंचांकडे गेला. सरपंचांनी एक क्षण विचार केला आणि म्हणाले, गावात येणाऱ्या रस्त्यावर अंत्यसंस्कार होतील. तयारी झाली आणि पाटोदा गावातील बाबुराव आगळे यांना अग्नी देण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 18-01-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Face in debate sarpanch bhaskar pere aurangabad