गोंदिया जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे या दलित इसमाच्या जळीत प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोंदिया जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक दिलीप झलके व गंगाझरीचे ठाणेदार पाटील यांना निलंबित करावे, अशी मागणी समता समाज संघाचे संघप्रमुख सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांनी पत्रकार परिषदेत केली.
संजय खोब्रागडे आपल्या घरी झोपले असताना शनिवारी पहाटे पाच-सहा जणांनी घरी येऊन त्यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्यांना जाळले. त्यात ते गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर संजय खोब्रागडे यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या बयाणानुसार गावातील काही लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजयची पत्नी देवकाबाईचे गावातीलच राजू नावाच्या व्यक्तीशी संबंध होते. या संबंधात अडसर येत असल्याने देवकाबाई आणि राजू यांनीच संजयला जाळले. हा गुन्हा त्यांनी कबूल केला, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. एवढेच नाही, तर देवकाबाई व राजू नावाच्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत उपस्थित करून ही माहिती देण्यास भाग पाडले, असाही आरोप किशोर गजभिये यांनी केला.
हा प्रकार चारित्र्यहननाचा असून पोलीस अधीक्षकाला न्यायाधीशाची भूमिका पार पाडता येत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांनी राजकीय दबावाखाली येऊन खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी पीडित व्यक्तींनाच आरोपी बनवून या प्रकरणाला कलाटणी दिली.
खऱ्या आरोपींना सोडून पीडितांनाच आरोपी बनवण्याचे महापाप या पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
संजय खोब्रागडे यांनी गावातील मोकळ्या जागेवर बुद्ध विहार बांधण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला गावातील नागरिकांनी त्यांना जागा देण्याचे कबूलही केले होते.
यानंतर मात्र घूमजाव करून बह्य़ा बाबा मंदिराच्या भक्त निवासासाठी जबरदस्तीने बांधकाम करण्यात आले. यास विरोध केला म्हणून संजय खोब्रागडे यांना गावातील नागरिकांनी विरोधही केला होता. एवढेच नव्हे, तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ही वस्तुस्थिती असताना पोलिसांनी मात्र या प्रकरणाला वेगळे वळण देऊन एका दलित महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे.
या महिलेच्या मुलाने माझी आई, असे कृत्य करूच शकत नाही, असे सांगितल्यानंतरही पोलिसांचा त्यावर विश्वास बसू शकत नाही, यापेक्षा दुसरे दुर्देवच असू शकत नसल्याचे सांगून या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही किशोर गजभिये यांनी याप्रसंगी दिला. महाराष्ट्रात दलितांवर सर्वाधिक अन्याय होत असून दोषसिद्ध होण्याचे प्रमाण फक्त ३ टक्के आहे.
इतर राज्यात दोषसिद्धतेचे प्रमाण ३० टक्क्यांच्यावर असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला संपत रामटेके, राजरतन मोटघरे, डी.बी. बोरकर, शुद्धोधन शहारे, राजेश रामटेके आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2014 रोजी प्रकाशित
जळीत प्रकरणाला वेगळे वळण :पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची गजभिये यांची मागणी
गोंदिया जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे या दलित इसमाच्या जळीत प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोंदिया जिल्ह्य़ाचे पोलीस
First published on: 21-05-2014 at 11:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspector and superintendent of police to suspend in sanjay khobragade burning case