ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)च्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ. ज्योती बाबुराव लांजेवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना किडनीच्या आजार होता. आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी साहित्य सेवेसोबत रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून काम सुरू केले होते.
डॉ. लांजेवार यांचे दीशा, शब्द निळे आभाळ, अजून वादळ उठले नाही (कविता संग्रह), फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ, दलित साहित्य समीक्षा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ, समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह, भारतीय समाज आणि स्त्री (वैचारिक लेखन) आजची सावित्री (दीर्घ कथा) माझा जर्मनीचा प्रवास (प्रवास वर्णन) इत्यादी साहित्य संपदा प्रकाशित झाली आहेत.
त्यांना बा. सी. मर्ढेकर, पुरस्कार, मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (सातारा प्रतिष्ठान), महात्मा फुले राष्ट्रीय अस्मितादर्शी पुरस्कार (उज्जैन), पद्ममश्री दया पवार पुरस्कार (दलित साहित्य अकादमी भुसावळ), चुनि कोटीयाल बांगला दलित साहित्य पुरस्कार (कोलकता), पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (इंदौर), अस्मिता दर्शक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, लोकमित्र, समाज प्रबोधन प्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल फाऊंडेशन पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. इंग्रजी , रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे अनेक कविताचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
आज अंत्यसंस्कार
उद्या, शनिवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे उपस्थित राहणार आहे.