हिंदी, इंग्रजी भाषेतील थ्रिलर चित्रपट मराठी प्रेक्षक स्वीकारत असतील, तर ते मातृभाषेतील असा उत्तम चित्रपटही निश्चितपणे जवळ करतील. उद्या शुक्रवारी रामनवमीच्या दिवशी प्रदर्शित होत असलेला ‘येडा’ सायकोथ्रिलर चित्रपटाला मराठी प्रेक्षकांची निश्चितपणे साथ लाभेल. किंबहुना हा चित्रपट अन्य भाषेतील थ्रिलर चित्रपटांपेक्षा सरस ठरेल, असे मत ‘येडा’ चित्रपटाचा नायक आशुतोष राणा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.    
हिंदीसह देशातील विविध भाषांमध्ये अभिनय करणारे आशुतोष राणा या सिनेमाच्या निमित्ताने मराठीकडे वळले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेचा स्वीकार कसा केला याची माहिती दिली. पत्नी रेणुका हिने वर्षभरापूर्वीच आशुतोष एका मराठी चित्रपटात चमकेल असे विधान केले होते. पत्नी मराठीभाषक असल्याने तिच्या मातृभाषेच्या चित्रपटात काम करणे सुखीसंसारासाठी आवश्यकच होते. अशी मल्लिनाथी करून राणा म्हणाले, चित्रपटातील शूटिंग सुरू करण्यापूर्वी सात दिवस अगोदर मी मराठी भाषेच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. मराठी भाषेच्या उच्चारणाचे पारायण केले होते. ‘येडा’ या पात्राशी साधम्र्य साधले जावे यासाठी डबिंगचे कामही मध्यरात्रीच्या सुमारास केले होते. अप्पा कुलकर्णी हे पात्रच क्षणोक्षणी प्रेक्षकांना घाबरवून टाकते. पण ते कशाप्रकारे हे पाहण्यासाठी रसिकांनी चित्रपटगृहांकडे वळले पाहिजे.    
चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर म्हणाले, विकृत विरुद्ध सुकृत यांच्यातील लढाई येडामध्ये चित्रित झाली आहे, चित्रपटात आशुतोष राणाला खास गेटअप करण्यात आला आहे. किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, रिमा लागू, अनिकेत विश्वासराव, प्रज्ञा शास्त्री अशा अनुभवी कलाकारांची टीम चित्रपटामध्ये आहे. ४० मल्टीप्लेक्ससह राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये तो उद्या प्रदर्शित होत आहे. या वेळी अभिनेत्री प्रज्ञा शास्त्री हिने आपल्या पात्राविषयीची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा