राज्यातील काही ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तितकेच लोकप्रिय झालेले व समीक्षकांनी उचलून धरलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकातील कलाकारांचा येथे विविध पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने गौरव करण्यात आला.
डाव्या, समाजवादी, रिपाइं, रिपब्लिकन सेना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शेतकरी संघटना, छात्रभारती, वकील विचारमंच, अंनिस आदी संघटनांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाचे स्वागत केले. मागील वर्षांप्रमाणे यावेळीही शहरातील काही सनातन मंडळींनी नाटकाच्या प्रयोगाला विरोध दर्शविला होता. केवळ विरोधाराला विरोध करून चालत नाही तर खरा इतिहास समजावून घेण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. आजपर्यंत सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करून बहुजन समाजाला कायम गुलाम करून फसविण्याचे षडयंत्र उच्चवर्णीयांकडून राबविले गेल्याचा आरोपही परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने करण्यात आला. खरा इतिहास मांडणारे हे विचार नाटय़ आहे. शिवाजीराजे किती महान आहेत असा संदेश देणाऱ्या या नाटकाचे आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक प्रयोग झाले असून दहापेक्षा अधिक पुरस्कार या नाटकाने मिळविले आहेत.
येथील महाकवी कालिदास नाटय़मंदिरात या नाटकाचे संकल्पनाकार विद्रोही शाहीर संभाजी भगत, लेखक व दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांसह सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अत्याचार विरोधी समितीचे मुख्य निमंत्रक राहुल तुपलोंढे, संभाजी ब्रिगेड नाशिकचे कार्याध्यक्ष संतोष गायधनी, जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, महानगर प्रमुख नितीन रोठे पाटील आदी उपस्थित होते.