क्रांतीच्या परिभाषेतून बुद्ध मांडता आला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला क्रांतिकारक बुद्ध दिला. तुमच्या आचरणातून सर्व काही दिसले पाहिजे. असेच व्यक्तिमत्त्व घडवले पाहिजे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
येथील भगवान भिवाजी भालेराव साहित्यनगरी पुष्पक मंगल कार्यालय येथे बौद्ध साहित्य परिषद आयोजित दुसरे बौद्ध साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मनोहर बोलत होते. बौद्ध साहित्य संमेलन हा उपक्रम वाटला पाहिजे. या उपक्रमाचा बोधीवृक्षाप्रमाणे विस्तार झाला पाहिजे. ही संकल्पना समाजात रुजली गेली पाहिजे. जागतिकीकरणाच्या काळात या मूल्यनीतीचा प्रसार झाला पाहिजे. बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विचाराचा प्रसार व प्रचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मनोहर यांनी या वेळी व्यक्त केली.
बुद्धाच्या मूळ विचारांशी आपण प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत संमेलनांची चळवळ यशस्वी होणार नाही, असे सांगून डॉ. मनोहर यांनी डॉ. आईनस्टाईन यांच्या तत्त्वज्ञानाच्या कथा विस्ताराने सांगितल्या. आईनस्टाईन एक वेळ म्हणाले होते की, बुद्धाने मांडलेले सर्व सिद्धान्त आम्ही वैज्ञानिक आज अभ्यासाच्या माध्यमातून जगासमोर जशास तसे मांडत आहोत. माणसाच्या सान्निध्यात राहून जे सुचत नाही ते निसर्गाच्या मांडीवर डोके ठेवल्यानंतर सुचते. हे काम आत्मसात केल्यानेच ते बुद्ध झाले. आपण निसर्गमय होतो म्हणजे बुद्धमय होऊन जातो. बुद्ध हे अवकाश पुत्र होते. जगातील सर्व सुख-सुविधांचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात आले. त्यानंतर अफाट अवकाशाच्या निरीक्षणातूनच त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. प्रत्येक व्यक्तीने बुद्ध साहित्य अभ्यासताना स्वत:ला समजून घेतले पाहिजे. दुसऱ्या गोष्टीला लागलेली आग विझवण्यास माणूस प्रयत्नशील असतो, परंतु स्वत:च्या मनातील मनाला लागलेली आग विझवणे म्हणजेच बुद्धमय होण्याचा मार्ग आहे. तुमच्या आचरणातून सर्व काही दिसले पाहिजे. स्वत:ला मी कोण आहे, हे सिद्ध करण्यास वेळ वाया घालवू नका. तुम्ही कोण आहात, तुमचे कार्य काय, हे समाजाने ओळखले पाहिजे. तरच तुमच्यात त्या बुद्धीचा, ज्ञानाचा समाजजागृतीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल असे म्हणता येईल, असेही डॉ. मनोहर म्हणाले.
डॉ. मनोहर यांनी बौद्ध सहित्य परिषद, तसेच संयोजक समितीला अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बौद्धिक वसा घेऊन जन्मलेल्या साहित्यिक व विक्रमवीरांचा केलेला सन्मान ही गौरवास्पद बाब असल्याचे नमूद केले. विचारमंचावर जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, डॉ. खेमधम्मो, अरुणा लोखंडे, बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, संयोजक यशपाल सरवदे, स्वागताध्यक्ष धनंजय िशगाडे आदींची उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘क्रांतीच्या परिभाषेतून बुद्धाचे सादरीकरण व्हावे’
क्रांतीच्या परिभाषेतून बुद्ध मांडता आला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला क्रांतिकारक बुद्ध दिला. तुमच्या आचरणातून सर्व काही दिसले पाहिजे. असेच व्यक्तिमत्त्व घडवले पाहिजे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
First published on: 12-11-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Says dr yashwant manohar in osmanabad